Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पनवेल येथील ‘गुलाबसन्स डेअरी फार्म’ मुळे उद्भवणार्‍या प्रदूषणाकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

३०० पेक्षा जास्त म्हशी असलेल्या या तबेल्यातील प्रक्रिया न केलेल्या मलमुत्रामुळे परिसरातील नागरिकांत उद्भवत आहेत गंभीर आरोग्य विषयक समस्या

पनवेल, दि.६: प्रदूषणाशी निगडीत समस्यांकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन हा किती तोकडा आहे याची प्रचिती रोजच्या-रोज आपल्याला येत असते. या समस्यांच्या दाहकतेची जाणिव आपल्याला तेव्हाच होते जेव्हा आपल्यासोबत आपल्या निकटवर्तीयांना गंभीर शारीरिक व्याधींचा सामना करावा लागतो. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुका स्थित नेरे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गुलाबसन्स डेअरी फार्ममुळे होणार्‍या जल व मृदा प्रदूषणामुळे येथील ग्रामस्थ-नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहेत. मागील जवळपास २२ वर्षांपासून येथील ग्रामस्थांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. शिवाय एवढ्या वर्षांत अनेक तक्रारी येऊनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून म्हणावी तशी कठोर कारवाई अद्याप झालेली नाही.

या समस्येकडे महाराष्ट्र वार्ता च्या आपली समस्या टीम चे लक्ष वेधले गेल्यावर उपलब्ध माहिती अधिकारातील कागदपत्रांच्या आधारे व सखोल अभ्यासाअंती असं लक्षात आलं की प्रशासन स्तरावरच पाणी मुरत असल्यामुळे प्रदूषणाच्या या गंभीर समस्येकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केलं गेलंय. जवळपास ३०० म्हशींच्या या गोठ्यामधून मोठ्या प्रमाणात शेण, मूत्र व इतर कचरा कोणतीही प्रक्रिया न करता थेट उघड्यावर टाकण्यात येतोय. यामुळे यातील द्रव्य स्वरुपात असलेले मूत्र, म्हशींची स्वच्छता केल्यावर उरलेले पाणी (ज्यात रासायनिक द्र्व्यांचा समावेशही आला) इत्यादि जमिनीत मुरून त्याचा थेट जमिनीखालील स्वच्छ पाण्याच्या भुजलिय स्त्रोतांशी संबंध येऊन परिसरातील विहिरी, बोअरवेल्स व लगतच असलेले तलाव आदि मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहेत. या गोठ्याला अगदि खेटूनच महालक्ष्मी नगर हे जवळपास १००० घरांचे निवासी संकुल व नेरे गावातील निवासी पट्टा असून या ठिकाणी बहुतकरून बोअरवेल्स च्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो जी प्रदूषण नियंत्रण महामंडळासाठी नक्कीच दखलपात्र बाब आहे.

उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे असे कळले की ऑगस्ट २०१२ साली नेरे ग्रामपंचायतीकडे गुलाबसन्स डेअरीतील उत्सर्जित पाण्यामुळे(मलमूत्र व सांडपाणी) होणार्‍या प्रदूषणाबाबत ग्रामस्थांकडून रीतसर तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी सुरूवातीला काही विहीरी व बोअरवेल्स च्या पाण्याचे नमुने नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत तपासून घेतले. ज्यात काही विहीरी-बोअरवेल्स चे पाणी प्रदूषित असल्याचा अहवाल आला. या अहवालानंतर गुलाबसन्स डेअरी फार्म ला गोबर गॅस प्लांट बसवण्याचे निर्देश पंचायत समितीकडून देण्यात आले. परंतू, गुलाबसन्स डेअरी फार्म ने विहित मुदतीत गोबर गॅस प्लांट काही उभारला नाही. या शिवाय येथे भेट दिलेल्या चौकशी पथकाच्या असेही ध्यानात आले की येथील मृत जनावरांना उघड्यावरच फेकले जात असून त्याचाही त्रास ग्रामस्थांना भोगावा लागतोय. पनवेल च्या तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनीही या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यावर गुलाबसन्स डेअरी च्या मालकांस नोटिस बजावली होती. या सार्‍याकडे दुर्लक्षच केले गेले.

नागरी वस्तीजवळ तबेले/गोठे का नसावेत?

नागरी वस्तीजवळ तबेले/गोठे न ठेवण्यामागे कारणे अनेक असली तर मुख्य कारण म्हणजे जनावरांपासून माणसात संक्रमित होणारे संसर्गजन्य रोग. ज्यांस झोनेटिक डिसीज(zoonotic disease) म्हंटले जाते. जे हवा-पाणी इत्यादींमार्फत मानवांतही सहज शिरकाव करू शकतात. अशा संक्रमणामुळे जीवितास धोका होऊन महामारीही पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुलाबसन्स डेअरी बाबत जर बोलायचे झाले तर म्हशींच्या मोठ्या संख्येमुळे निर्माण होणार्‍या शेणातून मिथेन हा विषारी वायुही तितक्याच जास्त प्रमाणात उत्सर्जित होतो आहे. यामुळे वायू प्रदूषणाची समस्याही निर्माण झाली आहे. येथील सर्व मलमूत्र कोणतीही प्रक्रिया न करता थेट जमिनीत उघड्यावर सोडण्यात येत असल्यामुळे परिसरातील शेतजमिनींतील क्षारांची पातळी ही प्रमाणापेक्षा जास्त वाढली आहे. यामुळे भविष्यात परिसरातील जमीन नापीक होऊ शकते. भविष्यात कॅटल कंट्रोल अॅक्ट(CCA) मध्येही बदल होणे गरजेचे आहेत. ज्यात ग्रामीण भागातील जास्त लोकवस्ती असलेल्या विभागांसाठी वेगळे नियम लावणे गरजेचे आहेत.

दरम्यान गटविकास अधिकारी, पनवेल यांच्या निर्देशानुसार नेरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी दिनांक १२ जुलै २०१३ रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास या तबेल्याच्या परिसरातील पाण्याच्या स्त्रोतांचे व मातीचे नमुने तपासण्याची विनंती केली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्र अधिकार्‍यांनी या तबेल्यास भेट दिली व त्यांच्या असे निदर्शनास आले की तबेला मालकाने गोबर गॅस प्लांट बसवलेला नव्हता शिवाय तबेल्यातून निर्माण होणारे सांडपाणी अशास्त्रीय पद्धतीने साठवणूक केल्याचे आढळले. यानंतर त्यांनी फक्त नेरे गावातील तीन ग्रामस्थांच्या विहीरीचे नमुने व तबेल्याच्या कूपनलीकेतील पाण्याचे नमुने भर पावसाळी हंगामात म्हणजेच ३१ ऑगस्ट २०१३ रोजी तपासणीसाठी घेतले. या सार्‍या नमून्यांच्या पृथकरण(टेस्टिंग) चा अहवाल हा अपेक्षेप्रमाणे नकारात्मक आला. याकडे कालांतराने नेरे ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास पत्राद्वारे पुनः एकवार पाण्याचे नमुने पावसाळी हंगामात न तपासता मार्च, एप्रिल किंवा मे महिन्यात ऐन उन्हाळ्यात तपासण्याबाबत विनंती करण्यात आली. पावसाळी हंगामात वाहत्या पाण्यामुळे असेही प्रदूषण करणारे घटक जमिनीत राहणे अशक्यच आहे. त्यामुळे अशा वेळी जर पाण्याचे व मातीचे नमुने तपासणीस नेले तर त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. आज जवळपास ८ वर्ष उलटून गेली परंतू महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीच कारवाई झालेली दिसत नाही. या परिसरात मागील काही वर्षात नवी घरेही बांधण्यात आली असून त्याच प्रमाणात बोअर वेल्स ची संख्याही वाढली आहे. आज नेरे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना या प्रदूषित पाण्यामुळे गंभीर आरोग्य विषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपेचं सोंग तर घेऊन बसलेलं नाही ना अशी शंका नक्कीच मनात दाटून येते आहे. याकडे गट विकास अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष घालत दुर्लक्ष करणार्‍या प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकार्‍यांविरोधात या आधीच तक्रार करणे अपेक्षित होते पण तसेही झाल्याचे दिसत नाही.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वेळीच अशा समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे

एवढी वर्ष गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई कधी?

गुलाबसन्स डेअरी फार्म या म्हशींच्या महाकाय तबेल्यातील व परिसरातील मुख्यत्वे बोअरवेल्समधील पाण्याचे नमुने तसेच तबेल्यास लागून असलेल्या मातीचे नमुनेही तात्काळ तपासले जाणे गरजेचे आहे. या तबेल्याची व येथील कर्मचार्‍यांची जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग तसेच नगररचना विभाग आदींमार्फत तपासणी व्हावी. तदनंतर या तबेल्या मार्फत एवढी वर्ष केल्या जात असलेल्या जल, वायु व मृदा प्रदूषणास करणीभूत असलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळासहित सर्व संबंधित विभागातील अधिकार्‍यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे त्याशिवाय प्रदूषणासारख्या गंभीर समस्येकडे नोकरशाही गांभीर्याने पाहणार नाही. या संदर्भात पर्यावरणवादी संघटनांनी पुढाकार घेत व्यापक मोहीम राबवणे ही काळाची गरज आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अशा तबेल्यांमार्फत होणार्‍या प्रदूषणाकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे नाहीतर ग्रामीण भागातील जीवनशैली व येथील लोकांचे आरोग्य दोन्ही बाधित होऊ शकते.

 

प्रदूषण, अनधिकृत बांधकाम, विकासकाकडून फसवणूक, सरकारी दिरंगाई व आर्थिक घोटाळे संदर्भातील आपल्या काही तक्रारी असतील तर महाराष्ट्र वार्ता डॉट कॉम च्या ‘आपली समस्या’ टीम ला आपण 88503 03463 वर व्हाट्सअप्प आणि news@maharashtravarta.com वर ईमेल द्वारे पुराव्यानिशी माहिती देऊ शकता.

महाराष्ट्र वार्ता ने पोलखोल केलेली राज्यातील इतर काही महत्वाची प्रकरणे वाचा

ठाकरे सरकारचे कॉंग्रेस नेता व गोरगरिबांची फसवणूक करणार्‍या बिल्डर रईस लष्करीयाला अभय?

 

पुणे पोलिस दलातील ‘या’ सचिन वाझे ला अटक कधी होणार? पीएसआय संतोष सोनवणे चे प्रताप उघड

 

Fraud! बंगळुरू येथील एस. वासुदेवन यांच्या ओझोन ग्रुप कडून पुणेकरांची करोडोंची फसवणूक

 

SCAM 693 CR! Labour Unions petition in Bombay High Court alleging scam in port trust hospital upgradation project

 

SCAM 2020! पुण्यातील ‘ऑसमॉस टेक्नॉलॉजी’ चा २३६ कोटींचा घोटाळा? न चुकता वाचा संपूर्ण रिपोर्ट

 

Scam: २३६ कोटींच्या ऑसमॉस(Osmose) टेक्नॉलॉजी घोटाळ्या प्रकरणी गृह विभागाने घेतली गंभीर दखल

 

Maharashtra Varta Exposes: Trustee Kersi Parekh alleges Scam in Mumbai Port Trust’s Super Speciality hospital project worth Rs. 693 crores

 

‘घरकुल एक्सप्रेस ग्लोबल’ ! आणखी एका घोटाळेबाज MLM कंपनीचा टीम महाराष्ट्र वार्ता ने केला पर्दाफाश

 

अजिंक्य डी. वाय. पाटील इन्फ्रा आणि झोडीयाक हीलोन्ट्रोनिक्स कंपनीला मुंबई पोर्ट ट्रस्ट कडून धक्का

घोटाळेबाज रुचिता जयपुरियार आणि गॅंगकडून लोकांना कोट्यावधींचा चुना; वाचा संपूर्ण बातमी

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *