Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Fraud! बंगळुरू येथील एस. वासुदेवन यांच्या ओझोन ग्रुप कडून पुणेकरांची करोडोंची फसवणूक

Ozone Groupच्या बेजबाबदारपणामुळे सामान्य ग्राहकांचा जीव टांगणीला; सिबिल (CIBIL) स्कोर ही झाले खराब

सध्याच्या जमान्यात प्रामाणिक बांधकाम व्यावसायिक सापडणे तसे मुश्किलच आणि अशातच जर तुमच्या नशिबी हेरा-फेरी करणारा बिल्डर आला तर सारा कारभार देवाच्याच हाती म्हणावा. साधारण जून २०२१ च्या मध्यावर महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम कडे पुण्यात राहणार्‍या ५ त्रस्त नागरिकांनी बंगळुरू येथील ओझोन ग्रुप Ozone Group या विकासकाने आपली फसवणूक केल्याबाबत माहिती देत या प्रकरणात आपली मदत करण्याची मागणी केली होती. पुणे येथे वास्तव्यास असलेल्या अनुक्रमे अनिष धर्माधिकारी, गिरीश सोनार, छाया यार्दी, सुहास मुळे व संतान जॉन डिसोझा यांनी २०१५ साली या विकासकाच्या कर्नाटकातील बंगळुरूस्थित देवनहल्ली येथील ‘ओझोन अर्बाना’ Ozone Urbana या गृहनिर्माण प्रकल्पात अंदाजे ६० लाख रुपये मूल्य असलेल्या एकूण ५ सदनिका १० टक्के रक्कम देत बूक केल्या होत्या. यावेळी या विकासकाने २०१८ साला पर्यंत सदनिकांचा ताबा देण्याचे लिखित स्वरुपात मान्य केले होते. या काळात उर्वरित ९० टक्के रकमेवर याच पाच जणांच्या नावे इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कडून सबवेंशन योजनेच्या आखत्यारीत विकासकाने कर्ज प्राप्त केले व ते सारे पैसे फक्त १०:८०:१० अशा तीन टप्प्यातच अल्पावधीत आपल्या खात्यावर वळवले. दरम्यान, विकासक या सार्‍यांचे प्री-ईएमआय भरत होता. परंतू, २०१८ साली घरांचा ताबा देण्याचे वचन त्याने काही पूर्ण केले नाही. अखेर या पाचही जणांनी आपली बूकिंग रद्द करण्याबाबत ओझोन ग्रुप कडे ईमेल व पत्राद्वारे मागणी केली. यानंतर या विकासकाने या पाच ग्राहकांचे पैसे सव्याज परत करणे अपेक्षित होते. तसेही झाले नाही.

या काळात ही मंडळी आपल्या नावावर असलेले कर्ज ट्रान्सफर करण्यासाठी व आपली १० टक्के रक्कम परत मिळवण्यासाठी विकासकाकडे वारंवार पाठपुरावा करत होती. परंतू, ओझोन ग्रुप ने या सार्‍यांना थातूर-मातूर उत्तरं देत त्यांची बोळवणचं केली. अशीच २ वर्ष गेली. २०२० सालात जागतिक महामारीने उच्चांक गाठला होता व याच दरम्यान ओझोन ग्रुप ने इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स चे प्री-ईएमआय चे हफ्ते भरणे बंद केले आणि इथेच माशी शिंकली! हफ्ते थकल्यावर मग या पाचही त्रस्त ग्राहकांना बँकेकडून वसुलीसाठी फोन, ईमेल व पत्र यायला लागली. कर्ज न भरल्यास कायदेशीर कारवाईची भीती घालण्यात यायला लागली. या काळात विकासकाने हात वर केल्यानंतर अखेर त्यांनी थेट महाराष्ट्र वार्ता च्या आपली समस्या टीम कडे मदत मागितली. यानंतर टाईम अँड टाईड या सल्लागार कंपनीच्या सहाय्याने तांत्रिक व कायदेशीर मदत मिळवत, बंगळुरू येथील विकासकाचा माग काढत त्याच्याकडे या बाबत विचारणा करण्यात आली. अखेर, त्याने गिरीश सोनार, छाया यार्दी, सुहास मुळे व संतान जॉन डिसोझा यांचे सदनिकेत गुंतवलेले १० टक्के पैसे टप्याटप्प्याने परत केले. यातही ओझोन ग्रुप ने सुरूवातीला दिलेले चेक बाऊन्स झाले होते. परंतू, अखेर त्याला नमते घ्यावे लागले. परंतू, अनिष धर्माधिकारी यांचे अर्धेच पैसे त्यांनी परत केले. आज परिवारात उद्भवलेल्या आरोग्य विषयक अडचणीच्या पार्श्वभूमीवर वारंवार विकासकाकडे तगादा लावूनही तो पैसे देत नसल्यामुळे ते मेटाकुटीस आले आहेत. या पाचही जणांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नसून त्या बाबतही ओझोन ग्रुप कडून कोणतेच उत्तर प्राप्त झालेले नाही. याच सोबत इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स च्या कर्जाची डोक्यावर असलेली टांगती तलवारही या सार्‍यांना सुखाने झोपू देत नाहीये.

महाराष्ट्र वार्ता च्या आपली समस्या टीम ने बंगळुरू येथील ओझोन ग्रुप चे मुख्य प्रवर्तक डॉ. एस. वासुदेवन व या कंपनीचे सीईओ बासकरन यांनाही वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू त्यात यश आले नाही. ओझोन ग्रुप च्या रिधिका व दिव्या अय्यर यांच्याकडून दर खेपेला एकचं उत्तर मिळते ते म्हणजे आम्ही या ग्राहकांचे पूर्ण पैसे देण्याचा व लोन चा विषय संपवण्याचा प्रयत्न करतोय. परंतू, अद्याप तसे काही होताना दिसत नाहीये. नुकतेच त्यांनी आपण जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात पैसे अदा करण्याचा वायदाही मोडला व आता मार्च २०२२ ची नवी तारीख त्यांनी धर्माधिकारी यांना दिली आहे. बंगळुरू येथील ओझोन ग्रुप बाबत खोलात शिरल्यावर कळले की महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यांतील शेकडो ग्राहकांना-गुंतवणुकदारांना अद्याप न घरांचा ताबा मिळाला आहे न त्यांनी गुंतवलेले पैसे परत त्यांना मिळालेले आहेत. शिवाय या सार्‍यांच्या मानगुटीवर इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, एचडीएफसी बँक सह इतर बँकांच्या कर्जाचे भूत हटण्याचे नाव घेत नाहीये. गत महिन्यात म्हणजेच डिसेंबर २०२१ मध्ये याच कारणासाठी १७ ग्राहकांनी एकत्र येत ओझोन ग्रुप व त्याच्या व्यवस्थापनाविरोधात पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. ज्यातील मुख्य तक्रारदार मोहित शर्मा यांनीही जवळपास १ कोटी मुल्याचे घर ओझोन अर्बाना या प्रकल्पात बूक केले होते व आताच्या घडीला बिल्डरच्या चुकांचं बिल त्यांना भरावं लागत आहे. त्यांनीही आतापर्यंत जवळपास २० लाख रुपये इतकी रक्कम प्री-ईएमआय पोटी भरली असून अद्याप त्यांना व त्यांच्यासारख्या इतर १६ त्रस्त ग्राहकांना घरांचा ताबा मिळालेला नाही.

५००० हजार घरांच्या या प्रकल्पात देशभरातील अनेकांनी आपल्या जीवनाची सबंध पुंजी गुंतवली असून यात वयोवृद्ध निवृत्त नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात भरणा आहे. शिवाय, बिल्डर च्या प्री-ईएमआय स्कीम ने तर शेकडो जणांच्या सीबील(CIBIL) स्कोअर चे पुरते बारा वाजले आहेत. त्यांना सध्या कोणतीही वित्त संस्था कर्ज उपलब्ध करून देण्यास इच्छूक नाहीये. त्यामुळे आपलं भविष्यात काय होणार याचीच चिंता त्यांना लागून राहिली आहे. ओझोन अर्बाना OZONE URBANA या प्रकल्पाबाबत बोलायचे झाले तर येथील अनेक इमारतींना अद्याप भोगवटा प्रमाणपत्र(Occupancy Certificate) मिळाले नसून त्यामुळे येथील रहिवाश्यांना वीज व पाण्याच्या उपलब्धतेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत बंगळुरूस्थित पत्रकार एस. ललिथा यांनी नुकतीच एका बातमीद्वारे वाचा फोडली आहे. या सार्‍या पार्श्वभूमीवर प्रश्न असा उद्भवतो की राज्या-राज्यात स्थापन करण्यात आलेली रेरा(RERA) प्राधिकरणे नेमकी कोणाला न्याय देण्यासाठी आहेत. जर एस. वासुदेवन/ओझोन ग्रुप (Dr. S. Vasudevan/Ozone Group) सारख्या विकासकांकडून लोकांची फसवणूक वारंवार होणार असेल तर मग RERA प्राधिकरणाची गरजच काय? याचा आता केंद्र व राज्य सरकारांनीही गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

या सार्‍या दुष्टचक्रात ग्राहक अडकण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळवण्याची लालसा!

या सार्‍या दुष्टचक्रात ग्राहक अडकण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळवण्याची लालसा! कोणतीही खातरजमा न करता रीयल इस्टेट दलाल व बिल्डर च्या विक्री प्रतीनिधीच्या मोठमोठ्या आमिषांना बळी पडून लोकं मागचा पुढचा विचार न करता आपले मेहनतीचे पैसे अशा ठिकाणी थेट गुंतवतात. शिवाय, ही बिल्डर मंडळीही आलिशान कार्यालयांचे व प्रशस्त सॅम्पल फ्लॅटचे मोठे देखावे रचण्यात माहिर असतात. सोबत, गूगल, फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम व छोट्यामोठ्या वृत्तपत्रांमार्फत ग्राहकांवर जाहिरातींचा सतत मारा केला जातो. शिवाय, एजंट्सना मोठे कमिशन मिळत असल्यामुळे ही मंडळीही भविष्यातील धोकयांबाबत गृहेइच्छूक ग्राहकाला सावध करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. अखेर, आपण पैसे गुंतवलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांचा ताबा मिळण्यास जेव्हा उशिर होतो तेव्हा मग सार्‍यांची तारांबळ उडते. विकासक फक्त “कसमे वादे प्यार वफा सब बाते है बातो का कया?” असेच अप्रत्यक्ष म्हणत असतो व या पीडित ग्राहकांसमोर ‘आज देतो उद्या देतो’ चे पाढे वाचत राहतो. मग अशा वेळी मेटाकुटीस आलेल्या या मंडळींना कुणी न्याय देतं का न्याय म्हणत RERA प्राधिकरण, पोलिस प्रशासन आदींकडे न्यायासाठी याचना करावी लागते. विकासक ही एक हुशार जमात असल्यामुळे ती मग अशा बर्‍याच प्रकरणांत संबंधितांना मॅनेज करत वेळ मारून नेतात.

सामान्य ग्राहकांना कायद्याचे तितकेसे ज्ञान नसल्यामुळे कित्येकदा हताश होऊन ते आपल्या आयुष्यभराच्या कमाईवर पाणी सोडूनही देतात. परंतू, अशा प्रकरणांत सक्षम प्राधिकरण अड्कित्त्यात अडकेलेल हे प्रकल्प दुसर्‍या विकासकास देऊन त्यांना न्याय मिळवून देऊ शकते हे त्यांच्या खिजगणतीतही नसते. एसआरए व म्हाडा प्रशासनाने याआधीही अनेक थकीत खाजगी प्रकल्प सक्षम विकासकांमार्फत पूर्ण केलेले आहेत. सरकारनेही वेळीच दखल घेतली तर अशा प्रकरणांत न्याय मिळवणे काही अवघड बाब नाही इतके नक्की फक्त यासाठी प्रामाणिक प्रयत्न व पाठपुरावा होणे गरजेचे आहे. तूर्तास माध्यम म्हणून महाराष्ट्र वार्ता ची टीम या त्रस्त ग्राहकांसोबत ठामपणे उभी आहे. येत्या काळात एस. वासुदेवन व ओझोन ग्रुप च्या व्यवस्थापनाविरोधात फौजदारी गुन्हा नोंदवण्याकामी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया पीडितांकडून केली जाणार आहे.

ओझोन ग्रुप च्या मुंबईतील इतर प्रकल्पांबाबत पुढील वृत्तात सविस्तर माहिती वाचकांना कळेलच.

अनधिकृत बांधकाम, विकासकाकडून फसवणूक, सरकारी दिरंगाई व आर्थिक घोटाळे संदर्भातील आपल्या काही तक्रारी असतील तर महाराष्ट्र वार्ता डॉट कॉम च्या ‘आपली समस्या’ टीम ला आपण 88503 03463 वर व्हाट्सअप्प आणि news@maharashtravarta.com वर ईमेल द्वारे पुराव्यानिशी माहिती देऊ शकता.

 

महाराष्ट्र वार्ता ने पोलखोल केलेली राज्यातील इतर काही महत्वाची प्रकरणे वाचा

ठाकरे सरकारचे कॉंग्रेस नेता व गोरगरिबांची फसवणूक करणार्‍या बिल्डर रईस लष्करीयाला अभय?

 

SCAM 2020! पुण्यातील ‘ऑसमॉस टेक्नॉलॉजी’ चा २३६ कोटींचा घोटाळा? न चुकता वाचा संपूर्ण रिपोर्ट

 

Scam: २३६ कोटींच्या ऑसमॉस(Osmose) टेक्नॉलॉजी घोटाळ्या प्रकरणी गृह विभागाने घेतली गंभीर दखल

 

Maharashtra Varta Exposes: Trustee Kersi Parekh alleges Scam in Mumbai Port Trust’s Super Speciality hospital project worth Rs. 693 crores

 

‘घरकुल एक्सप्रेस ग्लोबल’ ! आणखी एका घोटाळेबाज MLM कंपनीचा टीम महाराष्ट्र वार्ता ने केला पर्दाफाश

 

अजिंक्य डी. वाय. पाटील इन्फ्रा आणि झोडीयाक हीलोन्ट्रोनिक्स कंपनीला मुंबई पोर्ट ट्रस्ट कडून धक्का

 

घोटाळेबाज रुचिता जयपुरियार आणि गॅंगकडून लोकांना कोट्यावधींचा चुना; वाचा संपूर्ण बातमी

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *