१५ जूनपर्यंत राज्यात मान्सूनचा वेग मंदावण्याची शक्यता; शेतकऱ्यांना पेरणीबाबत सावधगिरीचा सल्ला
मुंबई, दि. ७ : राज्यात मान्सूनचे आगमन सुरू झाले असले तरी त्याची प्रगती अपेक्षित वेगाने होत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दक्षिण कोकणात मान्सून दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाच्या सध्याच्या अंदाजातून व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालींमध्ये अपेक्षित तीव्रता अद्याप निर्माण झालेली नसल्यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीचा वेग काहीसा मंदावू शकतो. त्यामुळे राज्यातील सर्व भागांमध्ये एकाचवेळी व्यापक आणि समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता सध्या कमी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्याच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १५ जूनपर्यंत दुपारनंतर ढगांची वाढ होऊन मेघगर्जनेसह विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता असली तरी हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीसाठी अनुकूल ठरेल, अशी स्थिती अद्याप निर्माण झालेली नाही.
दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. किमान १२ जूनपर्यंत विदर्भ आणि खानदेशातील काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहू शकते. तर मराठवाड्यात तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. उष्णता आणि आर्द्रतेमुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कृषी विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकऱ्यांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. आगामी काही दिवसांत होणाऱ्या विखुरलेल्या वादळी पावसाच्या आधारे पेरणीची घाई करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस झाल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे.
तसेच मेघगर्जना आणि विजांच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. विजांच्या कडकडाटावेळी झाडाखाली, टिनशेडखाली किंवा विद्युत रोहित्र, वीज खांब तसेच विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे. शेतात किंवा मोकळ्या जागेत काम करताना हवामानातील बदलांवर लक्ष ठेवण्याचा सल्लाही प्रशासनाने दिला आहे.
मान्सून कोकणात दाखल झाल्याने खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असली तरी पुढील काही दिवस राज्यभर समाधानकारक पावसाची शक्यता मर्यादित असल्याने नियोजनपूर्वक निर्णय घेण्याची गरज असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. हवामानातील बदलत्या परिस्थितीवर शासन आणि संबंधित यंत्रणा सातत्याने लक्ष ठेवून असून आवश्यक सूचना वेळोवेळी जारी केल्या जात आहेत.

