Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘घरकुल एक्सप्रेस ग्लोबल’ ! आणखी एका घोटाळेबाज MLM कंपनीचा टीम महाराष्ट्र वार्ता ने केला पर्दाफाश

‘घरकुल एक्सप्रेस ग्लोबल’ ! आणखी एका घोटाळेबाज MLM कंपनीचा टीम महाराष्ट्र वार्ता ने केला पर्दाफाश

पुणे : सामान्य माणसाला जास्त पैशांची लालसा दाखवून फसवणूक करणाऱ्या अनेक कंपन्या गेल्या तीन दशकात महाराष्ट्र व उभ्या देशाने पाहिल्या. या कंपन्यांमार्फत अनेक ठगांनी भोळ्या-भाबड्या लोकांची हजारो-लाखो कोटींची फसवणूक केली. यात जर महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर यात संचयनी, कल्पवृक्ष सारख्या अनेक गुंतवणूक कंपन्या होऊन गेल्या तर शेकड्यांनी मल्टी लेव्हल मार्केटिंग(MLM) कंपन्या झाल्या. अखेर केंद्र सरकारने या सर्व विविध गुंतवणूक योजना, MLM, चिट फंड चालवणाऱ्या कंपन्यांवर बंदी घातली. तरीही अद्याप हे प्रमाण काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आज आम्ही महाराष्ट्र वार्ताच्या ‘ऑपरेशन ब्लॅक मार्ट’ अंतर्गत पुण्यातील ‘घरकुल एक्सप्रेस ग्लोबल'(Gharkul Express Global) नामक सामान्य लोकांना बड्या उत्पन्नाचे आमिष दाखवून चूना लावणाऱ्या एका मल्टि लेव्हल मार्केटिंग कंपनीची पोलखोल करणार आहोत.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील ‘घरकुल एक्सप्रेस ग्लोबल’ या कंपनीबाबत टीम महाराष्ट्र वार्ताकडे तक्रार आली होती की ही कंपनी रिअल इस्टेट व्यवसायाच्या नावाखाली MLM योजना चालवत आहे. या संदर्भात आमच्या गुप्त प्रतिनिधीने या कंपनीच्या एक एजंट असलेल्या अनिता (नाव बदलले आहे) यांच्याशी संवाद साधत तपशीलवार माहिती मिळविली. यावेळी त्यांनी आपल्या उपस्थितीत सदर कंपनी जानेवारी महिन्याच्या अखेरीस डॉ. पराग पवार ( मु. जत, सांगली) व मोहन देठे यांनी सुरू केल्याचे सांगितले. साधारणपणे या कंपन्या चालवणाऱ्यांची एक क्लुप्ती असते की विक्रीला दाखवायची एक वस्तू आणि त्याच जोडीला मग लोकांकडून मेम्बरशीपच्या नावाखाली पैसे गोळा करायचे आणि मग A-B-C अशी चैन सिस्टिम तयार करायची, त्यात मग एक-एक आयडी जोडू तसे तुम्हाला पैसे मिळतील, मग पुढच्यांनीही जोड्या लावायच्या मग त्याचाही तुम्हाला फायदा दिला जाणार ई. ई… तर या मॅडम ने आमच्या गुप्त प्रतिनिधीला ११,००० रुपये भरून या स्कीम मध्ये सामील होण्यास सांगितले व व्हाट्सअप्प वर बँकेच्या अकाउंट नंबरसह या स्कीम बाबतचे सर्व तपशील पाठविले. त्यांची दुसरी स्कीम अशी की तुम्ही जर ‘घरकुल एक्सप्रेस ग्लोबल’ सोबत करार असलेल्या विकासकांकडील घरासाठी गिऱ्हाईक आणलं तर विक्री मुल्यावर तुम्हाला १० टक्के कमिशन मिळणार आणि अशी जर १० घरं तुम्ही विकली की तुमच्या घराचं कर्ज मुक्त होईल. अशा काहीशा जाडजुड स्कीम या घोटाळेबाजांनी आणल्या आहेत. दरम्यान लॉकडाऊन काळात या मंडळींचे उद्योग जोरातंच चालू होते. ‘झूम’ ऍप वरून मीटिंग च्या सत्रांवर-सत्र रोजच्या रोज होत आहेत. या मंडळींचे पुण्यात वाकडेवाडी जवळ एक आलिशान मुख्य कार्यालय असून भूमी मॉल, सी.बी.डी. बेलापूर(नवी मुंबई) व नाशिक येथेही कार्यालय असल्याचे अनिता नेे सांगितले. मुळात भूतो-न -भविष्यती अशा लॉकडाऊन मुळे आधीच सामान्य माणसाचे अर्थचक्र गोठले असून त्यात या अशा स्कीम मध्ये पैसे गुंतवून आपली उरली-सुरली पुंजीवरही तो पाणी फिरवत आहे. या कंपन्यांच आयुष्य काही महिने ते जास्तीत जास्त ३ वर्ष असतं हे विशेष.

डॉ. पराग पवार आणि मोहन देठे ही मंडळी गेली २० वर्ष आपल्यासोबत असून अनेक MLM कंपन्यांच्या स्कीम चालवल्याचे खुद्द अनिता ने कबूल केले. आताही मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबई पट्ट्यातील हजारो लोकांनी यांच्या योजनांत पैसे गुंतवले असून अनेक विकासकही या घोटळेबाजांच्या जाळ्यात अडकल्याचे आम्हाला कळले. या सर्व मंडळींना आणि या स्कीम चालवण्यासाठी सहाय्य करणाऱ्या इतर मेम्बरवर फसवणूक करणाऱ्या योजना (पोंझी स्कीम) चालवल्याच्या कलमा अंतर्गत अटकेची तात्काळ कारवाई होणे तसेच या महाठगांनी आधी ज्या ज्या योजना चालवल्या होत्या त्यांचा ईडी(सक्तवसुली संचालनालय) मार्फत तसेच राज्य आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत अग्रक्रमाने तपास होणे गरजेचे आहे. मुळात डॉ. पराग पवार आणि मोहन देठे यांनी एवढया मोठ्या प्रमाणात या कंपनीचे जाळे विणे पर्यंत पोलीस प्रशासन अद्याप साखर झोपेत कसं राहिलं हे अनाकलनीय आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता जातीने लक्ष घालत संबंधित डोळ्यावर पट्टी बांधलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. तरीही महाराष्ट्र वार्ता ची ईडी व आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा या दोन्ही विभागांना मदत राहिली आहे आणि भविष्यातही राहिल. पुढील भागात अशाच एका घोटाळेबाज कंपनीची पोलखोल आम्ही करणार आहोत जीची व्याप्ती देशभर पसरली आहे.

(या संदर्भात आम्ही दोन दिवसांपासून [२१ व २२ सप्टेंबर] या लोकांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत आहोत पण आम्हाला यांचे भ्रमणध्वनी देण्यास कोणीच इच्छुक नाही. आम्ही यांना अधिकृतपणे ई-मेलही केले आहेत परंतु अद्याप उत्तर आलेले नाही.)

आपल्या अवती-भवती ही अशाच प्रकारच्या घोटाळेबाज कंपन्यांचे उद्योग चालू असतील तर आम्हाला news@maharashtravarta.com वर मेलद्वारे व 9372236332 वर व्हाट्सआप द्वारे पुराव्यानिशी माहिती द्यावी आम्ही नक्कीच त्याची दखल घेत पोलीस यंत्रणेचे त्याकडे लक्ष वेधू.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *