प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य
बारामती, दि. ७ : राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बारामती आगारात नव्याने दाखल झालेल्या दहा अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बससेवेचे लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी एसटी महामंडळाने प्रवाशांच्या समस्या तत्परतेने सोडविणे, बसस्थानक परिसराची स्वच्छता राखणे, बससेवा वेळेवर चालविणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट निर्देश दिले.
बारामती बसस्थानक येथे आयोजित कार्यक्रमात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान २०२५’ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, एसटी महामंडळाचे पुणे विभाग नियंत्रक अरुण सिया, गट विकास अधिकारी किशोर माने, मुख्याधिकारी पंकज भुसे, विभागीय कामगार अधिकारी सचिन भुजबळ, आगार व्यवस्थापक प्रविण शिंदे, माजी सहाय्यक वाहतूक अधीक्षक घनश्याम सदाशिव शिंदे यांच्यासह विविध मान्यवर, कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दूरदृष्टीने काम केले. त्याच विकासदृष्टीतून उभारण्यात आलेले बारामती बसस्थानक आज देशातील आदर्श बसस्थानकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी स्वच्छता, शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था, प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा आणि सुयोग्य नियोजन यामुळे बारामतीने राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्यांनी सांगितले की, स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियानात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल बारामती बसस्थानकाला १ कोटी रुपयांचे पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. ही कामगिरी केवळ एसटी प्रशासनाची नसून संपूर्ण बारामतीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. या यशामुळे बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून भविष्यातही ही गुणवत्ता कायम राखण्यासाठी सर्वांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
नवीन ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बससेवेमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या बससेवांमुळे ग्रामीण आणि शहरी भागांतील प्रवाशांना अधिक दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, राज्याच्या कानाकोपऱ्यात सार्वजनिक वाहतूक सेवा पोहोचविण्यात एसटीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सेवा गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करणे, तक्रारींचे त्वरित निराकरण करणे आणि सुरक्षित प्रवासाची हमी देणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी बारामती बसस्थानकाच्या यशस्वी कामगिरीबद्दल अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांचे अभिनंदन करण्यात आले. नव्या स्मार्ट बससेवेच्या लोकार्पणामुळे बारामतीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी ऊर्जा मिळणार असून प्रवाशांसाठी अधिक आधुनिक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
