नागपूरमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई; २.६१ कोटी रुपयांचा ५२२.५५४ किलो गांजा जप्त, दोघांना अटक
नागपूर, दि. ७ : अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील मोहिमेला आणखी एक मोठे यश मिळवत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागातील नागपूर प्रादेशिक कार्यालयाने आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत अंदाजे २ कोटी ६१ लाख रुपये किमतीचा ५२२.५५४ किलो गांजा जप्त करण्यात आला असून दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे. तसेच सुमारे ८ लाख ५० हजार रुपये किमतीचे मालवाहू वाहनही जप्त करण्यात आले आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी काही दिवसांपासून संशयित हालचालींवर पाळत ठेवली होती. तपासादरम्यान ओडिशा-आंध्र प्रदेश सीमावर्ती भागातून मध्य भारत मार्गे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार विशेष पथकाने नागपूरजवळील मौदा परिसरातील मथनी टोल प्लाझा येथे सापळा रचून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरून येणाऱ्या एका मालवाहू ट्रकची तपासणी केली.
तपासणीदरम्यान टाटा मोटर्सच्या सोळा टन क्षमतेच्या लाँग प्लॅटफॉर्म ट्रकची सखोल झडती घेण्यात आली. यावेळी वाहनामध्ये अत्यंत कौशल्याने तयार करण्यात आलेल्या गुप्त कप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा लपवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले. चालकाच्या आसनामागील विशेष कप्पे, चालक व सहप्रवाशांच्या आसनांवरील पोकळी, मालवाहू भागाखालील कुलूपबंद साधनपेटी तसेच चालक कक्षाच्या वरच्या भागात हे अमली पदार्थ लपविण्यात आले होते.
अधिकाऱ्यांनी वाहनातून खाकी रंगाच्या प्लास्टिक टेपने स्वतंत्रपणे गुंडाळलेली एकूण २४७ पाकिटे जप्त केली. या आठ मोठ्या पिशव्यांमध्ये मिळून ५२२.५५४ किलो गांजा आढळून आला. अमली पदार्थ आणि मनोप्रभावी पदार्थ प्रतिबंधक कायदा, १९८५ अंतर्गत हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणात वाहनातील दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. तस्करीच्या जाळ्याशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी चौकशीचा विस्तार केला आहे. या अमली पदार्थांचा पुरवठा महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये करण्याचा कट असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाने याआधीही याच वर्षात दोन स्वतंत्र मात्र परस्परांशी संबंधित कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त केला होता. त्या कारवायांमध्ये तब्बल १ हजार २५० किलो गांजा जप्त करण्यात आला होता, ज्याची अंदाजित किंमत ६ कोटी २५ लाख रुपये होती. त्या प्रकरणात तस्करी रॅकेटच्या प्रमुख सूत्रधारासह चार जणांना अटक करण्यात आली होती.
राज्यांच्या सीमावर्ती भागांचा वापर करून चालविण्यात येणाऱ्या संघटित अमली पदार्थ तस्करीविरोधात महसूल गुप्तचर संचालनालयाने सातत्याने कठोर कारवाई सुरू ठेवली आहे. अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापारावर आळा घालण्यासाठी तसेच युवकांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत विविध तपास आणि अंमलबजावणी मोहिमा राबविण्यात येत आहेत.
महसूल गुप्तचर संचालनालयाने नागरिकांनाही आवाहन केले आहे की, अमली पदार्थांची तस्करी, साठवणूक किंवा विक्री यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास ती तात्काळ संबंधित यंत्रणांना कळवावी. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. नागरिकांच्या सहकार्यामुळे अमली पदार्थांविरोधातील लढा अधिक प्रभावी होण्यास मदत होईल तसेच सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक सुरक्षिततेचे संरक्षण करण्यासाठी बळकटी मिळेल.
नागपूर प्रादेशिक कार्यालयाने केलेली ही कारवाई अमली पदार्थ तस्करीविरोधातील लढ्यातील महत्त्वपूर्ण यश मानली जात असून संघटित गुन्हेगारीविरोधातील यंत्रणांची सज्जता आणि कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
