राज्यभर गुटखा-पानमसालाविरोधात मोठी कारवाई; पाच दिवसांत १९५ धाडी, १९२ जणांना अटक
मुंबई, दि. ७ : राज्यातील प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम अन्नपदार्थांच्या अवैध उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने हाती घेतलेली विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, अवघ्या पाच दिवसांत राज्यभरात व्यापक कारवाया करण्यात आल्या आहेत. १ जून ते ५ जून २०२६ या कालावधीत विविध जिल्ह्यांमध्ये टाकण्यात आलेल्या १९५ धाडींमधून तब्बल १ कोटी ९९ लाख १८ हजार ४७५ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून १९२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
राज्यातील युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण रोखणे, सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करणे आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापारावर नियंत्रण आणणे या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे. विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभरातील अधिकारी आणि तपास पथके सातत्याने कारवाई करत असून दोषींविरुद्ध कठोर कायदेशीर उपाययोजना केल्या जात आहेत.
या कारवायांदरम्यान भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील कलम २६, २७, ३०(२)(अ) आणि कलम ५९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या संपूर्ण साखळीवर कारवाई करण्यासाठी उत्पादन केंद्रे, गोदामे, वाहतूक व्यवस्था आणि विक्री केंद्रांवर एकाचवेळी धाडी टाकण्यात येत आहेत.
विशेष मोहिमेअंतर्गत ३ जून २०२६ रोजी धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे टाकण्यात आलेल्या धाडीत सुमारे २३ लाख ५० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर ४ जून रोजी समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाका परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत ६० लाख ५० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित माल आणि संबंधित वाहन जप्त करण्यात आले. याच दिवशी नांदेड जिल्ह्यात झालेल्या धडक कारवाईत १७ लाख ५२ हजार ४५० रुपये किमतीचा साठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड परिसरातील मोशी येथेही तपास पथकाने मोठी कारवाई करत ६ लाख १९ हजार ९८२ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त केला. या प्रकरणात सहा व्यक्तींविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, ५ जून २०२६ रोजी धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात संशयित ठिकाणी छापा टाकून १ कोटी २ लाख ६७ हजार २६३ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली असून तपास यंत्रणा या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्तींचा शोध घेत आहेत.
विभागीय स्तरावरील कारवाईचाही आढावा घेतल्यास, बृहन्मुंबई क्षेत्रात ३० धाडी टाकण्यात आल्या. या कारवायांमध्ये ३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ३० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. पुणे विभागात ७९ धाडी टाकून ८ लाख १९ हजार रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला असून ७८ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सह आयुक्त (अन्न) महेश ना. चौधरी यांनी दिली.
अन्न व औषध प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे की, प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधातील मोहीम पुढील काळात आणखी तीव्र करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष तपास पथके कार्यरत असून अवैध व्यापार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.
सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या अशा प्रतिबंधित पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे अशा बेकायदेशीर साखळ्यांवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण मिळवणे शक्य होणार असल्याचे विभागाने नमूद केले आहे.

