Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवसेनेची शिस्त मोडीत! हकालपट्टी केलेल्या पदाधिकाऱ्याचे थेट रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांना आव्हान

नवनियुक्त शिवसेना नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख यांच्या मार्गात माजी पदाधिकऱ्यांचा अडसर

पनवेल/रायगड, दि.२३: मुंबई लगत असलेल्या ठाणे, नवी मुंबई, उरण पट्ट्यात राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचं अस्तित्व ठळकपणे जाणवतं. परंतू, नवी मुंबई-उरण ला अगदी खेटून असलेल्या पनवेल तालुक्यात शिवसेना काही अपवाद वगळता औषधालाही सापडणे मुश्कील. इथल्या शिवसेनेचं अस्तित्व बॅनर पुरतं मर्यादित आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरू नये. पाचच वर्षांपूर्वी नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेत शिवसेनेचा साधा एक नगरसेवकही निवडून आलेला नाही. याला प्रमुख कारण म्हणजे इथे शिवसेनेत चालू असलेल्या अंतर्गत बंडाळी-वाद व एकीचा अभाव हे आहे.

अशाच प्रकारचा नवा वाद सध्या नवीन पनवेल शहर परिसरात पाहायला मिळत आहे. त्याचं झालं असं की, संघटनात्मक पातळीवर मृतावस्थेत असलेल्या शिवसेनेला नवसंजीवनी देण्यासाठी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी महिन्याभरापूर्वी रुपेश ठोंबरे यांची उचलबांगडी करत यतीन देशमुख यांची शिवसेना पनवेल शहर प्रमुखपदी तर ज्ञानेश्वर भंडारी यांची उपशहर प्रमुखपदी नियुक्ती केली. परंतू मागील दोन दिवसांपासून नवीन पनवेल शहर परिसरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लावलेल्या बॅनरवर पदावरून दूर केलेल्या रुपेश ठोंबरे यांच्या नावापुढे शहरप्रमुख लिहिलेले पाहायला मिळतेय. तर लगतच नवनियुक्त शहरप्रमुख यतीन देशमुख यांचेही शुभेच्छापर बॅनर पाहायला मिळत आहेत. हे दृश्य साऱ्यांचं लक्ष वेधत असून या प्रकारामुळे परिसरातील शिवसैनिकांत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

पक्षांतर्गत वाद पनवेल शिवसेनेला काही नवे नाहीत. परंतू, अशा प्रकारे पक्षशिस्तीला धाब्यावर बसवून निष्कासित पदाधिकाऱ्याने शहरभर बॅनर लावत पदावर आपला उघड दावा करणे प्रथमतःच घडतंय. गेल्या दोन वर्षांपासून रुपेश ठोंबरे यांच्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी येत होत्या ज्याची खातरजमा केल्यावर जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी त्यांची गत महिन्यात शिवसेना नवीन पनवेल शहर प्रमुख पदावरून हकालपट्टी केली. ठोंबरेच्या कार्यकाळात पक्षवाढीशी निगडित ठोस असे कोणतेच काम झालेले नसल्याची शिवसैनिकांत चर्चा असून त्याच्याच जोडीला तुलना केल्यास लगतच्या शिवसेना खांदा कॉलनी शहर प्रमुखपदी असलेल्या सदानंद शिर्के यांची कामगिरी उजवी असल्याचे कळते. कोविड काळातही स्वतःच्या विभागासह नवीन पनवेल विभागातील लोकांच्या मदतीला जात पक्षवाढीत योगदान दिल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत आहे.

आणखी एक बाब दृष्टीस पडते ती म्हणजे रुपेश ठोंबरे यांच्या प्रत्येक बॅनरवर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवसेनाप्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो जेवढे ठळक नसतात तेवढा अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांचा मोठा फोटो असतो. मुळात शिवसेना पनवेल विभागाशी थेट कोणताही संबंध नसताना स्थानिक जिल्हाप्रमुखाला दुय्यम स्थान देत आमदार दळवींचा फोटो लावण्यामागचे प्रयोजन अनाकलनीयच म्हणावे. परंतू, आता प्रश्न असा उपस्थित होतो की पक्षशिस्तीला वेशीवर टांगणाऱ्या अशा पदाधिकाऱ्यांना आशिर्वाद कोणाचे म्हणावे? शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हे सारे प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देतात का याचीच शंका आहे.

शिवसेनेसारख्या केडर बेस पक्षात जर विद्यमान पदाधिकाऱ्यांविरोधात उघड बंडाळी करत बॅनरबाजी केली जात असेल तर हाच कित्ता भविष्यात राज्यातील इतर जिल्ह्यांतील पदाधिकारी गिरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शिर्षस्थ नेते आता कोणती भूमिका घेतात हे पाहणे लक्षणीय ठरेल.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *