प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध; मेहकर आगाराला लवकरच ३० नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस
बुलढाणा, दि. ८ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आधुनिकीकरण मोहिमेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे उभारण्यात आलेल्या नव्या अत्याधुनिक बसस्थानकाचे लोकार्पण परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रवाशांना सुरक्षित, आधुनिक, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांना या प्रकल्पामुळे बळ मिळणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, सिद्धार्थ खरात, मेहकर नगरपालिकेचे अध्यक्ष किशोर गारोडी, माजी आमदार संजय रायमुलकर, प्रादेशिक व्यवस्थापक रोहन पलंगे, विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाठ, कार्यकारी अभियंता राहुल मोडक, एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, मेहकर हे विदर्भातील व्यापारी, शैक्षणिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असून दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास करतात. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून अत्याधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन हे नवीन बसस्थानक उभारण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवासाचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.
सन २०१९ मध्ये या प्रकल्पाला ३ कोटी ९ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. विविध तांत्रिक अडचणी तसेच कोविड काळातील अडथळ्यांवर मात करत अखेर हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. नव्या बसस्थानकात सहा व्यावसायिक गाळे, चालक-वाहक विश्रांतीगृह, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रतीक्षागृहे, अधिकारी विश्रांतीगृह, आरक्षण व चौकशी कक्ष, हिरकणी कक्ष, दिव्यांगांसाठी स्वतंत्र रॅम्प आणि स्वच्छतागृहे, आधुनिक प्रसाधनगृहे, उपाहारगृह, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पोलीस चौकी आणि पार्सल कक्ष यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
बसस्थानकाच्या वाहनतळाच्या काँक्रीटीकरणासाठी मंजूर करण्यात आलेल्या ४ कोटी २२ लाख रुपयांच्या कामाचीही यशस्वी पूर्तता झाली असून बचत झालेल्या निधीतून आगार परिसरातील अतिरिक्त काँक्रीटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर अधिक स्वच्छ, सुबक आणि टिकाऊ स्वरूपाचा होणार आहे.
यावेळी एसटीच्या आधुनिकीकरण मोहिमेचा आढावा घेताना प्रताप सरनाईक म्हणाले की, केवळ नवीन इमारती उभारणे हा उद्देश नसून प्रवाशांना विमानतळाच्या धर्तीवरील स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे हे महामंडळाचे ध्येय आहे. राज्यभर बसस्थानके, आगारे आणि बसेसमध्ये दर्जात्मक बदल घडवून आणण्याचे काम सुरू आहे.
स्वच्छता मोहिमेअंतर्गत १ जूनपासून राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात आली आहेत. बसस्थानके, बसेस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि परिसराच्या नियमित स्वच्छतेसाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मेहकर परिसरातील लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेत आगारासाठी लवकरच ३० नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा प्रताप सरनाईक यांनी केली. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांना अधिक सक्षम व आरामदायी सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
राज्यभर इलेक्ट्रिक बससेवा विस्तारण्याच्या महामंडळाच्या धोरणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सन २०३५ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे लक्ष्य साध्य झाल्यास पूर्णपणे इलेक्ट्रिक बससेवा देणारे देशातील पहिले राज्य परिवहन महामंडळ म्हणून महाराष्ट्र एसटीची ओळख निर्माण होईल.
या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी राज्यभरातील डेपो, बसस्थानके आणि कार्यशाळांमध्ये चार्जिंग केंद्रांचे जाळे उभारले जात आहे. एसटीच्या बसांसोबतच इतर इलेक्ट्रिक वाहनांनाही या सुविधांचा लाभ मिळणार आहे. पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी सौरऊर्जेचाही वापर वाढविण्यावर भर दिला जात असून अनेक डेपोच्या छतांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध असलेल्या ठिकाणी ‘सौर शेती’ प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण आणि महसूलवाढ या तिन्ही उद्दिष्टांची पूर्तता या उपक्रमांमुळे होणार असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित ऊर्जा व पर्यावरणपूरक वाहतूक धोरणाशी सुसंगत अशी ही वाटचाल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मेहकर डेपोचे महत्त्व अधोरेखित केले. चार तालुक्यांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर या डेपोवर अवलंबून असल्याने नव्या बसस्थानकामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध सवलतीच्या योजनांचा लाभ अधिकाधिक प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रताप सरनाईक यांनी मेहकरच्या नागरिकांना नव्या बसस्थानकाची स्वच्छता, सुरक्षितता आणि जतन करण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. “ही वास्तू केवळ एसटी महामंडळाची नसून मेहकरकरांची सामूहिक संपत्ती आहे. तिचे संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.
अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि प्रकल्पाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे अभिनंदन करत त्यांनी “प्रवाशांची सेवा हेच आमचे ध्येय असून आधुनिक, सुरक्षित आणि स्वच्छ एसटी हीच आमची वचनबद्धता आहे,” असा विश्वास व्यक्त केला. नव्या बसस्थानकामुळे मेहकर शहराच्या विकासाला नवी चालना मिळण्याबरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही अधिक सक्षम होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

