मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय
मुंबई, दि. १९ : राज्यातील उच्च शिक्षण आणि आधुनिक शैक्षणिक सुविधांना चालना देण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून ॲमिटी विद्यापीठाची मुळ संस्था असलेल्या रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशनला रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे भाताण येथे सुमारे १५ एकर जमीन उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे ॲमिटी विद्यापीठाच्या शैक्षणिक विस्ताराला गती मिळणार असून विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, संशोधन केंद्रे आणि निवासी व्यवस्था विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.
रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशनच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या ॲमिटी विद्यापीठात सध्या १८ विविध शाखांमधून शैक्षणिक अभ्यासक्रम राबविले जात आहेत. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विधी, माध्यमशास्त्र, जैवतंत्रज्ञान, संगणकशास्त्र तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी हे विद्यापीठ ओळखले जाते. सध्या येथे ५ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून भविष्यात नवीन अभ्यासक्रम आणि संशोधन प्रकल्प सुरू करण्यासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर संस्थेने शासनाकडे विस्तारासाठी जमिनीची मागणी केली होती. त्यानुसार मौजे भाताण, ता. पनवेल, जि. रायगड येथील सर्वे क्रमांक ८/०, ९/२, १०/३, १३/५, १४/०, १६७/१, १७८/० आणि १८२/४ या आकारीपड जमिनीपैकी सुमारे १५ एकर जमीन विशेष बाब म्हणून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
शासनाच्या निर्णयानुसार ही जमीन कब्जेहक्काची रक्कम भरून वर्ग-२ धारणाधिकार तत्वावर संस्थेला उपलब्ध करून दिली जाणार आहे. या जमिनीवर शैक्षणिक संकुल, आधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, क्रीडा संकुल तसेच खेळाची मैदाने उभारण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा विस्तार महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
पनवेल आणि नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक, औद्योगिक आणि पायाभूत विकास होत असताना या भागात उच्च शिक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीलाही वेग मिळत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प आणि वाढती नागरी वसाहत यामुळे पनवेल परिसर शिक्षणाचे उदयोन्मुख केंद्र म्हणून विकसित होत आहे. अशा परिस्थितीत ॲमिटी विद्यापीठाच्या विस्तारामुळे राज्यातील तसेच देशभरातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि बहुआयामी शिक्षण सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
राज्य शासनाने शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकास क्षेत्रात खाजगी शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून दर्जेदार सुविधा निर्माण करण्यावर भर दिला असून, त्याच धोरणाचा भाग म्हणून हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच या प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती, पूरक व्यवसाय आणि सेवा क्षेत्रालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
