येत्या १९ जून रोजी शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वर्तमानाचा टप्प्याटप्प्याने घेतलेला आढावा वाचा
‘आवाआ..ज कुणाचा, शिवसेनेचा” ही आरोळी शिवसैनिकांनी गेल्या दीड वर्षात अभावानेच ललकारली असेल. याचं कारण रस्त्यावरची लढाई लढणारी शिवसेना सत्तेत येणं हे आहे ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसैनिकांनी ठाकरे घराण्यातील व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान केली. शपथविधी सोहळ्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाजवळ केलेला जल्लोष उभ्या महाराष्ट्राने पाहिला. दरम्यानच्या काळात शिवसैनिक रस्त्यावर कमी आणि फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच विरोधीपक्ष भाजपशी भांडताना दिसले. पण याच काळात भारतीय जनता पक्षाचे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतचे नेते सत्ताधारी महाविकासआघाडी विरोधात रस्त्यावर येऊन आक्रमकपणे आंदोलन करताना दिसले व अद्यापही दिसत आहेत. शिवाय याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसही केंद्रातील मोदी सरकारविरोधात रस्त्यावर येऊन संघर्ष करत आहेत. हल्लीच त्यांनी इंधन दरवाढी विरोधात देशव्यापी आंदोलन केले होते. ज्यात उभ्या महाराष्ट्राने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आक्रमकता पाहिली.
या साऱ्याकडे पाहून एक बाब प्रकर्षाने जाणवते की शिवसेना सत्तेत गेली, पण या मागील दीड वर्षात शिवसेनेची संघटनात्मक शक्ती क्षीण झाली. शिवसेनेतील आक्रमक नेते सत्तेत वाटेकरी होत मंत्रिपदि विराजमान झाले परंतू त्यांच्या जागी संघटनात्मक वाढीसाठी नवीन फळीची उभारणी केली गेली नाही. शिवसेना सत्तेत आल्याआल्या नव्या दमाच्या शिवसैनिकांची दुसरी फळी उभी करेल असे राजकीय जाणकारांना वाटले होते. परंतू पक्षप्रमुख स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्यात त्यांचे पुत्रही मंत्री झाले. त्यामुळे शिवसेना आणखी खोलवर रुजण्यापेक्षा मुळमुळीत-गुळगुळीत झाली.
कधीकाळी आपल्या नेत्याला अरे केल्यावर थेट समोरच्या मोठ्यात मोठ्या नेत्याला भिडणारे नेते व शिवसैनिक सध्या प्रमाणापेक्षा जास्त मवाळ झालेले दिसत आहेत. याची पहिली झलक दिसली, गतवर्षी अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर. त्यावेळी भाजपच्या नेत्यांकडून तसेच अभिनेत्री कंगना रानावत हिच्याकडून आदित्य यांच्यावर आरोपांच्या फैरी च्या फैरी झाडल्या जात होत्या. कंगना ने तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेखही केला होता. यावेळी शिवसैनिकांकडून आक्रमकतेचे दर्शन होणे अपेक्षित होते. जुन्या शिवसैनिकांच्या मते अशा ‘छप्पन टिकली’ अभिनेत्री च्या तोंडाला सेनेच्या रणरगिणीकडून काळं फासून निषेध होणे गरजेचं होतं. पण झालं उलटं, यावेळी शिवसेना नेते दो कदम पिछे झाले व अशा कठीण प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे अक्षरशः एकटे पडले.
सत्तेच्या मखमली बिछायतीवर लोळत पडलेल्या सेना नेत्यांच्या संघटनेप्रती असलेल्या उदासीन वागणुकीमुळे दिवंगत शिवसेनाप्रमुखांनी ज्याला ‘धगधगता निखारा’ अशी उपमा दिली होती तो सामान्य शिवसैनिकही आता ‘थंड’ पडला असून त्याच्यातील रस्त्यावर उतरून लढण्याची गर्मी आणि उर्मीही नामशेष झालीय इतकं नक्की. दुसर्या बाजूला भाजपच्या प्रवीण दरेकर, नितेश राणे, नीलेश राणे, चित्रा वाघ आदि नेत्यांची आक्रमकता नक्कीच वाखाणण्यासारखी आहे. यातील प्रवीण दरेकर आणि राणे बंधु यांची पार्श्वभूमी ही शिवसेनेशी जोडली गेली आहे. आपली आक्रमकता, आपलं लढवैय्येपण शिवसैनिक गमावून बसलाय याची जाणिव राष्ट्रावादी काँग्रेसच्या पदराआड बसलेल्या सत्तालोलुप सेना नेत्यांना आहे, पण वैयक्तिक स्वार्थापोटी त्यांनी स्वतःच्या डोळ्यांवर झापड लावली आहे. याचे दुष्परिणाम खेड-पुण्यातील ताज्या घटनेसारखे नजिकच्या काळात पक्षाला भोगावे लागतील व सध्या सत्तेची मधुर फळे चाखणारी शिवसेना आणखी रसातळात जाईल इतकं नक्की !
पुढच्या भागात वाचा सेनेतील कथित ‘बडव्यांची’ संपूर्ण कुंडली