माशांचा वास येतो म्हणून दादर येथील मंडईवर झालेला पाडकामाबाबत ज्येष्ठ पत्रकार मल्हारराव मोहिते यांचा ठाकरे बंधूंना तिखट सवाल
मुंबईतील दादरस्थित मीनाताई ठाकरे मासळी मंडईवर ९ ऑगस्ट रोजी महापालिकेने बुलडोझर चालवला आणि एकाएकी इथे मासे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी महिलांवर आभाळ कोसळलं. हे मार्केट माशांचा वास येतो या कारणासाठी पाडलं असल्याचं आता समोर येत आहे. या मार्केटवर पालिकेची कारवाई सुरू होताच मासे विक्री करणाऱ्या महिलांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली परंतू त्याचाही काहीएक फायदा झाला नाही. चक्क त्याचवेळी मंडईवर बुलडोझर फिरत होता. येथील मासे काही विक्रेत्यांना आता ऐरोली तर बाकीच्यांना अंधेरी मरोळ मार्केट मध्ये जागा देण्यात आली असल्याची माहिती जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी माध्यमांना दिली.
मुंबईतल्या मूळ कोळी बांधवांवरच आता निर्वासित होण्याची वेळ आल्याचं चित्र असून त्यावर ज्येष्ठ पत्रकार व टीकाकार मल्हारराव मोहिते यांनी कठोर टिप्पणी करत दोन्ही ठाकरे बंधूंना शालजोडीतले हाणत मूळ मुंबईकर कोळी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाबाबत त्यांना काही सवालही केले आहेत. वाचा नेमकं काय म्हणाले आहेत ते.
कसली शिवसेना कुठे आहे शिवसेना ??
कशाची मनसे ?? कुठे गेली यांची माणसे ??
मुंबई ही मुळची कोळी बांधवांची, त्यांनी या मुंबईच्या बेटांवर खरे राज्य केले, त्यांचे अस्तित्व होते म्हणून इथे घाई होती, गडबड होती, बडबड होती, गाणी होती, सण होते, वाडे होते, वास होता, आवास होता निवारा होता गोषवारा होता आणि मुंबई खरी मुंबई होती. पण याच मुंबईत पन्नास पंचावन्न वर्षांच्या अथक परिश्रमानंतर बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होऊन मग भले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पाश्च्यात त्यांच्या मुलाला त्यांच्या शत्रूंची साथ घ्यावी का लागेना. ते असो, तर बाळासाहेबांचे सो कोल्ड स्वप्न पूर्ण झाले आणि एकदाचा शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला. पण, त्याचा शिवसेनेला काय उपयोग झाला !! घंटा !! शिवसैनिक बिचारा उपाशी आणि दिवस काढतोय कशीबशी !! केवळ शिवसैनिक आणि त्याच्या जोडीला शिवसेना सोडून मनसे बनवलेला मनसैनिकच नाहीतर मुंबईतला मूळ रहिवासी असलेला कोळी देखील याच काळात देशोधडीला लागला. नुकत्याच दोन कोळी बांधवांच्या हक्काच्या जागा महापालिकेने जमीनदोस्त केल्या. एक जागा दादरच्या फुलमार्केट च्या बाजूला असलेली आणि दुसरी फोर्टच्या मनीष मार्केट च्या बाजूला असलेली. वर्षानुवर्षे कोळी बांधव इथून माशांचा बाजार भरवून होलसेल ने मासे ने आण करायचे. आता अचानक हे दोन्ही मच्छिमार्केट महापालिकेने तोडून जमीनदोस्त केले. कारण काय असेल तर, तेथे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्या मच्छी मार्केट मुळे होणाऱ्या वासाचा त्रास होतो म्हणून !! आता बोला !! दादरला गुजराती वस्ती आहे आणि फोर्ट ला तर स्टेशन च आहे शिवाय तिथे मुस्लिम वस्ती आहे त्यामुळे माशांचाही त्रास कोणाला होत होता त्यांनाच ठाऊक. पण घडले ते अघटीत. मराठी बांधवांसाठी झगडणाऱ्या, कोळी बांधवांसाठी लढणाऱ्या शिवसेनेची महापालिका, राज्यात सत्ता असतानाही कोळी बांधवांवर अन्याय झाला. शिवसेना काही करत नाही म्हणून हे राज ठाकरे यांच्या कडे गेले तर तिथेही हाती घंटा काही नाही. हे ठाकरे आता सत्तेचा मलिदा खाण्यात दंग झालेत कुठे गेली ती शिवसेना ? कुठे गेली ती मनसे ? कुठे गेली यांची माणसे ??
– मल्हारराव मोहिते (वरिष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक-टीकाकार) E-mail : malharrao1955@gmail.com
(बंडखोर ब्लॉग मधील लेखांत व्यक्त झालेली मतं ही त्या लेखकाची वैयक्तिक मतं असून महाराष्ट्र वार्ता हे फक्त एक माध्यम आहे)