स्वायत्त महाविद्यालयांसाठी राज्यस्तरावर एकसमान मार्गदर्शक सूचना; १५ ऑगस्टपूर्वी धोरण जाहीर करण्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश
मुंबई, दि. २२ : राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांच्या कामकाजात अधिक सुसूत्रता, पारदर्शकता आणि एकरूपता आणण्यासाठी राज्यस्तरावर एकसमान मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येणार आहेत. या मार्गदर्शक सूचना १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी अंतिम करून निर्गमित करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेला (महासार्क) दिले आहेत. मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीला आमदार सतीश चव्हाण यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांकडून आकारण्यात येणारी विविध शुल्के, त्या शुल्कांना संबंधित विद्यापीठांची मान्यता, संलग्नीकरण शुल्क, तसेच सुरू असलेले आणि नव्याने प्रस्तावित अभ्यासक्रम या विविध विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करताना सर्व स्वायत्त महाविद्यालयांमध्ये समान धोरण आणि कार्यपद्धती लागू व्हावी, यासाठी राज्यस्तरावर एकसमान मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, राज्यात सध्या उच्च शिक्षण विभागांतर्गत १५१ स्वायत्त महाविद्यालये कार्यरत असून, ही महाविद्यालये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करीत आहेत. बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेनुसार अभ्यासक्रम, परीक्षा, शुल्क, प्रशासन आणि शैक्षणिक गुणवत्ता यामध्ये एकसमानता राखण्यासाठी स्पष्ट धोरण आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीत ठरल्याप्रमाणे या मार्गदर्शक सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २०२३ मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेच्या आधारे तयार करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेची जबाबदारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (महासार्क) यांच्याकडे सोपविण्यात आली असून, १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी अंतिम मसुदा तयार करून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.
याशिवाय, २४ जुलै २०२६ रोजी पुणे येथील महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) येथे राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत स्वायत्त महाविद्यालयांच्या विविध प्रशासकीय, शैक्षणिक आणि धोरणात्मक प्रश्नांवर विशेष सत्र घेण्यात येणार असून, नव्या मार्गदर्शक सूचनांबाबतही सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांच्या कामकाजात एकसमान धोरण लागू झाल्यास शुल्क संरचना, अभ्यासक्रमांची अंमलबजावणी, प्रशासनातील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधांमध्ये अधिक स्पष्टता व सुसंगती निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
