दिल्लीतील आंदोलनावर उदय सामंत यांनी केलं भाष्य
मुंबई, दि. २२ : नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर आणि आंदोलनकर्त्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जाच्या घटनेवर राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना(शिंदे गट) नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. अभिजीत दिपके आणि आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करतानाच आंदोलनात बाहेरून घुसखोरी झाल्यामुळेच परिस्थिती चिघळली आणि त्यातून लाठीचार्ज झाला, असा दावा त्यांनी केला.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत म्हणाले की, “चौथ्या स्तंभाबद्दल मला आदर आहे, अभिजीत दिपके यांच्या माणसाने दिल्ली पोलिसांना मारहाण केली असं मी म्हणत नाही. मात्र, बाहेरून घुसलेल्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हे कृत्य केले आहे. म्हणूनच तो लाठीचार्ज झाला, हे पाप विरोधकांचे आहे. आंदोलनामध्ये घुसकोरी केली नसती तर लाठीचार्ज झाला नसता.”
दिल्लीत नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या विरोधात विद्यार्थी आणि कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू असून, अलीकडेच झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर या प्रकरणावरून देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर टीका केली असून, सत्ताधारी पक्षाकडून मात्र पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करण्यात येत आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी आंदोलनातील विद्यार्थ्यांविषयी सहानुभूती व्यक्त केली. ते म्हणाले, “नीट पेपरफुटीवरून सुरू असलेल्या आंदोलनातील अभिजीत दिपके आणि विद्यार्थी यांच्याबद्दल आम्हाला शंभर टक्के आदरणीय सहानुभूती आहे. पण बाहेरून येऊन काहीजण नाटक करत आहेत.” आंदोलनाच्या मूळ उद्देशाला बाधा आणण्यासाठी काही घटकांनी वातावरण बिघडविल्याचा आरोपही त्यांनी केला.
नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावर बोलताना सामंत म्हणाले की, हा विषय केवळ राजकारणाचा नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. “कोळसा, बोफोर्स किंवा टेलिकॉममध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून राजीनामा मागितला जात नाही. तर विद्यार्थ्यांचे जीव गेले, त्याची संवेदना म्हणून हा राजीनामा मागितला जात आहे. त्यांना टार्गेट करण्यापेक्षा सिस्टम सुधारली पाहिजे आणि त्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी आंदोलनात विरोधकांनी राजकीय हस्तक्षेप केल्याचा आरोपही केला. सामंत म्हणाले, “दिल्लीतील नीट पेपरफुटीप्रकरणाच्या या आंदोलनामध्ये विरोधक स्वार झाले आहेत. एनडीए आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम केलं जात आहे. या मंचावर आरएसएसला शिव्या घालण्याची गरज काय?”
आंदोलनाच्या स्वरूपात बदल झाल्याचा दावा करत ते पुढे म्हणाले, “‘नीट’बाबत आता कोणीही बोलत नाही असं विद्यार्थी बोलत आहेत. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्यापर्यंत हे गेले आहेत, हे मी तुमच्या माध्यमातून ऐकत आहे आणि बोलत आहे. आंदोलन यशस्वी होत असताना आपला यातून राजकीय फायदा होऊ शकतो त्याच भावनेतून सर्व एकत्र आले आहेत.”
विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या लाठीचार्जाबाबतही त्यांनी विरोधी पक्षांनाच जबाबदार धरले. आंदोलनात बाहेरील घटकांनी हस्तक्षेप केल्यामुळेच परिस्थिती बिघडली आणि त्यातून पोलिसांकडून कारवाई करण्यात आली, असा दावा त्यांनी पुन्हा केला.
दरम्यान, दिल्लीतील आंदोलन, त्यावरील पोलिसांची कारवाई आणि त्यानंतर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे हा विषय आता राष्ट्रीय पातळीवरील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून, विविध पक्षांकडून या प्रकरणावर सातत्याने प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
