राज्यात मान्सूनचा दमदार जोर; ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद
मुंबई, दि. ९ : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होत आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या जिल्हानिहाय पावसाच्या आकडेवारीनुसार, राज्यात सरासरी ३१.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १९६.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, त्यापाठोपाठ पालघरमध्ये १८५.४ मिलीमीटर आणि रायगडमध्ये १३४.१ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई उपनगर येथे १२५ मिलीमीटर, पुणे येथे ६९.४ मिलीमीटर, तर मुंबई शहर येथे ६२.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय राज्यातील विविध जिल्ह्यांमध्येही मान्सून सक्रिय असून अनेक ठिकाणी सातत्याने पाऊस सुरू आहे.
यंदाच्या मान्सून हंगामात दि. १ जूनपासून आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाच्या नोंदीत रायगड जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या कालावधीत रायगडमध्ये १,४८०.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर पालघरमध्ये १,२९५.४ मिलीमीटर, रत्नागिरीमध्ये १,२७३.४ मिलीमीटर, ठाणेमध्ये १,१०३ मिलीमीटर, तर सिंधुदुर्गमध्ये १,००१.४ मिलीमीटर इतका एकूण पाऊस झाला आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातही यंदा समाधानकारक पावसाची नोंद झाली असून मुंबई शहरात आतापर्यंत ५१०.७ मिलीमीटर, तर मुंबई उपनगरात ५१२.७ मिलीमीटर एकूण पाऊस झाला आहे. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणक्षेत्रांमध्ये पाण्याची आवक वाढत असून जलसाठ्यांमध्येही हळूहळू वाढ होत आहे.
हवामानाच्या सध्याच्या स्थितीनुसार कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्व विभागांतील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय आहे. राज्याच्या बहुतांश भागांत समाधानकारक पाऊस होत असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना लाभदायक परिस्थिती निर्माण होत असून जलस्रोतांनाही मोठा दिलासा मिळत आहे.
राज्यात मान्सूनचा प्रभाव कायम असल्याने अनेक भागांमध्ये अधूनमधून मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी, घाटमाथा तसेच काही अंतर्गत भागांमध्ये नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात मान्सून सक्रिय असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असून, राज्याच्या बहुतांश भागांत पावसाची समाधानकारक नोंद होत आहे.

