राज्यात पावसाचा जोर कायम; १७ एनडीआरएफ आणि ६ एसडीआरएफ पथके सज्ज, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
मुंबई, दि. ७ : राज्यातील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क केली असून नागरिकांनी अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील संवेदनशील ठिकाणी १७ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि ६ राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथके पूर्वतयारी म्हणून तैनात करण्यात आली आहेत.
मान्सून काळात संभाव्य आपत्तींचा वेगाने सामना करता यावा आणि बचावकार्य प्रभावीपणे राबविता यावे, यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये आपत्ती प्रतिसाद दलांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पालघर आणि नागपूर येथे प्रत्येकी २ एनडीआरएफ पथके तैनात असून पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि धाराशिव येथे प्रत्येकी १ पथक कार्यरत आहे. मुंबईमध्ये ४ एनडीआरएफ पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
याशिवाय, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची ६ पथकेही विविध ठिकाणी कार्यरत आहेत. धुळे आणि नागपूर येथे प्रत्येकी २ एसडीआरएफ पथके, तर नांदेड आणि गडचिरोली येथे प्रत्येकी १ पथक तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथे १५१.२ मिलीमीटर, तर कुलाबा येथे १२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय लोणावळा येथे तब्बल ६७० मिलीमीटर पाऊस झाला असून अंबोना येथे ५३७ मिलीमीटर, ताम्हिणी येथे ५८० मिलीमीटर, भिवपुरी येथे २६६ मिलीमीटर, विभाग येथे ३०५ मिलीमीटर, निलशी येथे २७५ मिलीमीटर, मुळशी येथे २३० मिलीमीटर, माथेरान येथे ३०२ मिलीमीटर, कर्जत येथे २९१.५ मिलीमीटर, पनवेल येथे १८२.५ मिलीमीटर, जुहू विमानतळ परिसरात ३२५.० मिलीमीटर आणि भाईंदर येथे १८८.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
माथेरान, लोणावळा, खोपोली आणि लोहगड परिसरात अतिवृष्टीमुळे भूस्खलनाचा धोका वाढला असून या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर संबंधित यंत्रणांमध्ये सातत्याने समन्वय ठेवून बचावकार्य सुरू आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत भू-स्थानिक माहिती प्रणालीच्या साहाय्याने धोक्याचे विश्लेषण करून आवश्यक इशारे आणि सूचना संबंधित प्रशासनाला पाठविण्यात येत आहेत.
मुसळधार पावसामुळे राज्यातील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. खोपोली परिसरात पाणी साचल्यामुळे जुना मुंबई-पुणे महामार्गही बंद ठेवण्यात आला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात मोठी दरड कोसळल्यामुळे दोन्ही दिशेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. तसेच मंकी हिल ते ठाकूरवाडी या रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. संबंधित यंत्रणांकडून युद्धपातळीवर दरडी हटविण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील घोरावाडी (तळेगाव दाभाडे) परिसरात पुराच्या पाण्यात २५ प्रवाशांसह एक बस अडकली होती. माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली.
मावळ तालुक्यातील पाटण परिसरात दरड कोसळून एक घर मातीखाली गाडले गेले असून ३ ते ४ नागरिक अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या ठिकाणी एनडीआरएफचे पथक बचावकार्य राबवत आहे.
मुंबईतील मानखुर्द परिसरात झोपडपट्टीवर इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला असून १ जण जखमी झाला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना आवाहन केले आहे की, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक प्रवास टाळावा, प्रशासन आणि हवामान विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे तसेच अफवांवर विश्वास न ठेवता आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा.

