Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 9372236332

नवी मुंबई बिल्डर्स आणि आर्किटेक्ट असोसिएशन सोबतच्या बैठकीत मतदार टक्केवारी वाढविण्याचे आवाहन

नवी मुंबई बिल्डर्स आणि आर्किटेक्ट असोसिएशन सोबतच्या बैठकीत मतदार टक्केवारी वाढविण्याचे आवाहन

नवी मुंबई, दि. १३: महाराष्ट्र विधानसभेच्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा तसेच बिल्डर असोसिएशन आणि आर्किटेक्ट असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी व त्यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय यांनीही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने दोन्ही असोसिएशनच्या मतदार जनजागृतीविषयक आयोजित विशेष बैठकीत करण्यात आले.
ग्रामीण भागाच्या तुलनेत नागरी भागात मतदानाची कमी असलेली टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने विधानसभा निवडणुक कार्यालयांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांनाही कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध माध्यमांचा वापर करुन थेट जनतेपर्यंत पोहोचून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महापालिका आयुक्त विविध संस्था, संघटना, मंडळे यांच्यासोबत थेट संवाद साधत असून महापालिका स्तरावरुन विविध संस्था, संघटनांच्या मतदार जनजागृती बैठका घेण्यात येत आहेत. अशाच प्रकारची जनजागृतीपर बैठक नवी मुंबई बिल्डर असोसिएशन व नवी मुंबई आर्किटेक्ट असोसिएशन यांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदार संघाकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्त स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण, १५० ऐरोली विधानसभा स्वीप नोडल अधिकारी उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे पाटील, १५१ बेलापूर विधानसभा स्वीप नोडल अधिकारी सहाय्यक आयुक्त सागर मोरे व दोन्ही असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमार्फत आपले सदस्य, कर्मचारी, कुटुंबिय व संपर्कात येणारे ग्राहक आणि नागरिक यांच्यापर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहचविण्यात यावा व प्रत्येकाने मतदान करावे यासाठी प्रोत्साहित करावे असे सांगितले. बिल्डर व आर्किटेक्ट यांनी आपल्या कार्यालयातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे वेळेत सवलत दयावी असेही आयुक्तांनी सूचित केले.
नवी मुंबई महानगरपालिका विविध प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असून नागरिकांना त्यांचा मतदार क्रमांक व मतदान केंद्राचे ठिकाण शोधणे सोपे जावे याकरिता त्यांच्यापर्यंत हस्तपत्रके पोहचविली जात असून प्रत्येक सोसायटीवर ही माहिती सहजपणे उपलब्ध् होईल असा क्यू आर कोड देखील पोस्टर्स स्वरुपात प्रसारित केला जाणार आहे.
याशिवाय मतदार केंद्राच्या परिसरात मतदार केंद्राकडे जाण्याचे दिशादर्शक फलक तसेच मतदार केंद्राबाहेर दर्शनी जागी त्या केंद्रामधील खोल्यांमध्ये कोणत्या मतदार क्रमांकाचे मतदान आहे याच्याही खोलीनिहाय माहितीचे फलक प्रसिध्द केले जाणार आहेत. याशिवाय मतदान केंद्रावर आलेल्या नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये अशा सर्व सुविधा मतदार केंद्रांवर उपलब्ध करुन दिल्या जात असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.
मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे याकरिता महानगरपालिकेने सर्व प्रकारचे नियोजन केले असून नवी मुंबई बिल्डर असोसिएशन आणि नवी मुंबई आर्किटेक्ट असोसिएशन यांनीही मतदानाचे कर्तव्य प्रत्येक नागरिकाने पार पाडावे याकरिता आपल्या स्तरावरुन जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेच्या वतीने घराघरात वाटली जाणारी हस्तपत्रके यांचे अनावरण आयुक्तांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच आयुक्तांसमवेत सामुहिकरित्या मतदान प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *