महागाई आणि बेरोजगारीविरोधात नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चा एल्गार; हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग
नवी मुंबई, दि. ३ : वाढती महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील वाढत्या आर्थिक अडचणींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी नवी मुंबई येथे तीव्र आंदोलन छेडत राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार एल्गार पुकारला. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत पक्षाच्या वतीने आंदोलनस्थळी प्रतीकात्मक चूल पेटवून निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका करत, महागाई आणि बेरोजगारीच्या दुहेरी संकटामुळे सामान्य नागरिकांचे जीवन अधिक कठीण बनत असल्याचे सांगितले. अन्नधान्य, इंधन, घरगुती वापराच्या वस्तू आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले असून रोजगाराच्या संधीही दिवसेंदिवस कमी होत असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
आंदोलनादरम्यान उपस्थित नेत्यांनी सांगितले की, हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून सामान्य जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडण्याचा प्रयत्न आहे. बेरोजगार युवक, कामगार, महिला, शेतकरी आणि मध्यमवर्गीय नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. जनतेच्या अडचणींबाबत सरकारची उदासीन भूमिका अधिक काळ सहन केली जाणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, महागाई आणि बेरोजगारीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी आर्थिक धोरणे, रोजगारनिर्मितीच्या योजना आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना आवश्यक आहेत. अन्यथा नागरिकांमधील असंतोष अधिक तीव्र होईल आणि त्याचे परिणाम सत्ताधाऱ्यांना राजकीय पातळीवर भोगावे लागतील, असे त्यांनी नमूद केले.
या आंदोलनात पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री शशिकांत शिंदे, विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, आमदार बापूसाहेब पठारे, खासदार सुरेश म्हात्रे, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, मुंबई अध्यक्ष मिलिंद कांबळे, उरण नगराध्यक्षा भावना घाणेकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सक्षणा सलगर, मुंबई युवक अध्यक्ष अमोल मातेले, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मंगेश आमले यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनाच्या माध्यमातून महागाई, बेरोजगारी आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर शासनाने तातडीने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी करण्यात आली. आगामी काळातही जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार पक्षाच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.
