नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी मोरबे धरण प्रकल्पाची केली पाहणी
नवी मुंबई, दि. ३० : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात सध्या सुमारे १७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून जुलैअखेरपर्यंत शहराच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसे पाणी असल्याची माहिती नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी दिली. पाण्याची तातडीची कमतरता नसली तरी यंदा पाऊस उशिरा आणि सरासरीपेक्षा कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहरात १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा केवळ आवश्यकतेपुरता वापर करून जलबचतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महापौर सुजाता पाटील यांनी पत्रकारांसह मोरबे धरण प्रकल्प, जलशुद्धीकरण केंद्रे, पंपगृहे आणि संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. यावेळी उपमहापौर दशरथ भगत, पाणीपुरवठा समितीचे सभापती रविकांत पाटील, आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंते शंकर जाधव आणि संतोष उनवणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौरांनी सांगितले की, वनमंत्री गणेश नाईक यांच्या दूरदृष्टीतून मोरबे धरण प्रकल्प नवी मुंबई महानगरपालिकेकडे आला आणि आज त्याचा मोठा लाभ शहराला होत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असताना नवी मुंबई तुलनेने सुरक्षित स्थितीत असल्याचे त्यांनी नमूद केले. मोरबे धरणाची कमाल जलपातळी ८८ मीटर असून सध्या ती सुमारे ७२ मीटर आहे. उपलब्ध साठा जुलैपर्यंत पुरेसा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनबाबत सावध अंदाज व्यक्त केल्यामुळे प्रशासनाने आगाऊ उपाययोजना म्हणून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. ही कपात संभाव्य अडचणी टाळण्यासाठी करण्यात आली असून नागरिकांनी त्याबाबत कोणतीही भीती बाळगू नये, असे महापौरांनी स्पष्ट केले. पाण्याचा अपव्यय टाळणे आणि काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
पाहणीदरम्यान महापौरांनी मोरबे जलाशयाच्या काठावर जाऊन पाण्याची गुणवत्ता प्रत्यक्ष तपासली. त्यांनी स्वतः जलाशयातील पाणी प्राशन केले. उपमहापौर, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनीही पाणी पिऊन त्याची स्वच्छता आणि शुद्धतेबाबत समाधान व्यक्त केले. माथेरान परिसरातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आणि प्रदूषणमुक्त धावरी नदीवर हा प्रकल्प उभारण्यात आल्यामुळे या जलस्रोताचे पाणी नैसर्गिकरीत्या स्वच्छ असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यानंतर भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, आग्रोळी पंपगृह तसेच विविध जलकुंभांमध्ये पाण्यावर होणाऱ्या प्रक्रिया आणि चाचण्यांची पाहणी करण्यात आली. पाणीपुरवठा यंत्रणेवर स्वयंचलित नियंत्रण आणि निरीक्षण ठेवणाऱ्या स्काडा प्रणालीचीही माहिती महापौरांनी घेतली.
गेल्या आठवड्यात शहरातील काही भागांत गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेने तत्काळ उपाययोजना केल्याचेही त्यांनी सांगितले. पाणीपुरवठा विभागाने विविध भागांतून दररोज सुमारे ६५० हून अधिक नमुने गोळा करून तपासणी केली असता पाणी स्वच्छ आणि पिण्यायोग्य असल्याचे निष्पन्न झाले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरबे मुख्य जलवाहिनीवरील दोन दिवसांच्या देखभाल दुरुस्ती कामामुळे जलवाहिन्या पूर्णपणे रिकाम्या झाल्या होत्या. पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर पाईपलाइनमध्ये साचलेला सूक्ष्म गाळ आणि मातीचे कण प्रवाहात मिसळल्याने काही भागांत सुरुवातीच्या काळात पाणी गढूळ दिसले. तसेच अनेक इमारतींमधील पाण्याच्या टाक्यांमध्ये साचलेला गाळही पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर वर आल्याने काही ठिकाणी अशी समस्या निर्माण झाली होती.
या तक्रारींची दखल घेत महानगरपालिकेने तत्काळ संबंधित भागांत जाऊन तपासणी, नमुना चाचण्या आणि नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती स्पष्ट केली. भविष्यात अशा तक्रारी आल्यास त्यांचे त्वरित निराकरण करण्याचे निर्देश महापौरांनी पाणीपुरवठा विभागाला दिले. नागरिकांनीही कोणतीही समस्या आढळल्यास तातडीने महानगरपालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, राज्यात वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही महापौरांनी केले. दुपारी १२ ते ४ या कालावधीत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
नवी मुंबई पाण्याच्या बाबतीत तुलनेने सुरक्षित आणि जलसमृद्ध असली तरी भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. जलबचतीच्या सवयी अंगीकारून महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन महापौर सुजाता पाटील यांनी यावेळी केले.
