देशभरातील निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रव्यापी मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला प्रारंभ
नवी दिल्ली, दि. १२: निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग (DoPPW) नोव्हेंबर २०२४ या महिन्यात चेहऱ्यावरून ओळख पटविण्याच्या (फेस ऑथेंटिकेशन) तंत्रज्ञानाद्वारे निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करणे सुलभ व्हावे; यासाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र (DLC-3.0) या राष्ट्रव्यापी मोहीमेचा तिसरा टप्पा चालवत आहे. या पद्धतीमुळे निवृत्तीवेतनधारकांना Android स्मार्ट फोनवरून-आधार कार्डाच्या ओळखीद्वारे निवृत्तीवेतन मिळण्यासाठी जिवंत असल्याचे प्रमाणपत्र पाठविण्यास अनुमती दिली आहे.
याआधी, निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन वितरण प्राधिकरणांना भेट देणे आवश्यक असे. मात्र अनेकदा वृद्ध व्यक्तींसाठी ते जिकिरीचे होत असे. २०१४ मध्ये,निवृत्तीवेतन आणि निवृत्तीावेतनधारक कल्याण विभागाने(DoPPW) जीवन प्रमाणपत्र (डिजिटल लाइफ सर्टिफिकेट)आणि २०२१ मध्ये, फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे ही प्रक्रिया करण्यास आरंभ केला. या प्रगतीमुळे बायोमेट्रिक साधनांची गरज नाहीशी झाली, असून ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.
२०२२ मध्ये, निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने ३७ ठिकाणी याविषयी मोहीम आयोजित केली, त्यावेळी १.४१ कोटी असे डीएलसी तयार केले. २०२३ ची मोहीम १०० ठिकाणी राबविण्यात आली, त्यावेळी १.४७ कोटी पेक्षा जास्त DLC तयार झाले.
मोहीमेच्या तिसऱ्या टप्प्यात(नोव्हेंबर १-३०, २०२४ पर्यंत) देशभरातील ८०० स्थानांवर प्रमुख ही मोहीम राबविण्यात येत आहे. भागीदारांमध्ये बँका, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, पेन्शनर्स असोसिएशन, UIDAI, MeitY, संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय आणि दूरसंचार मंत्रालय यांचा समावेश आहे. कागदपत्रे डिजिटली पाठविण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना मदत करण्यासाठी शहरांमध्ये शिबिरे घेतली जातील आणि ज्येष्ठतम वयोवृद्ध किंवा अपंग निवृत्तीवेतनधारकांसाठी गृहभेटीसह विशेष व्यवस्था केली जाईल.विविध सामाजिक माध्यमांवरून या मोहिमेचा प्रचार करण्यात येईल, तसेच DLC पोर्टलद्वारे निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाकडून पर्यवेक्षण केले जाईल. या सुव्यवस्थित, प्रवेशयोग्य प्रणालीचा लाभ अगदी दूरस्थ असलेल्या किंवा वृध्दत्वामुळे मर्यादित-शारिरीक व्यवहार करु शकणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना मिळणे, सुनिश्चित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.