शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई, दि. २१: परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी यायला सुरुवात झाली आहे. हा पाऊस विदर्भ, मराठवाडा, कोकण सह राज्यातील जवळपास सर्वच भागात कोसळत असून हातातोंडाशी आलेल्या पिकांची डोळ्यादेखत नासाडी होताना शेतकऱ्यांना पाहावे लागत आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसंच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
विदर्भातील अमरावती जिल्ह्यात कालपासून झालेल्या पावसामुळे शेतात असलेल्या सोयाबिनला त्याचा फटका बसला आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन घरी आणलं असलं तरी शेतात पडून असलेलं सोयाबीन खराब होण्याची भीती आहे. काही ठिकाणी तुरीला आलेल्या फुलोऱ्याला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलं असून कापून ठेवलेल्या धान पिकाचं नुकसान झालं.
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टीची नोंद झाली. आज सकाळी अप्पर मानार धारणाचे ५ तर विष्णुपुरी प्रकल्पाचा १ दरवाजा उघडला आहे. यंदा १०६ पूर्णांक ९३ टक्के पावसाची नोंद झाली असून पावसाने सरसरी ओलांडल्याची माहिती आहे. काल रात्री झालेल्या तुफान पावसामुळे जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यात निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. याच्या १० दरवाज्यातून १६ हजार ७०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असून प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रत्नागिरीत एक दिवसाच्या विश्रांती नंतर दुपारनंतर पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या ठिकाणी तयार झालेल्या भात पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. याच सोबत उत्तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण व उरण परिसराला काल सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढलं.
