Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवसैनिकांच्या मते कोण आहेत शिवसेनेतील ‘ते’ झारीतले शुक्राचार्य जे पक्षाला पोखरत आहेत?

कोण आहेत ते बडवे?

“माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय” हे वाक्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २००६ साली शिवसेना सोडताना वापरलं होतं. यानंतर बरीच वर्षे या बडव्यांची चर्चा राजकीय वर्तुळात होत राहिली. त्यावेळी राज यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भोवती असलेल्या नेत्यांच्या कोंडाळ्यावर बोट ठेवलं होतं. आज नेमकी तशीच परिस्थिती शिवसेनेची आणि उद्धव ठाकरे यांची झालेली आहे. फरक फक्त इतकाच आहे की आज उद्धव ठाकरे यांच्या भोवतालच्या बडव्यांची संख्या वाढली आहे. नेमके कोण आहेत ते ‘बडवे’ याचा विस्तृत आढावा आम्ही या लेख मालिकेच्या माध्यमातून घेत आहोत.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या पायाभरणीत व यशस्वीपणे त्यास पुढे नेण्यात उद्धव ठाकरे यांची महत्वाची भूमिका होती, ही बाब सर्वांसमोर फार उशिराने आली. हवाई फोटोग्राफीचा छंद जोपासणारे उद्धव कधी राजकारणात येतील हे त्यावेळी कोणाला स्वप्नातही खरं वाटलं नसतं. पण ते घडलं. १९९४ साली शिवसेना सत्तेत आल्यावर उद्धव ठाकरे यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी जवळपास सेनेचे सर्व नेते तत्कालीन भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोवती पिंगा घालत होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना पहिली सोबत दिली विद्यामन उद्योगमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी. मग एक एक करत नेते मंडळींचं वेटोळं त्यांच्या भोवती घट्ट होत गेलं. त्यात पुढे हळूहळू खा. संजय राऊत, खा. अनिल देसाई, ऍड. अनिल परब ही नेतेमंडळी जोडली गेली. आणि इथेच जुने सैनिक व नेते यांच्यातील संघर्षाला सुरवात झाली. यात प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री व सध्या भाजपवासी झालेले खा. नारायण राणे यांचा पहिला क्रमांक लागतो. २००५ साली नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करत अपमानीतरीत्या त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यावेळीही याचं खापर त्यांनी उद्धव ठाकरे व प्रामुख्याने त्यांच्या भोवती असलेल्या सुभाष देसाई, स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्यावर फोडलं होतं. हे फोडलं म्हणण्यापेक्षा हे जाणीवपूर्वक घडवण्यात आलं असं म्हणणं अतिशयोक्तीपूर्ण ठरू नये.

असाच काहीसा प्रकार २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी घडला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत पुनर्वापसी केलेल्या माजी राज्यमंत्री भास्कर जाधव यांना त्यावेळी तिकीट नाकारत मातोश्रीच्या दारातून परत पाठवण्यात आलं. यावेळी ‘स्वीय’ सहाय्यकांकडून अपमानित झालेल्या जाधव यांना हमसून-हमसून रडताना उभ्या महाराष्ट्राने पाहिलं होतं. तत्कालीन चिपळूण मतदारसंघातून अपक्ष उभ्या राहिलेल्या भास्कर जाधव यांना पाडण्यासाठी सेनेने मुलुंड येथील नगरसेवक व सभागृह नेते प्रभाकर शिंदे यांना तिकीट दिलं होतं. परंतू या निवडणुकीत शिंदे यांचं डिपॉजिट जप्त होत सेनेवर नामुष्कीची वेळ ओढवली होती. कालांतराने प्रभाकर शिंदे हे भाजपवासी झाले ही गोष्ट अलाहिदा.

म्हणून राज ठाकरे सोडून गेले…..

यानंतर नंबर लागला तो राज ठाकरे यांचा. राज ठाकरे यांच्यासारख्या करिष्मा असलेल्या नेत्यालाही या नेत्यांनी पक्ष सोडण्यास मजबूर केल्याचेचं म्हंटलं गेलं. ‘या’ नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या मनात त्यावेळी सदैव असुरक्षिततेची जाणिव निर्माण केली जात होती, असे राज ठाकरे यांच्यासोबतीने मनसेतं आलेल्या भूतपूर्व शिवसैनिकांचं आजही म्हणणं आहे. हळव्या स्वभावाचे असलेले उद्धव नेमके या नेत्यांच्या जाळ्यात अडकले आणि जिवाभावाच्या राज यांच्याशी रुक्ष वागले असेही त्यांना वाटते. मुळात उद्धव ठाकरे यांच्या जवळ जाणे हे ‘या’ नेत्यांच्या मर्जीवरच अवलंबून आहे. त्यांना अनुलक्षून जर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न झाला तर त्या नेत्यांचे-पदाधिकाऱ्याची कारकीर्द संपुष्टात आणली जाते असाही नाराज सैनिकांचा आरोप आहे.

सेनेतील याच झारीतल्या शुक्राचार्यांमुळे शिवसेना ५४ वर्षांची होऊनही पक्ष संघटना म्हणून अद्यापही आपली वाढ राज्यभर करू शकलेली नाही.

पुढील भागात वाचा जुन्या व माजी सैनिकांच्या मते उद्धव ठाकरे यांच्या भवताली असलेल्या कथित बडव्यांची संपूर्ण ‘कुंडली’

क्रमशः

पुढील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा आणि आम्हाला न चुकता YOUTUBE Channel || Facebook || Twitter ला SUBSCRIBE | LIKE | FOLLOW करा

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *