
‘आरएसएस’चे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी मराठीबाबत केलेल्या वक्तव्यानं महाराष्ट्रात संतापाचा उद्रेक
मुंबई, दि. ०६: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेसंबंधी काल राज्याची राजधानी मुंबईत केलेल्या विधानामुळे आज राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. भैय्याजी जोशी काल दि. ०५ रोजी घाटकोपर-विद्याविहार येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले कि, “मुंबईची कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषा असते. जशी घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही.” जोशी यांच्या या वक्तव्याचा समाचार सकाळी आधी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी घेतला.
यावेळी तीव्र शब्दांत आपला निषेध नोंदवताना संजय राऊत म्हणाले कि, “संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात दोन विषय अस्वस्थ करणारे आहेत. भाजप नेते स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी जे भाजपची ध्येय धोरण ठरवतात ते काल मु़बईत जाहीर केलं. मु़ंबईची भाषा मराठी नसल्याचे ते म्हणाले. मीडियाने हा विषय कसा दुर्लक्ष केला? राज्याच्या मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ कसे सहन करता? असा सवालही त्यांनी विचारला. पुढे ते म्हणाले की, “घाटकोपरची भाषा ही मराठी नाही. त्यांना कोलकाता, यूपी, बेंगळूर पाठवा, इथं बोलू शकतात का? महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन ते सांगत आहेत या भागाची भाषा मराठी नाही. जर आमची भाषा राज्यभाषा आहे तर हा गुन्हा राजद्रोहात बसतो”
शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हि भैय्याजी जोशी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले कि, “भैय्याजी जोशी यांनी काल विधान केलं आणि गोमूत्र म्हणायचं की काय ते शिंपडून गेले आहेत. आता, हिंदुस्तान पाकिस्तान विषय काढलेला नाही. मग बटेंगे तो कटेंगे आणि तिकडे मराठा-मराठेत्तर वाटणी करायची आणि राज्य करायचे. अनाजीपंतांनी तामिळनाडू आणि अहमदाबादमध्ये हे बोलून दाखवावं आणि परत येऊन दाखवावं” पुढे उद्धव ठाकरे यांनी सवाल केला कि मराठी माणूस मतं देणारच आहे, जातंय कुठे असा प्रश्न त्यांना पडतोय का. भाषावार प्रांतरचना झाली आता गल्लीवार प्रांत रचना करत आहे का?. शिवरायांबद्दल अवमानग्रस्त बोलणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकर चिल्लर माणूस असल्याचं म्हटलं. मग, आता भैय्याची जोशी चिल्लर माणूस आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करुन दाखवावं नाहीतर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी उद्धव ठाकरें यांनी मागणी केली. मराठी भाषा आली नाही तरी चालेल म्हणणाऱ्यावर कारवाई करुन दाखवावी. नाहीतर मान्य करावं भाजप आणि संघाचा हा छुपा अजेंडा आहे, असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.