नंदुरबार, पुणे आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांना राष्ट्रीय गौरव
नवी दिल्ली, दि. ५ : प्रशासनातील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिकाभिमुख सेवा वितरणाला तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या उपक्रमांचा गौरव करणाऱ्या २९ व्या राष्ट्रीय ई-सुशासन पुरस्कार २०२६ मध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये राज्यातील नंदुरबार जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांच्या अभिनव डिजिटल उपक्रमांची निवड झाली असून, राज्याच्या डिजिटल प्रशासन क्षेत्रातील प्रगतीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
देशभरातील विविध शासकीय संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन प्रशासनातील गतिमानता, पारदर्शकता, सेवा वितरणाची परिणामकारकता आणि तंत्रज्ञानाचा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचलेला प्रभाव या निकषांवर करण्यात आले. यंदा देशभरातून निवडलेल्या १७ उत्कृष्ट उपक्रमांमध्ये महाराष्ट्रातील तीन उपक्रमांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
विशेष बाब म्हणजे, यंदाच्या राष्ट्रीय ई-सुशासन पुरस्कारांमध्ये प्रथमच ग्रामपंचायत या स्वतंत्र श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेकडून राबविण्यात आलेल्या ‘ई-आरोग्य धमनी’ या उपक्रमाला राष्ट्रीय गौरव प्राप्त झाला आहे. आदिवासी आणि दुर्गम भागांतील नागरिकांना दर्जेदार, तातडीची आणि तंत्रज्ञानाधारित आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम विकसित करण्यात आला. आरोग्य व्यवस्थेतील डिजिटल हस्तक्षेपामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना अधिक सुलभ व प्रभावी आरोग्यसेवा मिळण्यास मदत झाली असून त्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
दरम्यान, नागरी प्रशासन अधिक पारदर्शक आणि नागरिककेंद्रित करण्याच्या दिशेने पुणे महानगरपालिकेने विकसित केलेल्या ‘पुणे ३६०’ या उपक्रमालाही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महापालिकेच्या विविध सेवा, सुविधा आणि नागरिकाभिमुख प्रक्रिया एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध सेवांसाठी स्वतंत्रपणे कार्यालयीन प्रक्रियेत गुंतण्याची आवश्यकता कमी झाली असून प्रशासनातील सुलभता वाढली आहे.
ग्रामीण डिजिटल परिवर्तनाच्या क्षेत्रात सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामपंचायत स्तरावरील विविध सेवा आणि कामकाजाचे प्रभावी डिजिटायझेशन करून नागरिकांना अधिक वेगवान, पारदर्शक आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामीण प्रशासनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सेवा वितरणातील सुधारणा यासाठी कडेपूर ग्रामपंचायतीची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय ई-सुशासन पुरस्कारांतर्गत विजेत्या संस्थांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सुवर्ण पुरस्कार प्राप्त संस्थांना १० लाख रुपये, तर रौप्य पुरस्कार प्राप्त संस्थांना ५ लाख रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांचा विस्तार, तंत्रज्ञानविषयक सुविधा वृद्धिंगत करणे आणि संसाधनांतील तफावत कमी करण्यासाठी वापरता येणार आहे.
केंद्र शासनाच्या प्रशासनिक सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्या पुढाकारातून दिल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे वितरण राजस्थानमधील जयपूर येथे आयोजित २९ व्या राष्ट्रीय ई-सुशासन परिषदेदरम्यान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
डिजिटल भारताच्या संकल्पनेला गती देताना महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासकीय यंत्रणांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकाभिमुख सेवा अधिक सक्षम केल्याचे या निवडीमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे. ग्रामीण ते शहरी प्रशासनापर्यंत डिजिटल परिवर्तनाची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्रातील या उपक्रमांचे राष्ट्रीय स्तरावरील हे यश राज्यासाठी अभिमानास्पद मानले जात आहे.
