Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सांगली-कोल्हापूरचा धडा; वाचा लेखक प्रतिक पुरी यांचे सध्याच्या पूर परिस्थितीवरील अभ्यासपूर्ण विश्लेषण  

सांगली-कोल्हापूरचा धडा; वाचा लेखक प्रतिक पुरी यांचे सध्याच्या पूर परिस्थितीवरील अभ्यासपूर्ण विश्लेषण  

सांगली-कोल्हापूरच्या महापूराच्या निमित्ताने आपल्याला काही धडे मिळाले आहेत. ते लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. एखादी आपत्ती का ओढवते, ती टाळता येण्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाय केले जायला हवेत, आपत्तीमध्ये मदत यंत्रणा कशी राबवायची आणि त्यानंतर परत जगणं कसं सुरू करायचं यावरही आत्ताच शांतपणे विचार करण्याची गरज आहे. आपण यातील प्रत्येक मुद्दा
सविस्तरपणे बघुयात.

मदत कराच पण शिस्तीत कराः

महाराष्ट्र हा उदार लोकांचा प्रांत आहे हे आपण दरवेळेस येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्तीग्रस्त लोकांना सढळ हस्ते मदत करून वारंवार सिद्ध केलं आहे. यावेळेसही परिस्थिती काही वेगळी नाही. ज्या प्रमाणात महापूराचं पाणी कोल्हापूर-सांगली शहरांत आलं
त्याच वेगात आणि प्रमाणांत मदतीचा ओघही सध्या सुरू आहे ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. एकीकडे सत्ताधारी पक्ष याही घटनेचं राजकारण करण्यांत मग्न असतांना शेकडो लोक आपापल्या पातळीवर पुरग्रस्तांच्या मदतीला कोणतीही जाहिरातबाजी न
करता धावून जात आहेत. सामाजिक माध्यमांचा उपयोग आपत्ती निवारण्यासाठी कसा केला जाऊ शकतो हेही आपण बघत आहोत. यात प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार मदत करत आहे. त्या सर्व व्यक्ति आणि संस्थांचे त्यासाठी मनःपूर्वक आभार. पण यात आपण
मदत करतांना काही गोष्टी कटाक्षानं पाळायला हव्यात.

1) आता या क्षणी लागणारी मदत करतांना शक्यतो वस्तूंच्या स्वरुपात करा. अन्न, कपडे, औषधी, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या यावर जास्त भर द्या. यातही कोणत्या प्रकारचं अन्न, कपडे आणि औषधी चालतील त्याची खातरजमा करून घ्या. लहान मुलांना आणि वृद्धांना आता उबदार कपड्यांची जास्त गरज आहे. त्यासाठी स्वेटर्स आणि ब्लँकेट्स लागतील. लहान मुलांना दुधही लागेल. त्यासाठी दुधाची भूकटी देणं अधिक गरजेचं ठरेल. महिला-मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स द्यावी लागतील. अंडरवियर्सवरहि आपल्याला भर द्यावा लागेल. ही सर्व तातडीची मदत आहे.

2) पुढच्या टप्प्यातली मदत ही रोख रखमेच्या स्वरूपात देऊ करता येईल. तेव्हा किंवा आताही जर का ती देत असाल तर ज्याला द्याल त्या व्यक्ति किंवा संस्था या तुमच्या ओळखिच्या, विश्वासाच्या आहेत याची खात्री करून घ्या. रोख रक्कम देण्यापेक्षा पैसे थेट अकाउंटला जमा करा म्हणजे त्याचा मागोवा घेता येईल.

3) मदत करण्यासाठी स्वतः जाण्याची गरज नाही. जे जातील त्यांनीही स्थानिकांशी संपर्क साधून त्यांना मदत पोहोचती करून तात्काळ परत येणं अधिक सोयीचं ठरेल. कारण सध्या तिथेही मदतकर्त्यांचीच गर्दी झालीय असंही व्हायला नको.

4) स्वयंसेवक म्हणून तिथे मदतकार्य करायला जात असाल तर योग्य संस्थेच्या माध्यमातूनच जा. तिथे स्वतःचीही योग्य काळजी घ्या. उत्साहाच्या भरात काम कराल तर तुम्हीच त्या लोकांवर ओझं म्हणून पडाल. कारण आता तिथं रोगराई पसरण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे जे काम कराल ते योग्य अनुभवी लोकांच्या संस्थेच्या माध्यमातूनच करा.

आपत्ती ओसरल्यानंतरः

आपल्याकडे काय होतं की जेव्हा एखादी आपत्ती ओढवते तेव्हा आपण त्या थोडक्या काळांत भरभरून मदत करतो आणि मग पूर्वीसारखी परिस्थिती स्थिरस्थावर होण्यास सुरूवात झाली की सारं काही विसरून जातो. ही आपत्ती का ओढवली याचा मग कोणी विचार करत नाही. ती ओढवूच नये म्हणून काय प्रतिबंधात्मक उपाय करायला हवेत यावरही कोणी फारसा विचार करत नाही. सत्ताधाऱ्यांना त्यांत फारसा रस नसतो. प्रशासन त्याबाबतीत उत्साही नसतं आणि लोकांनाही त्याचं गांभीर्य कळत नाही. सांगली-कोल्हापूर येथिल महापूर ही नैसर्गिक आपत्ती जेवढी आहे त्याहीपेक्षा ती मानवनिर्मित आपत्ती जास्त आहे. कृष्णा-पंचगंगेच्या दोन्ही बाजूंना नदीपात्रांलगत बेकायदेशिर-कायदेशिर बांधकामांना मोठ्या प्रमाणात परवानगी देण्यात आल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असं पर्यावरण तज्ञांचं म्हणणं आहे. जेव्हा तुम्ही नदीचं पात्र बांधून टाकता, तिला तिच्या नैसर्गिक प्रवाहाने वाहू देत नाही, तिच्यात गरजेहून जास्त वाळू उपसा करता तेव्हा तिची पाणी वाहून नेण्याच व ते पाणी मुरवण्याची क्षमता धोक्यात येते. जेव्हा असं
होतं तेव्हा हे सारं पाणी वाट मिळेल तिथं पसरतं. सांगली-कोल्हापूरात नेमकं हेच झालं. जो पाऊस झाला तो इतकाही नव्हता की त्यानं महापूर यावा. पण तो मुरायलाच कुठे जागा नसल्यानं नद्यांनी ते पाणी सगळीकडे पसरवलं. हा पावसाचा, नद्यांचा दोष नाही तर माणसांच्या हव्यासाचा दोष आहे. यात सरकार, प्रशासन जितकं दोषी आहे त्याहीपेक्षा सामान्य जनता दोषी आहे जी स्वतःही यात सामील आहे. पण त्याहीपेक्षा अशा गोष्टींकडे ती ज्या पद्धतीने दूर्लक्ष करते, हा प्रश्न तिला महत्त्वाचा वाटत नाही ती मोठी समस्या
आहे.

कोल्हापूर-सांगलीच्या लोकांना माझं हेच सांगणं राहिल की त्यांनी यातून योग्य तो धडा घ्यावा आणि त्यांचं जगणं पूर्ववत झाल्यानंतर ही आपत्ती का ओढवली त्यावर शांतपणे विचार करावा. त्याची कारणं शोधून काढावीत आणि ती दूर करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणावा. अशी आपत्ती पुन्हा ओढवणार नाही यासाठी त्यांनी सातत्यानं काम करावं. आणि हे काम काही लोकांचं, संस्थांचं नाही तर सर्वांचंच आहे. अन्यथा आजचा दिवस भागला, उद्याचं उद्या बघूयात म्हणून या गोष्टींकडे दूर्लक्ष केलं तर आणखी काही वर्षांनी याहून जास्त महाप्रलयाला त्यांना सामोरं जावं लागेल.

या आपत्तीतून काय शिकायचं?

या आपत्तीतून बरंच काही शिकण्यासारखं आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या आपत्तीकाळातील शक्य त्या सर्व गोष्टींचं दस्ताऐवजीकरण करून ठेवावं. प्रशासन यांतील काही गोष्टी करतीलच पण जनतेनं, संस्थांनीही यात पुढाकार घ्यावा. पुर कसा ओढवला, पुराचं पाणी कोणत्या भागात किती भरलं, कुठे ते मुरलं, कुठे ओसरलं, मदत कार्यात कोणत्या अडचणी आल्या, काय करता आलं असतं, अधिक व्यवस्थितपणे मदत यंत्रणा राबवता आली असती का, पुढे मागे अशीच आपत्ती ओढवली तर पूर्व-खबरदारीचे काय उपाय योजता येतील याचा सर्वांनी नीट अभ्यास करून त्याची नोंद ठेवावी. ज्याचा पुढे जाऊन सर्वांनाच उपयोग होईल. २००५ साली आलेल्या पुरानंतर अशा प्रकारचा केलेला अहवाल अद्यापही शासन दरबारी धुळखात पडला आहे त्याचाही पाठपुरावा करण्याची नितांत गरज आहे.

प्रतिबंधात्मक उपायः

पुढील वर्षी अशीच आपत्ती ओढवू शकते हे गृहीत धरून आत्तापासूनच पुर निवारण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजायला हवेत. यात सरकार व प्रशासनाने पुढाकार घेऊन काम करावंच पण लोकांनीही त्यांत भाग घ्यावा. आणि सरकारी व प्रशासकीय यंत्रणा नीट काम करते की नाही यावर लक्ष ठेवावं. पुढील वर्षी पुर येण्याची शक्यता गृहीत धरूनच आत्तापासून विविध ठिकाणी मदत केंद्रांची उभारणी करून तिथं पावसाळा सुरू होण्याआधी जीवनावश्यक वस्तू, तसेच पाण्यात तगून राहण्यासाठी ट्यूब्स, होड्या, यांचा साठा करून ठेवावा. माणसे आणि जनावरे यांसाठी वेगवेगळी व्यवस्था ठेवावी लागेल. दरवर्षी त्याची फेरतपासणी करत जावी. म्हणजे प्रत्यक्ष आपत्तीच्या लोकांना त्याचा उपयोग करता येईल. लोकांनी आपापल्या घरातही पुरातून वाचण्यासाठी म्हणून रेस्कू किट तयार करून ठेवावी. पावसाळा सुरू होण्याआधी या गोष्टींची खबरदारी घेतली तर त्याचा संकटकाळी निश्चित उपयोग होऊ शकतो.

लोकांनी काय करावं?

आपल्याकडे नागरिकशास्त्र या विषयाला फारसं महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळे नागरिकांना त्यांची कर्तव्ये काय आहेत, सामुहिक जबाबदारी कशाला म्हणतात आणि मुख्य म्हणजे सरकार आणि प्रशासन यांच्यावर दाब कसा ठेवायचा हेच कळत नाही. लोक आपल्या कामांसाठी नेत्यांवर अवलंबून राहतात आणि नेते त्याचा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठीच उपयोग करतात. त्यापेक्षा लोक स्वतःच सजग राहिले तर बऱ्याच गोष्टी सूकर होतील. या आपत्तीच्या निमित्तानं काय करता येईल तर आधी या काळात प्रशासनानं काय काम केलं याचा हिशेब ठेवावा आणि सरकारनं काय केलं याचाही. प्रशासन आणि सरकार या दोन भिन्न यंत्रणा असतात. प्रशासन बहुधा त्यांच्या नियमानं का होईना पण काम करतं. पण हे नियम योग्य होते की नाही, ते लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त होते की नाही, याचा स्थानिक जनतेनं अभ्यास करावा, संस्थांनी अभ्यास करावा आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार अहवाल तयार करून तो सरकार आणि प्रशासनाला द्यावा. ते आपलं काम नीट करत आहेत की नाही यावर त्यांनी लक्ष ठेवावं. जर लोक आपली जबाबदारी विसरले तर सरकार आणि प्रशासनाकडून कर्तव्यपूर्तीची अपेक्षा ठेवणं चूकीचं ठरेल. हा सर्वस्वी लोकांचा दोष ठरेल.

दुसरं म्हणजे लोकांचीही जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या पर्यावरणाची त्यांच्या वागण्यामुळे गळचेपी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. नदीतील बांधकामं, त्यांत कचरा टाकणं, प्लास्टिकचा अनिर्बंध वापर, यात लोकांचाच सहभाग असतो. त्यांनी यावर नियंत्रण ठेवलं तर बरेच प्रश्न मूळातूनच सुटतील. पण त्यासाठी त्यांना आपला स्वार्थ सोडावा लागेल आणि व्यापक जनहिताचा, शहराचा, इथल्या निसर्गाचा विचार करावा लागेल.

कोल्हापूर-सांगली येथे जे झालं तेच अन्य ठिकाणीही होऊ शकतं. ज्या ज्या शहरांतून मध्यवस्तीतून नदी वाहते आहे तिथे हा धोका उद्भवू शकतो. पुढच्यास ठेच मागचा शहाणा याप्रमाणे ही शहरं, उदा. मुंबई, पुणे, कोंकण विभाग यातून योग्य तो बोध घेतील
अशी अपेक्षा आहे.

  • श्री. प्रतिक पुरी

(प्रतिक पुरी हे मराठीतील प्रतिथयश लेखक असून सामाजिक विषयांवरील आपल्या परखड मतांसाठी प्रसिद्ध आहेत)

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *