Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी देश सज्ज : सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी उद्यापासून मतदानाला आरंभ

पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या १०२ जागा, १६.६३ कोटी मतदार, १.८७ लाख मतदान केंद्रे, १८ लाख कर्मचारी

नवी दिल्ली/नागपूर, दि. १८: कोणत्याही देशाने अद्याप अनुभवला नसेल अशा लोकशाहीच्या अभूतपूर्व महोत्सवात सामील होण्यासाठी मतदारांचे स्वागत करण्याकरता भारतीय निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. निवडणूक आयोगाने मुक्त, निर्भय, शांततापूर्ण, सर्वांना शक्य असणाऱ्या, सर्वसमावेशक आणि प्रलोभन मुक्त वातावरणात मतदान घेण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. आयोग आणि त्यांच्या पथकाने गेली दोन वर्षे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अथक परिश्रम करून आणि  भारतातल्या मतदारांना मतदानाचा सर्वतोपरी उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी काळजीपूर्वक कार्य केले आहे. या मतदानासाठी पूर्वतयारी करताना अनेक सल्लामसलती, आढावे, प्रत्यक्ष स्थळाला भेट, अधिकाऱ्यांचे सखोल प्रशिक्षण आणि एक नवीन आणि कालानुरूप कार्यान्वयन प्रक्रिया उभारणी या सर्व घटकांचा समावेश आहे. यामध्ये देशभरातील विविध संस्थांचा देखील मोठा सहभाग अंतर्भूत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांचा समावेश असलेल्या आयोगाने आज दुपारी 12 वाजता सार्वत्रिक निवडणुका 2024 चा पहिला टप्पा सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुकीच्या तयारीला अंतिम स्वरूप दिले. मतदानाचे उर्वरित सहा टप्पे 1 जूनपर्यंत सुरू राहतील. सुमारे 97 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.

आता ही वेळ मतदारांनी पुढे येण्याची आहे, असे आयोगाचे मत आहे. मतदारांनी आपल्या घरातून बाहेर पडावे, मतदान केंद्रांवर जावे आणि अतिशय जबाबदारी आणि अभिमानाच्या भावनेतून मतदान करावे असे कळकळीचे आवाहन आयोगाने केले आहे. राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरील संदेशात सीईसी राजीव कुमार यांनी सर्व मतदारांना न चुकता मतदान करण्याचे आवाहन केले. सीईसी राजीव कुमार यांचा संदेश येथे ऐका –

In Hindi: https://www.youtube.com/watch?v=DDdiNLMWnVk

In English:  https://www.youtube.com/watch?v=CIuuKOPPcHU

पहिल्या टप्प्याची वैशिष्ट्ये

1.सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. म्हणजेच, 21 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 102 संसदीय मतदारसंघांसाठी (सामान्य- 73; एस टी – 11; एस सी -18) आणि अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 92 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. ही सर्व टप्प्यांमधली सर्वाधिक मतदारसंघ संख्या आहे. मतदान सकाळी 7 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6 वाजता संपेल.  (मतदान बंद होण्याची वेळ प्रत्येक मतदारसंघानुसार वेगळी असू शकते.)

2.या टप्प्यात 18 लाखांहून अधिक मतदान अधिकारी 1.87 लाख मतदान केंद्रांवर 16.63 कोटी मतदारांचे स्वागत करतील.

3.मतदारांमध्ये 8.4 कोटी पुरुष,   8.23 कोटी महिला आणि 11,371 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

4.35.67 लाख मतदारांनी प्रथमच मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे. याव्यतिरिक्त, 20-29 वयोगटातील 3.51 कोटी तरुण मतदार आहेत.

5.निवडणुकीच्या रिंगणात 1625 उमेदवार (पुरुष – 1491; महिला – 134)  आहेत.

6.शांतता आणि मतदानाचे पावित्र्य राखण्यासाठी मतदान प्रक्रिया आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी  41 हेलिकॉप्टर, 84 विशेष रेल्वेगाड्या आणि जवळपास 1 लाख वाहने तैनात करण्यात आली आहेत.

शांतता आणि पावित्र्य सुनिश्चितीसाठी

7.निवडणुका शांततापूर्ण आणि सुरळीत पार पाडाव्यात यासाठी आयोगाने अनेक महत्वपूर्ण उपाययोजना केल्या आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण व्हावी यासाठी केंद्रीय दलाच्या पुरेशा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

8.सर्व मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक तैनात केले असून 50% पेक्षा जास्त मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केले जाईल.

9.मतदानाच्या काही दिवस आधीच 361 निरीक्षक (127 सामान्य निरीक्षक, 67 पोलीस निरीक्षक, 167 व्यय निरीक्षक) त्यांच्या मतदारसंघात पोहोचले आहेत. अत्युच्च दक्षता घेण्याच्या कामी हे सर्व आयोगाचे डोळे आणि कान म्हणून कामगिरी बजावतात.  याव्यतिरिक्त काही राज्यांमध्ये विशेष निरीक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत.

10.एकूण 4627 भरारी पथके, 5208 सांख्यिकी  देखरेख पथके, 2028 व्हिडिओ देखरेख पथके आणि 1255 व्हिडिओ निरीक्षण पथके 24 तास पाळत ठेवत आहेत जेणेकरून मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखवण्याचे कृत्य काटेकोरपणे आणि त्वरीत निदर्शनाला आणता येईल.

11.एकूण 1374 आंतरराज्यीय आणि 162 आंतरराष्ट्रीय सीमा तपासणी नाके दारू, अंमली पदार्थ, रोख रक्कम आणि मोफत वस्तूंच्या कोणत्याही अवैध ओघावर  करडी नजर ठेवत आहेत. सागरी आणि हवाई मार्गांवर देखील कडक पाळत ठेवण्यात आली आहे.

मतदारांसाठी सुरक्षा आणि आधार

12.पहिल्या टप्प्यातील 102 मतदारसंघांमध्ये 85 वर्षांहून अधिक वयोगटातील 14.14 लाखांहून अधिक नोंदणीकृत मतदार आणि 13.89 लाख दिव्यांग  मतदार आहेत ज्यांना त्यांच्या घरून  शांतपणे  मतदान करण्याचा पर्याय प्रदान करण्यात आला आहे. या पर्यायी गृह मतदान पद्धतीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून आधीच मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

13.मतदान करण्यासाठी  85 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या तसेच दिव्यांग मतदारांनी  मतदान केंद्रांवर येण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांना ने-आण सुविधा, मतदान चिन्हे, ब्रेल लिपीतील चिन्हे, स्वयंसेवक इत्यादी सोयी पुरवण्यात येतील. दिव्यांग मतदारांना निवडणूक आयोगाच्या सक्षम अॅपच्या माध्यमातून व्हीलचेयरची सुविधा देखील घेता येईल.

14.वयोवृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसह देशातील प्रत्येक मतदाराला सुलभतेने मतदान करता यावे म्हणून पाणी, निवारा, शौचालये, उतार, स्वयंसेवक, व्हीलचेयर्स आणि वीज यांसारख्या किमान सोयींची व्यवस्था असेल याची खात्री करून घेण्यात आली आहे.

15.देशातील 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये स्थानिक संकल्पनांसह आदर्श मतदान केंद्रे उभारण्यात येत आहेत. यातील 5000 हून अधिक मतदान केंद्रांचे व्यवस्थापन तसेच सुरक्षा व्यवस्था संपूर्णपणे महिलांतर्फे करण्यात येईल आणि 1000 हून अधिक मतदान केंद्रांचे संचालन दिव्यांग व्यक्तींद्वारे  करण्यात येईल.

16.सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदार माहिती स्लीप्सचे वितरण करण्यात आले असून या स्लीप्स सुविधात्मक उपाययोजना म्हणून काम करण्यासोबतच निवडणूक आयोगाकडून मतदारांना मतदानासाठी येण्याचे आणि मतदान करण्यासाठीचे आमंत्रण म्हणून देखील कार्य करतात.

17.मतदारांना आपापल्या मतदान केंद्रांचे तपशील तसेच मतदानाच्या तारखा पुढील लिंकद्वारे तपासून घेता येतील: https://electoralsearch.eci.gov.in/

18.मतदान ओळखपत्रासोबतच (ईपीआयसी) मतदान केंद्रांच्या ठिकाणी ओळख पडताळणीसाठी निवडणूक आयोगाने आणखी 12 पर्यायी दस्तावेज वापरण्याची परवानगी दिली आहे. जर मतदार यादीत मतदात्याची नोंदणी झाली असेल तर या पैकी कोणतेही दस्तावेज सादर करून मतदान करता येईल.

मतदारांसाठी माहिती

19.मतदारांनी कोणतीही चुकीची माहिती अथवा खोट्या वृत्ताने प्रभावित होऊ नये. तसेच त्यांना निवडणुकीत भाग घेण्यापासून परावृत्त करणाऱ्या बाबी, विशेषतः समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या जाणाऱ्या चुकीच्या कहाण्यांच्या आहारी जाणे टाळले पाहिजे. या संदर्भातील सर्व प्रश्न, स्पष्टीकरणे आणि गैरसमज यांच्या संदर्भात https://mythvsreality.eci.gov.in/ या संकेतस्थळावर निवडणूक आयोगाच्या मिथक विरुद्ध तथ्ये या विभागात स्पष्टीकरणे दिलेली आहेत. चुकीच्या गोष्टींचा प्रभाव वाढण्यापूर्वीच मतदारांनी या अधिकृत आणि जबाबदार स्त्रोतांचा वापर करून माहितीची पडताळणी करून घ्यावी.

20.ईसीआयचे केवायसी अॅप तसेच उमेदवार प्रतिज्ञापत्र पोर्टल (https://affidavit.eci.gov.in/) निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवारांच्या मालमत्ता, दायित्वे, शैक्षणिक पार्श्वभूमी तसेच गुन्हेगारी इतिहास असल्यास, यांसह सर्व तपशील मतदारांना उपलब्ध करून देते.

माध्यमांची सुविधा

21.निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी आयोगाने माध्यमांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रांवर उपस्थित राहण्याची परवानगी दिली असून त्यासाठी देशातील 21 राज्ये व  केंद्रशासित प्रदेशांच्या क्षेत्रात सुमारे 47,000 अधिकृतता पत्रे जारी करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या प्रतिनिधींना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

22.मतदानाच्या दिवशी किती प्रमाणात मतदान झाले याची आकडेवारी माध्यमे आणि इतर सर्व भागधारकांना ईसीआय वोटर टर्नआउट अॅपच्या माध्यमातून तपासता येईल. या अॅपवर नियमितपणे माहिती अद्ययावत करण्यात येईल.

23.यावर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती एका ठिकाणी मिळावी या हेतूने निवडणूक आयोगाने 2024च्या निवडणुकीप्रती समर्पित पुढील संकेतस्थळ देखील सुरू  केले आहे: https://elections24.eci.gov.in/

पार्श्वभूमी

24.गेल्या दोन वर्षांच्या काळात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी निवडणूकविषयक तयारीचा आढावा घेण्यासाठी अनेक राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना भेट दिली आहे. तसेच आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सदर क्षेत्रांतील राजकीय पक्ष, अंमलबजावणी संस्था, सर्व जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक/पोलीस अधीक्षक, विभागीय आयुक्त, प्रांत पोलीस महानिरीक्षक, सीएस/ पोलीस महासंचालक तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारी या सर्वांशी देखील चर्चा केली.

25.निवडणूक प्रक्रियेत कुठलीही त्रुटी राहू नये यासाठी  मुख्य निवडणूक अधिकारी आणि त्यांच्या पथकांसमवेत विविध चर्चा परिषदा तसेच आढावा बैठका घेण्यात आल्या. विविध राज्यांतील कायदा आणि सुव्यवस्था, विशिष्ट चिंताजनक क्षेत्रे तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांची किती प्रमाणात आवश्यकता लागेल याचे प्रमाण यांसह निवडणूक यंत्रणेच्या एकंदर सज्जतेचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने या राज्यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या.

26.लोकसभेची विद्यमान सार्वत्रिक निवडणूक तसेच राज्य विधानसभा निवडणूक 2024 मुक्त, न्याय्य, शांततापूर्ण आणि कोणत्याही प्रलोभनांविना पार पाडण्याच्या हेतूने कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा तसेच मूल्यमापन, बेकायदेशीर बाबींचा प्रतिबंध, जप्तीची कारवाई तसेच आंतर- राज्य  आणि आंतरराष्ट्रीय सीमांवर कठोर पहारा याबाबतच्या आढाव्याचा भाग म्हणून निवडणूक आयोगाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनांसोबत महत्त्वपूर्ण बैठक देखील घेतली. निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व भागधारकांना एका मंचावर आणून देशाच्या सीमांचे संरक्षण करणाऱ्या केंद्रीय यंत्रणांसह शेजारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरळीत समन्वय तसेच सहकार्य स्थापित करणे हा या संयुक्त आढावा बैठकीचा हेतू होता. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत, प्रत्येक राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांचा तपशीलवार आढावा घेतला.

27.सार्वत्रिक निवडणुकीच्या घोषणेपूर्वी आयोगाने 2100 हून अधिक सामान्य निरीक्षक, पोलीस दलांतील तसेच व्यय निरीक्षकांना देखील या निवडणुकीसाठी माहिती देऊन सज्ज करण्यात आले.

28.लोकसभा निवडणूक 2024 साठीचे मतदान सुरू होण्यापूर्वी मतदारांची आकडेवारी वाढवण्याच्या दृष्टीने भारतीय निवडणूक आयोगाने कमी मतदान होण्याच्या समस्येसंदर्भात एक परिषद देखील भरवली आणि यापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कमी मतदान होण्याचा इतिहास असलेल्या संसदीय मतदारसंघांवर (पीसीएस) या परिषदेत अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले.

29.संपूर्ण निवडणूक यंत्रणेला निवडणूक व्यवस्थापनाच्या सर्व पैलूंबाबत प्रशिक्षित करण्यात आले. सर्व सूचना/मन्युअल/माहिती पुस्तके व्यापक प्रमाणात अद्ययावत करण्यात येऊन आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *