
सखोल स्वच्छता मोहीमांच्या परिणामाचा न.मु.म.पा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणीव्दारे आढावा
नवी मुंबई, दि. १६: शहर स्वच्छतेप्रमाणेच शहरातील पर्यावरणाकडेही विशेष लक्ष देत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार १३ डिसेंबरपासून शहरातील महामार्ग तसेच अंतर्गत मुख्य रस्ते यांच्या सखोल स्वच्छतेकडे (Deep Cleaning) विशेष लक्ष देण्यात येत आहे. यामध्ये रस्ते, पदपथ, दुभाजक यांच्या कडेला जमा झालेली माती, रेती, गवत, घनकचरा उचलून घेणे तसेच रस्त्यांच्या कडेला असलेली झुडपे व सुकलेले गवत काढून टाकणे त्याचप्रमाणे प्रक्रियाकृत पाण्याने रस्ते, पदपथ धुणे व हवेमध्ये स्प्रेईंग मशीनव्दारे हे पाणी मारून हवेतील धूळ कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. याचा उपयोग शहराच्या हवा गुणवत्ता सुधारणेत झाल्याचे अभिप्राय नागरिकांकडून प्राप्त होत आहेत.
या अनुषंगाने सायन पनवेल महामार्ग तसेच एमआयडीसी क्षेत्रातील मुख्य रस्ते यांचे अधिकार जरी नवी मुंबई महानगरपालिकेकडे नसले तरी तेथील अस्वच्छतेमुळे शहराकडे बघण्याचा त्या रस्त्यावरून प्रवास करणा-या प्रवाशांचा दृष्टीकोन बदलतो हे लक्षात घेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आज शीळफाट्याकडून महापे नवी मुंबईकडे येणा-या मुख्य मार्गाची शहर अभियंता शिरीष आरदवाड आणि संबंधित अधिका-यांसह प्रत्यक्ष पाहणी करीत मौलिक सूचना दिल्या. त्याठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेली माती, काही ठिकाणी डेब्रीजचे ढीग, सुकलेली अस्ताव्यस्त झाडेझुडपे यांची सखोल साफसफाई करण्याचे निर्देश दिले.
शीळ एमबीआरपासून महानगरपालिकेची हद्द सुरू होत असून तेथून दोन्ही बाजूने रस्त्याची व दुभाजकाची स्वच्छता करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शीळ एमबीआरचा परिसरही छोटी शोभिवंत झाडे लावून सुशोभित करावा असे आयुक्तांनी सूचित केले. तेथून महानगरपालिकेच्या हद्दीतील झोपडपट्टी भागाला तसेच जुन्या पाड्यांना पाणीपुरवठा होत असून तो वाढविण्याची गरज लक्षात घेत तशा प्रकारची मागणी शासन स्तरावर करण्यासाठी प्रस्ताव करण्याचेही त्यांनी सूचित केले. शीळ एमबीआर जवळ तसेच महानगरपालिकेची हद्द जिथून सुरू होते त्या सर्व दिशांवरील रस्त्यांवर शहराच्या नावलौकिकाला साजेशा आकर्षक कमानी उभारण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
अडवली, भूतावली गाव व परिसराची पाहणी करीत त्याठिकाणी स्वच्छता वाढीवर भर देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. त्याचप्रमाणे तेथील नागरी आरोग्य केंद्र तसेच शाळा इमारत आणि परिसराची पाहणी करीत तेथील स्वच्छता व नीटनेटकेपणा यामध्ये सुधारणा कराव्यात आणि परिमंडळ उपआयुक्त व कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त यांनी शाळांना नियमित भेटी देऊन तेथील सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे असेही निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले.