Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

….अशा प्रकारे चालतं ‘शहरी’ सावकारी कर्जाचं डेंजर रॅकेट; जाणून घ्या संपूर्ण माहिती

….अशा प्रकारे चालतं ‘शहरी’ सावकारी कर्जाचं रॅकेट; जाणून घ्या संपूर्ण माहिती

दोन दिवसांपूर्वीच खासगी सावकारी कर्जाच्या जाचाला कंटाळून मोहसीन बागवान या युवकाने मिरज पोलीस ठाण्याच्या आवारात विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. महाराष्ट्र वार्ता च्या टीम ने या प्रकरणाचा खोलात जाऊन मागोवा घेतला तेव्हा कळलं की या तरुणाने माजी नगरसेवक साजिद अली पठाण व त्याचा भाऊ बबलू पठाण कडून ५०,००० रुपये कर्जापोटी घेतले होते. त्यांच्या सततच्या जाचाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. जेव्हा आम्हाला व्याजाचा आकडा कळला तेव्हा आम्ही थक्कचं झालो. या दोन राक्षसांनी या तरुणाला चक्क २० टक्के महिना व्याजाने कर्ज दिलं होतं व त्याने १.७५ लाख रुपये आज तारखे पर्यंत त्यांचे चुकते केले होते. म्हणजेच मुद्दल पेक्षा १.२५ लाख रुपये जास्त दिले गेले. या तरुणाने या साऱ्या बाबींचा तपशीलवार उल्लेख आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात केला आहे.

साधारणतः जेव्हा आपण कोणत्याही सहकारी बँकेतून अथवा पतपेढीतून वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेतो तेव्हा ती बँक आपल्याला कर्जाच्या रकमेवर वार्षिक १४ टक्के ते १८ टक्के पर्यंत व्याज आकारते. त्याच वेळी खाजगी बँका यांचा व्याजदर थोडा जास्त असतो. साधारण १२ टक्के ते २४ टक्के फ्लॅट स्वरूपात व्याज आकारले जाते. काही ठिकाणी खाजगी वित्तीय संस्था(NBFC) ३० टक्के व्याजही आकारात. पण या आत्महत्याग्रस्त तरुणाच्या बाबतीत बोलायला गेलं तर त्याने थोडे थोडके नव्हे तर २४० टक्के वार्षिक दराने हे कर्ज काढलं होतं असं म्हणावं लागेल. शेतकरी जसे खासगी सावकारांच्या विळख्यात अडकले आहेत, तशीच काहीशी अवस्था शहरी भागातील उद्योजकांची, नवउद्योजकांची व नोकरदारांची झालेली आहे. हे लोण पुण्या-मुंबई पलीकडे नवी मुंबई, ठाणे-कळवा, कल्याण-डोंबिवली, पनवेल, उरण, वसई-विरार, पिंपरी-चिंचवड, अलिबाग, सातारा, सांगली वर उत्तर महाराष्ट्रात धुळे, भुसावळ, नाशिक पर्यंत तर मराठवाड्यातही औरंगाबाद पर्यंत पसरले आहे. या वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये उद्योजकांना खेळतं भांडवल लागत असतं. अनेक छोटे व्यापारी जे आयकर भरणाच करत नाहीत अशांना मग IT फाईल नसल्या कारणाने कोणतीही बँक कर्ज देत नाही. मग हे असे छोटे-मोठे व्यापारी 5 ते 15 टक्के महिना व्याजाने पैसे देणाऱ्या शहरी सावकारांच्या जाळ्यात अलगद अडकतात. तिथे आत शिरता येतं पण बाहेर निघायचा मार्ग सहजासहजी सापडत नाही. नोकरदार वर्गही महिना अखेरीची तंगी, लग्न, आजारपण, बारसं तसेच गणपती, दिवाळी अशा सणांवेळी पैसे कमी पडले की यांच्या नादाला लागतात.

अवैध सावकारी कर्जाची यंत्रणा नेमकी काम करते कशी?

जेव्हा कोणी गरजवंत या सावकारांकडे जातो तेव्हा त्याला त्या सावकाराला ओळखणारा एक मध्यस्थ गाठावा लागतो, जो त्याच्यासाठी जामीनदाराची भूमिकाही नंतर वठवू शकतो. हे सावकार खाजगी सावकारीचा परवाना नसताना देखील कर्जदाराकडून बॉण्ड पेपरवर कायदेशीर अटी-शर्थी लिहून घेतात. तसेच कर्जदाराकडून कर्जाऊ रकमेच्या प्रमाणापेक्षा जास्त रकमेची संपत्ती लिहून घेतात. थांबा अजून प्रोसेस बाकी आहे. 4-6 ब्लँक चेक सहिसह स्वतःकडे जमा करून ठेवतात. त्यानंतर ही रक्कम अदा केली जाते. मग दर महिन्याला ठरलेल्या दिवशी हा सावकार त्याला फोन वरून नंतर वेळेत पैसे नाही आले तर घरी येऊन पैसे वसूल करतो.

आता जाणून घेऊ दुसऱ्या पद्धती बाबत

यात कर्ज देणारा सावकार हा दिलेले पैसे मुद्दलसह ठराविक दिवसात वसूल करण्यासाठी, पतपेढीसारखं आपल्या माणसाकरवी कर्जदारकडून ‘डेली कलेक्शन’ म्हणजेच रोजची वसुली करतो. उदाहरण द्यायचे झाले तर समजा अमित ने राजेश नावाच्या सावकाराकडून १ लाख रुपये कर्जाऊ घेतले तर, अशा परिस्थितीत अमित ला १,00,000/- वजा ५ टक्के प्रमाणे तीन महिन्याचे रुपये 15,000/- व्याज कापून अखेर 85,000/- रुपये हातात येतात. मग सावकार राजेश १000/- रुपये प्रतिदिन प्रमाणे हे पैसे १00 दिवसात अमित कडून वसूल करतो. या सावकारी कर्ज पद्धतीत व्याज आधीच कापलं जात असल्यामुळे कर्जदाराच्या हाती कमी कर्जरक्कम येते. त्यामुळे वरकरणी हे कर्ज महिना 5 टक्के व्याजाचे वाटत असले तरी ते महागच ठरते. पुढे जरा काही व्यवसायात वर खाली झाले अथवा घरात जर नेमक्या याच काळात कोणा सदस्याला मोठा आजार झाला आणि जास्त पैसे खर्च झाले की सारं गणित फसतं. मग सुरू होतो सावकाराला देण्यासाठीचं कर्ज फेडण्यासाठी बायकोचे-आईचे दागिने, संपत्ती गहाण ठेवण्याचा अथवा विकण्याचा खेळ. म्हणजे हे कर्ज कर्जदार माणसाला व त्याच्या परिवाराला खोल गर्तेत ढकलून देतं असं म्हणणं अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. या सर्वांवर कडी म्हणजे कर्जदाराकडे जर द्यायला हाती काहीच उरलं नाही तर सावकाराची माणसं कर्जदाराला सतत धमकावणे, मारहाण करणे, वेळेला घरातील स्त्रियांचे अपहरण करणे या थरापर्यंत जातात. आणि शेवटी या हतबल, परिस्थितीने गांजलेल्या कर्जदारासमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग उरत नाही.

गेल्या काही वर्षांत अशा घटनांचं प्रमाण मोठ्या संख्येने वाढलं आहे. सगळ्याच घटनांची नोंद होत नाही कारण बऱ्याच वेळेला पोलिसांची भूमिका संशयास्पद राहते. कर्जदाराला अशा परिस्थितीत मदत न करणे, गुन्हा नोंदवून न घेणे, त्यालाच उलट पैसे परत देण्याची धमकी वजा उपदेश देणे असे प्रकार सर्रास पोलिसांकडून होत असतात. म्हणजे बऱ्याच प्रकरणात कर्जदार आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेतो त्याचं कारण त्याला पोलिस प्रशासनाकडून न मिळालेली मदत हे असतं. कधी कधी जर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचू शकलात तर तिथे मदत केलीही जाते परंतु तिथपर्यंत पोहोचूच दिलं जात नाही.

काही काळापूर्वी कल्याण येथे एका इसमाने असेच सावकारी कर्ज घेतले होते त्याला जेव्हा ते वेळेत फेडता आले नाही तेव्हा सावकाराने त्याच्या बायकोचे अपहरण केले. असाच एक प्रकार मुंबईत घडला होता जेव्हा पैसे देण्यास असमर्थ कर्जदाराला जाळण्यात आले होते. नवी मुंबईतील कळंबोली परिसरातही ४-५ वर्षांपूर्वी पनवेल स्थित एका सावकाराने एका सामान्य कर्जदाराला आपल्या माणसांकरवी मारहाण केली होती व मग त्या कर्जदाराने व्यथित होऊन आत्महत्या केली होती. पुढे माध्यमांच्या दबावामुळे या सावकारावर मोठी कारवाई करण्यात आली. पण हा झाला अपवाद. या अशा घटना घडत असताना पोलीस प्रशासन नेमकं करतं काय हाच आम्हाला पडलेला प्रश्न आहे. विधिमंडळाच पावसाळी अधिवेशन सध्या चालू आहे. या अधिवेशनात हा मुद्दा गाजणार हे नक्की. पण या प्रकारे सावकारी व्यवसाय करून सामान्य जणांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या या सैतानांना कठोर शिक्षेचा कायदा संमत करण्यात यावा हि माध्यम म्हणून ‘महाराष्ट्र वार्ता’ ची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी आहे.

आम्ही महाराष्ट्रातील तमाम ‘सावकारापासून त्रस्त’ असलेल्या लोकांना आवाहन करतो की जर आपल्याला कोणी खाजगी सावकार पैशांसाठी त्रास देत असेल आणि आपली अडचण खरंच प्रामाणिक असेल तर ‘टीम महाराष्ट्र वार्ता’ आपल्याला नक्कीच या दुष्ट संकटातून मुक्त करण्यासाठी सहकार्य करेल. आपण आपली समस्या विडिओ, ऑडिओ, चॅट द्वारे आम्हाला 9372236332 या क्रमांकावर व्हाट्सअप्प द्वारे अथवा फेसबुक मेसेंजर मार्फत पाठवू शकता.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *