Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

फडणवीसांचे बोलणे बेताल आहे, यावर महाराष्ट्राच्या जनतेचे एकमत – सामना ची टीका

फडणवीसांचे बोलणे बेताल आहे, यावर महाराष्ट्राच्या जनतेचे एकमत – सामना ची टीका

सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून विरोधीपक्ष काही मुद्द्यांवर आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. विशेषकरून याची प्रचिती विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातून येतेय. याला उत्तर म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल केलेल्या अभिभाषणात देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रातील मोदी सरकारला टोले लागावले. या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधील अग्रलेखाच्या माध्यमातून प्रहार केला आहे.

आजच्या या अग्रलेखात सेना म्हणते की, “‘सत्यमेव जयते’ व ‘प्राण जाय पर वचन न जाय’ हे सगळ्यात मोठे संतवचन. हे संतवचन भाजपने पाळले असते तर विरोधी पक्षात बसून ‘मळमळ’ ओकण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. कालचे सत्ताधारी विरोधी बाकावर गेले व दुसरे कोणी ध्यानीमनी नसताना सत्ताधारी बाकांवर आले म्हणून त्यांच्यात दुश्मनांचे नाते असता कामा नये, पण हे असे कसे घडले? या चिडीतून काम करणे बरे नाही.”

सविस्तर अग्रलेख पुढीलप्रमाणे

105 आमदार निवडून येऊनही भारतीय जनता पक्ष सत्तेवर येऊ शकला नाही. ही एक पोटातली मळमळ विरोधी पक्षनेते व त्यांचे सहकारी विधानसभेत व्यक्त करीत आहेत. मळमळच ती, त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. लोकशाही परंपरेत विरोधी पक्षाला झुकते माप मिळायला हवे, पण झुकते माप म्हणजे फक्त मळमळ ओकणे व तंगड्या झाडणे नव्हे. विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस हे सभागृहात नको तितक्या तावातावाने बोलतात, पण त्यांचे बोलणे बेताल आहे यावर महाराष्ट्राच्या जनतेचे एकमत झाले आहे. राज्यातले सरकार बहुमताचे आहे व विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षभर तरी ‘ठाकरे सरकार’वर अविश्वास दाखविण्याच्या भानगडीत फडणवीस यांनी पडू नये. सभागृहात संतांची वचने वगैरे ऐकवून सरकारवर टीका करण्याची भूमिका विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी नागपुरात पार पाडली, पण ‘सत्यमेव जयते’ व ‘प्राण जाय पर वचन न जाय’ हे सगळ्यात मोठे संतवचन. हे संतवचन भाजपने पाळले असते तर विरोधी पक्षात बसून ‘मळमळ’ ओकण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती.

तीन पक्षांचे सरकार

हे तीन चाकी रिक्षासारखे आहे. सरकार त्रिशंकू आहे. या फडणवीसांच्या मळमळीवर मुख्यमंत्र्यांनीदेखील खणखणीत उत्तर दिले. रिक्षा गरीब, बेरोजगार तरुण चालवतात. रिक्षावाल्या गोरगरीबांचे हे सरकार असून ते गरीबांसाठीच चालवले जाईल. सरकार रिक्षावाल्यांचे असून बुलेट ट्रेनवाल्यांचे नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले हे महत्त्वाचे आहे. दोन्ही बाजूने संतवचनांची बरसात झाली. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांची शब्दसुमने मुक्तपणे उधळण्यात आली. कमी बोलायचे व जास्त काम करायचे हे आपले धोरण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी विरोधी पक्षापुढे आरसा ठेवला आहे. सरकार शब्दाला पक्के नाही व शेतकऱ्यांच्या तोंडास पाने पुसत आहे असे श्री. फडणवीस बोलतात. मोदी यांच्या सरकारने प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करूच हे वचन पाळले असते तर शेतकरी खूश झाला असता व परस्पर कर्जमुक्तीही झाली असती. फसवणुकीचे प्रयोग भाजप सरकारने सुरू केले आहेत. आधी स्वतः दिलेली वचने पाळा. मग संतवचनांची उधळण करा. एकीकडे संत तुकारामांचा गजर करायचा व त्याच वेळी वर्तणूक ‘मंबाजी’सारखी करायची. विरोधी पक्षाने एकदा काय ते ठरवायला हवे. संतवचने तुकाराम महाराजांची व कृती मंबाजीसारखी. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. पण समाजात एकत्रितपणे राहायचे म्हणजे एकमेकांशी अनेक प्रकारचे संबंध येणारच. हे संबंध सलोख्याचे, शिस्तबद्ध आणि समाजहितकारक असायला हवेत. म्हणजे मग त्यांचे नियमन करावयाला हवे. या कल्पनेतून आणि गरजेतूनच राज्य संस्था निर्माण झाली. त्या राज्य संस्थेत विरोधी पक्षाला महत्त्व आहेच. आम्ही ते मानतो, पण कालचे सत्ताधारी विरोधी बाकावर गेले व दुसरे कोणी ध्यानीमनी नसताना सत्ताधारी बाकांवर आले म्हणून त्यांच्यात दुश्मनांचे नाते असता कामा नये, पण हे असे कसे घडले? या चिडीतून काम करणे बरे नाही. विरोधी पक्षनेते सध्या संत साहित्याचा अभ्यास करीत आहेत. त्यांना संतांच्याच भाषेत सांगायचे तर-

‘‘चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती
व्याघ्रही न खाती सर्प तया’’।।

उद्धव ठाकरे यांचे चित्त शुद्ध आहे. त्यामुळे नवे मित्र मिळत राहतील. विरोधी पक्षाने सावधान राहावे हेच बरे! त्यांच्यातलेही बरेच जण सरकारचे मित्र बनू शकतात. कारण सरकारची नियत शुद्ध आहे!

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *