मुंबईत एनएमआयसी येथे बेलारुस, अर्जेंटिना आणि श्रीलंकेच्या सहकार्याने एनएफडीसी इंडियाने आयोजित केलेल्या बहु-राष्ट्र चित्रपट महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ
मुंबई, दि. १४: संस्कृतींना परस्परांशी जोडण्याचा आणि जगभरातील चित्रपट रसिकांना एकत्र आणण्याचा एक प्रयत्न म्हणून, भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत चित्रपट निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था असलेल्या भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडून, बेलारूस, अर्जेंटिना आणि श्रीलंकेसह चित्रपट महोत्सवांच्या मालिकेचे सह-आयोजन करण्यात येत आहे. चित्रपट आणि संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा हा सहा दिवसांचा भव्य सोहळा आहे आणि यामध्ये मंत्रमुग्ध करणाऱ्या चित्रपटांच्या विश्वात चित्रपटरसिक स्वतःचे भान पूर्णपणे हरपून जातील.
या बहुराष्ट्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आज महाराष्ट्रात मुंबईमध्ये पेडर रोड येथील भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात(एनएमआयसी) झाला. या सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या प्रारंभाला अधोरेखित करणाऱ्या या संस्मरणीय कार्यक्रमाद्वारे भारतीय चित्रपटांच्या समृद्ध वारशाच्या जोडीने सर्वोत्तम भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या प्रदर्शनाची हमी मिळत आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर प्रत्येक सहयोगी देशाला समर्पित चित्रपट महोत्सव होणार आहे.
आज या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात निवडक असामान्य भारतीय चित्रपटांसोबत बेलारुसी चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. बेलारुस चित्रपट महोत्सवासाठी एनएफडीसीने बेलारुसमध्ये आतापर्यंत ६५० पेक्षा जास्त फीचर फिल्म्स, २००० माहितीपट आणि ३०० ऍनिमेटेड फिल्म्सची निर्मिती करणाऱ्या नॅशनल फिल्म स्टुडियो ‘बेलारुस फिल्म’ या आघाडीच्या चित्रपट उद्योग आस्थापनेसोबत सहकार्य केले.
या कार्यक्रमाला बेलारुसचे मुंबईतले महावाणीज्य दूत अलियाकसांद्र मात्सुकोऊ आणि रशियन महासंघाचे कौन्सुल जनरल अलेक्साई व्ही. सुरोव्त्सेव यांच्यासोबत एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन आणि दोन्ही दुतावासांचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या चित्रपट महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करत एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन म्हणाले, “ एनएफडीसी-बेलारुस चित्रपट महोत्सव, चित्रपटांच्या माध्यमातून परस्परांच्या संस्कृतींना जोडणाऱ्या सेतूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने इतर विविध देशांसोबत ऩियोजन केलेल्या चित्रपट महोत्सवांच्या मालिकांमधील पहिला महोत्सव आहे. या महोत्सवाचे वेगळेपण म्हणजे भारतीय आणि बेलारुसियन चित्रपट भारतात पहिल्यांदाच एकत्रित दाखवले जात आहेत. पहिल्याच दिवशी आम्हाला अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला आहे आणि या महोत्सवाची लोकप्रियता यापुढे आणखी वाढतच जाईल.”
बेलारुसचे महावाणीज्य दूत अलियाक्सांद्र मात्सुकोऊ म्हणाले, “ भारतात आयोजित होत असलेल्या या चित्रपट महोत्सवात आमचे चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळणारा पहिला देश असल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे. एनएफडीसीसोबतचा माझा अनुभव अतिशय अतुलनीय असून त्यांना देखील आमच्याप्रमाणेच चित्रपटांविषयी जिव्हाळा आहे.” एनएफडीसीमधील अतिशय भव्यदिव्य अशा वातावरणामुळे भारतीय प्रेक्षकांसमोर आपले चित्रपट प्रदर्शित करायला इतर देशांना हुरुप येतो, असे सांगितले आणि चित्रपट हा आपल्या हृदयाकडे आणि आपल्या मनांकडे जाणारा मार्ग आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
द लंचबॉक्स या लोकप्रिय हिंदी चित्रपटात भूमिका साकारणारी श्रुती बाफना ही अभिनेत्री या उद्घाटन समारंभात माननीय अतिथी म्हणून सहभागी झाली. “या चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या टप्प्यात प्रदर्शित करण्यात येणाऱ्या तीन भारतीय चित्रपटांपैकी एक म्हणून द लंचबॉक्स ची निवड झाल्यामुळे मी अतिशय आनंदीत आहे. मुंबईतल्या सिनेरसिकांना जागतिक सिनेमाचा आनंद घेता येईल यासाठी देण्यात आलेला अशा प्रकारचा मंच पाहिल्यावर एक अभिनेत्री म्हणून मला खूपच जास्त आनंद होत आहे,” बाफना हिने सांगितले.
उद्घाटन समारंभाला दुपारी साडेतीन वाजता सुरुवात झाली. त्यानंतर चार वाजल्यापासून चित्रपट प्रदर्शनाला सुरुवात झाली. बेलारुसच्या महोत्सवाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहेः
- 11 मे , 2024: फिल्ममेकर्स
- 12 मे, 2024: छाड
- 13 मे, 2024: अॅक्रॉस द रिव्हर
- 14 मे, 2024: द लंचबॉक्स
- 15 मे, 2024: वेटिंग लिस्ट
- 16 मे, 2024: सलाम बॉम्बे
सांस्कृतिक आकलन आणि विविधतापूर्ण सिनेमॅटिक स्वरांचा बहुमान यांना चालना देणाऱ्या या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा एक भाग बनण्याचे निमंत्रण एनएफडीसीने सर्वांना दिले आहे. विविध सिनेमॅटिक संस्कृतीचे अतिशय सुंदर मिश्रण असलेल्या या भव्य चित्रपट सोहळ्यामध्ये अनेकजण सहभागी होतील, अशी आशा या संस्थेने व्यक्त केली आहे.