
महाडच्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज
महाड, दि. २८: १९४ – महाड विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार स्नेहल जगताप यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरून झाल्यावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी विद्यमान आमदार भरत गोगावले यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांनी उपस्थितांना आवाहन केलं कि, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन भूमीतून ह्यावेळी गद्दाराला गाडून महाराष्ट्रप्रेमी आमदाराला निवडून द्या”.
ह्या सभेत अजित पवार गटाचे जेष्ठ नेते आणि महाड विधानसभा अध्यक्ष बाबू खानविलकर आणि चंद्रकांत जाधव ह्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहिर प्रवेश केला. ह्यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, दक्षिण रायगड संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड, सहसंपर्कप्रमुख बाळकृष्ण राऊळ, काँग्रेस नेते श्रीनिवास बेंडखळे, माजी जिल्हाप्रमुख विजयराज खुळे, दापोली विधानसभेचे उमेदवार आणि रत्नागिरी जिल्हाप्रमुख संजय कदम, दक्षिण रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख स्वाती घोसाळकर, जिल्हासंघटक स्वीटी गिराशे, जिल्हा युवाअधिकारी चेतन पोटफोडे, महाड शहरप्रमुख सुदेश कळमकर, महाड तालुका संघटक वर्षा कालप, महाड तालुका संपर्कसंघटक ज्योती मनवे, महाड शहरसंघटक तृप्ती रत्नपारखे उपस्थित होत्या.
सभा भर दुपारी उन्हात असूनही मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असल्याचे पहायला मिळाले. स्नेहल जगताप या कॉंग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या असून त्यांनी महाड नगरपरिषदेचं नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे बंडखोरी करत आपल्यासोबत ४० आमदार फोडले. या आमदारांमध्ये महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत गोगावलेही होते. त्यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्नेहल जगताप यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश देत मोठी खेळी खेळली. आगामी निवडणुकीत स्नेहल जगताप भरत गोगावले यांच्या गडाला धक्का देतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.