
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मराठमोळ्या विजया रहाटकर यांची नियुक्ती
नवी दिल्ली/मुंबई, दि. १९: भाजपच्या विद्यमान राष्ट्रीय सचिव व राजस्थान भाजपच्या सह प्रभारी विजया रहाटकर यांची केंद्र सरकारने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. यासंदर्भात अधिसूचना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने काल निर्गमित केला. मराठवाड्यातील छ. संभाजीनगरच्या लेक असलेल्या रहाटकर या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या पहिल्याच मराठी व्यक्ती आहेत. यापूर्वी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणूनही काम केलेलं आहे. पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी प्राप्त झालेल्या विजया रहाटकर यांनी इतिहास विषयात येथूनच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
१९९५ साली आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाल्यावर २००० ते २०१० दरम्यान त्यांनी औरंगाबाद महानगरपालिकेत नगरसेवक पद भूषवलं. याच काळात २००७ ते २०१० दरम्यान, रहाटकर यांची औरंगाबाद महानगरपालिकेच्या महापौर पदीही वर्णी लागली होती. या दरम्यान राष्ट्रीय महापौर परीषदेच्या उपाध्यक्षपदी व महाराष्ट्र महापौर परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. २०१० व २०१४ साली अशा दोन वेळा त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा कार्यभार वाहिला होता तर यानंतर २०१४ साली विजया रहाटकर भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.