२०१७ नंतरची १६ वी सुटका
रोहतक, दि. २९ : बलात्कार आणि हत्या प्रकरणांमध्ये शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह याला पुन्हा एकदा ३० दिवसांची परोल मंजूर करण्यात आली असून मंगळवारी सकाळी हरियाणातील रोहतक येथील सुनारिया कारागृहातून त्याची सुटका करण्यात आली. ५७ वर्षीय राम रहीमला २०१७ मध्ये दोषी ठरल्यानंतर आतापर्यंत तब्बल १६ वेळा परोल किंवा फरलोवर तुरुंगाबाहेर येण्याची संधी मिळाली आहे.
यापूर्वी जानेवारी २०२६ मध्येही त्याला अशाच प्रकारे परोल देण्यात आली होती. त्याआधी ऑगस्ट २०२५ मध्ये ४० दिवसांची परोल, एप्रिल २०२५ मध्ये २१ दिवसांची फरलो आणि जानेवारी २०२५ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ३० दिवसांची परोल मंजूर करण्यात आली होती.
तसेच ऑक्टोबर २०२४ मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकांपूर्वी त्याला २० दिवसांची परोल देण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये २१ दिवसांची फरलोही मंजूर करण्यात आली होती. याशिवाय फेब्रुवारी २०२२ मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकांपूर्वी अवघ्या दोन आठवडे आधी त्याला तीन आठवड्यांची फरलो देण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम रहीमला दिल्या जाणाऱ्या परोल आणि फरलोबाबत विरोधक आणि विविध सामाजिक संघटनांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीसह अनेक शीख संघटनांनी राम रहीमला वारंवार परोल आणि फरलो देण्यावर यापूर्वी तीव्र आक्षेप घेतला होता. या निर्णयांमुळे न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची टीकाही करण्यात आली होती.
दरम्यान, मार्च २०२६ मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने पत्रकार हत्या प्रकरणात राम रहीमची निर्दोष मुक्तता केली होती. २००२ मधील या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र सात वर्षांनंतर उच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला.
तसेच मे २०२४ मध्ये उच्च न्यायालयाने डेराच्या माजी व्यवस्थापक रणजीत सिंह हत्या प्रकरणातही राम रहीम आणि इतर चार आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. विशेष सीबीआय न्यायालयाने दिलेला दोषी ठरवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला होता.
हरियाणातील सिरसा येथे मुख्यालय असलेल्या डेरा सच्चा सौदाचे हरियाणा, पंजाब, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनुयायी आहेत. हरियाणातील सिरसा, फतेहाबाद, कुरुक्षेत्र, कैथल आणि हिसार या जिल्ह्यांमध्ये डेराचा प्रभाव लक्षणीय मानला जातो.
परोलच्या कालावधीत गुरमीत राम रहीम सिंह हा सिरसा येथील डेरा मुख्यालयातच राहणार असल्याची माहिती डेरा सच्चा सौदाचे प्रवक्ते आणि वकील जितेंद्र खुराना यांनी दिली आहे.
