Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उरणमधील नव्याने उत्पन्न झालेल्या पुरस्थितीला जवाबदार कोण ?

कोट्यवधी खर्च करूनही सिडकोची आधुनिक यंत्रणा निकामी

उरण, दि.२३(विठ्ठल ममताबादे): राज्य व केंद्र सरकारच्या अनेक प्रकल्पामुळे उरणचे नाव देश पातळीवर गेलं आहे. पण आता उरणची नवी ओळख निर्माण होऊ पाहत आहे, ती म्हणजे पूरग्रस्त उरणची. उरणला आज पर्यंत कोणताही पुराचा इतिहास नाही. या भागात शेती आणि मिठागरे असतांना मागील अनेक वर्षे सलग ४ ते ५ दिवस पाऊस होऊनही पूर येत नव्हता. पण सध्या सलग २४ तास पाऊस झाला की गावात घुडघाभर पाणी साचू लागलं आहे. आणि दुसरीकडे गावापेक्षा किती तरी फूट उंचीचा असलेल्या रस्तावरही ३ फुटांपर्यंत पाणी साचू लागले आहे. एवढंच नव्हे तर ऐन उन्हाळ्यात बोकडविरा ते फुंडे स्थानक(सिडको कार्यालया पर्यंत) च्या रस्त्यावर पाणी भरण्याच्या घटना घडत आहेत. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कडेला भिंत बांधली होती. आजही ती आहे. मात्र पाण्याची पातळी वाढल्याने व रस्ता खाचल्याने पाण्याचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर पाणी येणे ही नित्याची बाब झाली आहे. तर जेएनपीटी कामगार वसाहत ते नवघर फाटा हा मार्ग सुद्धा पावसाळ्यातील पाणी भरण्याचे नेहमीचे ठिकाण बनले आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक आहे. त्याच प्रमाणे सध्या उरणच्या पूर्व विभागात सुरू असलेल्या विकासामुळे विंधणे, कंठवली, दिघोडे ते वेशवी पर्यंत चा रस्ताही दरवर्षी पाण्याखाली जात आहे. उरण शहरात तर कुंभारवाडा, केगाव, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि न्यायालय परिसर या ठिकाणी पाणी शिरलं. उरण मधील बोकडविरा, फुंडे, भेंडखल, नवघर, कुंडेगाव, जसखार, करल, सोनारी, सावरखार, पूर्व विभागातील चिरनेर या गावांतही पाणी साचू लागलं आहे. चिरनेर तर तालुक्यातील पूरग्रस्त गाव बनला आहे.

काय आहेत कारणे?

उरणच्या विकासासाठी सिडकोने येथील शेती, मिठागरे यांच्या वर मातीचा भराव केला. त्यावेळी या भागातील भरती ओहटीचे त्याच प्रमाणे पावसाचे पाणी याचा निचरा करण्यासाठी असलेले नाले(पवळी) बुजविण्यात आल्या. त्यामुळे येथील नैसर्गिक मार्गच बंद झाले. त्याचप्रमाणे ते आकुंचित केले गेले. त्याचा परिणती म्हणून समुद्राच्या पाण्याने आपली वाट बदलली व ते थेट गावात शिरू लागले आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावर येऊ लागलं आहे. जे सिडकोने केले तेच जेएनपीटीनेही केले.

कोट्यवधी खर्च करूनही सिडकोची आधुनिक यंत्रणा निकामी

उरण मध्ये विकासाची कामे करीत असताना सिडकोने अगदी जागतिक पातळीवर येथील भरती-ओहटीच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणेचा अभ्यास केला. त्यासाठी करोडो रुपये खर्च केले. उरण मध्ये डच या देशाच्या धर्तीवर पाण्याचा निचरा करण्यासाठी होल्डींग पौंड (धारणतलाव) तयार केले आहेत. अशा प्रकारचे सहा होल्डिंग पौंड आहेत असं सिडको कडून सांगितलं जातं. पण आजच्या स्थितीत यातील एकाही तलावात पाणी साचत नाही याचे कारण या तलावात मातीचा गाळ साचला आहे. या गाळावर सध्या खारफुटी उगवली आहे. ती हटविल्याशिवाय या तलावातील गाळ काढता येऊ शकत नाही. त्यासाठी मागील १५ वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात सिडकोची याचिका असल्याचे उत्तर सिडको कडून दिल जात आहे.

जेएनपीटीचे ढिसाळ नियोजन 

जसखार, सोनारी, करळ व सावरखार या चार गावात पाणी शिरल्यावर त्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात, परंतु समस्या मात्र कायम आहे. पाणी साचून येथील घरांचं नुकसान होणं सुरूच आहे.

पूरग्रस्त होण्याचा धोका

उरणचा विकास चालू असताना सिडको तसेच JNPT प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे योग्य नियोजन केले जात नसल्याने उरणला नेहमी पुराचा धोका बसत आहे. उरणच्या विकासा संदर्भात नेहमी चुकीच्या पद्धतीने नियोजन केले जात असल्याने त्याचे गंभीर परिणाम येथील नागरिकांना, ग्रामस्थांना भोगावे लागत आहे. पाऊस सतत, मुसळधार पडला की उरण मध्ये पूर येतो व शेतीचे, फळ बागांचे तसेच नागरिकांच्या घरांचे अतोनात नुकसान होते. नुकसानग्रस्त पीडिताला योग्य ती मदत पोहोचतच नाही.

जमिनी गेल्याने प्रकल्पग्रस्त झालोच आहोत पण यापुढे दक्ष नागरिक म्हणून जागे होऊन आपल्या गाव आणि परिसरात गटारे, नागरी सुविधा याकरीता सिडको व जेएनपीटी कडून खर्च करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा निधी हा योग्य प्रकारे खर्च होऊन काम होते का याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ते न झाल्यास उरणला पूरग्रस्त होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही.
– नरेश कोळी,
हनुमान कोळीवाडा येथील रहिवाशी तथा सामाजिक कार्यकर्ते

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *