वादळी वारे व अवकाळी पर्जन्यवृष्टीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे मदतकार्य
नवी मुंबई, दि. १४: काल दि. 13/5/2024 रोजी सायं. 4.05 वा. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वादळी वातावरण निर्माण झाले. हे वादळी वारे पालघर, डहाणू येथून सुरू होऊन भिवंडी, कल्याण, बदलापूर मार्गे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येऊन धडकले. ताशी 107 कि.मी. इतका वाऱ्याचा वेग होता. या वादळासोबत अवकाळी पाऊसदेखील सुरू झाला.
वादळी वाऱ्याच्या तीव्रतेमुळे बऱ्याच ठिकाणी झाडे व झाडांच्या मोठ्या फांद्या पडल्याच्या तक्रारी महापालिका मुख्यालयातील तात्काळ कृती केंद्रास प्राप्त झाल्या.
वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो प्रवास टाळावा व आहे त्या ठिकाणी थांबावे तसेच मदतीची गरज असल्यास महानगरपालिकेच्या आपत्तकालीन कृती केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन सोशल मीडियाद्वारे संपर्कध्वनी क्रमांकासह प्रसारित करण्यात आले.
सायंकाळी 4.05 ते 5.35 च्या कालावधीत महापालिका क्षेत्रात 13. 83 मि.मि. पर्जन्यवृष्टीची नोंद झाली असून 36 झाडे/झाडांच्या मोठ्या फांद्या कोसळल्या असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागास प्राप्त झालेली आहे. वादळ संपल्यानंतर त्वरित सदर झाडे/फांद्या तसेच ठाणे बेलापूर रस्त्याला वाकलेले दोन विजेचे पोल आणि दिघा येथे मुकंद अंडरपासखाली साचलेले पाणी हटवून रहदारीला कोणताही अडथळा येणार नाही यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार वाऱ्याचा जोर काहीसा ओसरू लागल्यानंतर सर्व विभागांमध्ये मदतकार्य यंत्रणा तत्परतेने कार्यान्वित झाली व मदतकार्य सुरु झाले.
सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी, अग्निशमन दल, अभियंते, आपत्कालीन यंत्रणा, घनकचरा व्यवस्थापन यांनी सातत्यपूर्ण काम करून साधारणत: आठ वाजेपर्यंत सर्वच विभागांमध्ये रहदारीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही अशा प्रकारे कार्यवाही केली. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनीही विविध घटनास्थळी भेटी देऊन कामाला गती देण्याचे निर्देश दिले. या वादळामुळे काही ठिकाणी पत्रे उडाल्याच्या घटनाही निदर्शनास आल्या असून तेथेही मदतकार्य करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही प्रकारची जिवित अथवा वित्तहानी झालेली नाही.