स्थलांतरितांसाठी लागू असलेल्या नमुना १० ऐवजी नमुना ८ चा वापर करून अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप; चौकशीची मागणी
ठाणे, दि. १५ : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांदरम्यान ठाणे महानगरपालिकेतील मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक ३० विशेष चर्चेत राहिला होता. या प्रभागातून सहर शेख यांनी विजय मिळवत राजकारणात प्रवेश केला होता. निवडणुकीनंतर त्यांच्या वक्तव्यांमुळेही त्यांची राज्यभर चर्चा झाली होती. दरम्यान, आता त्यांच्या विरोधात शासकीय यंत्रणांची दिशाभूल करून जात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या(AIMIM) नगरसेविका सहर शेख यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जात प्रमाणपत्र मिळविल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित तक्रारदाराने सखोल चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील रहिवासी युनूस इक्बाल शेख हे महाराष्ट्रात स्थलांतरित झाले होते. स्थलांतरितांसाठी लागू असलेल्या नमुना १० ऐवजी नमुना ८ चा वापर करून अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आहे. या आधारे सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय येथून जात प्रमाणपत्र प्राप्त केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी ठाणे महानगरपालिका निवडणूक लढवून विजय मिळविला.
या संदर्भात सिद्दिकी अहमद यांनी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करून सहर शेख यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. तक्रारदाराच्या मते, संबंधित प्रक्रियेत शासकीय नियमांचे उल्लंघन करण्यात आले असून अधिकाऱ्यांची दिशाभूल झाली आहे.
तक्रारीनुसार, १८ मार्च रोजी झालेल्या सुनावणीस युनूस शेख अनुपस्थित राहिले होते. त्यानंतर २३ मार्च रोजी झालेल्या पुढील सुनावणीत ठाणे तहसीलदारांनी सादर करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रातील काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. तसेच ठाण्यात वास्तव्यास असलेल्या सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रमाणपत्र का घेतले, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिकृत चौकशी सुरू असून संबंधित यंत्रणांकडून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या ठाणे महानगरपलिकेच्या निवडणुकीत सहर शेख यांनी मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक ३० मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती. ज्यात त्यांना यश आलं. परंतू, ही निवडणूक लक्षात राहिली वेगळ्याच कारणासाठी. कधीकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे आमदार माजी कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय राहिलेल्या शेख कुटुंबाने राष्ट्रवादीकडून तिकीट नाकारले गेल्यावर थेट एमआयएएमआयएम तर्फे सहर शेख च्या नावाने उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सहर शेख व त्यांचे वडील युनूस शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जहरी टीका केली होती. निवडून आल्यावर सहर शेख यांनी विजयी सभेत आव्हाड यांना डीवचण्याच्या हेतूने म्हंटलेला ‘कैसे हराया’ हा डायलॉग फार प्रसिद्ध पावला होता.
Photo Credit – Sahar Shaikh AIMIM Facebook Page
