एम्सच्या द्वितीय दीक्षान्त समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन
नागपूर, दि. १५ : वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावाबरोबरच आयुष्यभर शिकत राहण्याची वृत्ती जपणे आवश्यक असून, करुणा, प्रामाणिकपणा आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत संशोधन, जिज्ञासा आणि निरंतर शिकण्याची वृत्ती आत्मसात करण्याचे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
केंद्रीय आयुर्विज्ञान संस्थेच्या द्वितीय दीक्षान्त समारंभात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच संस्थेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, “वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावाबरोबरच आयुष्यभर शिकत राहण्याची वृत्ती जपायला हवी. वैद्यकीय क्षेत्रात नैतिक मूल्यांचे स्थान सर्वतोपरी आहे. जिज्ञासा, संशोधन आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती आत्मसात करा. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ते करुणा, प्रामाणिकपणा आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोनाची जागा घेऊ शकत नाही. वैद्यकीय क्षेत्रात यशासह करुणेचा भाव जपल्यास तुम्ही एक उत्तम व्यक्तीही होऊ शकाल.”
त्या पुढे म्हणाल्या की, “वैद्यकीय क्षेत्र हा केवळ एक व्यवसाय नसून संवेदनशीलतेने मानवतेची सेवा करण्याचा एक मार्गही आहे. एक वैद्यकीय चिकित्सक केवळ आजारांवर उपचार करत नाही, तर तो आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीच्या मनात आशेचा संचारही निर्माण करतो. चिकित्सकाचा सहानुभूतीचा सल्ला केवळ आजारी व्यक्तीलाच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयांनाही आधार देतो. अनेकदा डॉक्टरांसमोर कठीण परिस्थिती निर्माण होते. मात्र, अशा परिस्थितीतही रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदनशील राहणे आवश्यक आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी देखील आरोग्य कर्मचाऱ्यांशी नेहमी सन्मानाने वागायला हवे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे.”
आरोग्य सेवा क्षेत्रातील बदलांचा उल्लेख करत राष्ट्रपती म्हणाल्या की, “आरोग्य सेवा क्षेत्र सातत्याने बदलत आहे. जगभरात नवनवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल आरोग्य सेवा आणि प्रगत संशोधनाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती होत आहे. आपण हे बदल आत्मसात करून पुढे वाटचाल केली पाहिजे. तंत्रज्ञान विकासाचा उपयोग ग्रामीण आणि शहरी भागांतील आरोग्य सुविधांची दरी कमी करण्यासाठी आणि सर्वांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी केला पाहिजे.”
त्यांनी केंद्र शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा उल्लेख करत “आयुष्मान भारत योजना, आयुष्मान आरोग्य मंदिर, डिजिटल हेल्थ मिशन, लसीकरण कार्यक्रमांचा विस्तार, राष्ट्रीय टीबी निर्मूलन कार्यक्रम, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग आणि राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम यांसारख्या उपक्रमांमुळे आरोग्य सेवांमध्ये व्यापक सुधारणा होत आहेत. स्वस्त व दर्जेदार औषधांसाठी अमृत फार्मसी आणि जन औषधी केंद्र सुरू करण्यात आली आहेत,” असेही नमूद केले.
यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी जीवनशैलीशी निगडित आजारांमध्ये वाढ होत असल्याचे नमूद करत सार्वजनिक आणि धर्मादाय आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी केंद्रीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर आणि महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ यांच्यात अधिक समन्वय आणि सहकार्य वाढविण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
समारंभात वैद्यकीय विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. संशोधन, अनुभव आणि कौशल्यांची देवाणघेवाण वाढवून आरोग्य सेवा व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
