कौटुंबिक छळ, बळजबरीने गोमूत्र पाजल्याचा आणि केस कापल्याचा आरोप
ठाणे, दि. ११ : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडविणाऱ्या एका प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा तथा नगरसेवक गितेश राऊत आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळासंबंधी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीजा राऊत यांनी आपल्या तक्रारीत कुटुंबीयांकडून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचे गंभीर आरोप केले आहेत. तक्रारीनुसार, त्यांच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले असून, घरामध्ये बळजबरीने गोमूत्र पिण्यास भाग पाडण्यात आले, असा आरोपही करण्यात आला आहे.
याशिवाय, गिरीजा राऊत यांनी आपल्या तक्रारीत असा आरोप केला आहे की, कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या डोक्यावरील केस जबरदस्तीने कापले. या संपूर्ण प्रकारामुळे स्वतःला मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या तक्रारीची दखल घेत कापूरबावडी पोलिसांनी माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे पुत्र गितेश राऊत, त्यांच्या पत्नी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदी आणि महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कथित अघोरी कृत्यांशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या ‘फिरोज बाबा’ आणि ‘काजी बाबा’ या दोन व्यक्तींचाही प्रथम माहिती अहवालात समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधातही संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत.
