कौटुंबिक छळ, अघोरी उपचार व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा; दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी दावे, प्रकरणाचा तपास सुरू
ठाणे, दि. १२ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा व मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक गितेश राऊत तसेच कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळ आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली, तर दुसरीकडे माजी खासदार विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.
गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लग्नापूर्वी त्यांना सांगण्यात आलेली माहिती आणि प्रत्यक्ष वैवाहिक आयुष्य यामध्ये मोठा फरक होता. त्यांनी आरोप केला की, “त्यांनी आमची फसवणूक केली, लग्नाआधी सांगितलेल्या सर्व गोष्टी वेगळ्या होत्या. लग्नानंतरचं पूर्ण चित्र वेगळं होतं. प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गितेश आणि त्याच्या परिवाराकडून छळ करण्यात आला. सात वर्ष त्यांनी छळ करून माझा आणि माझ्या परिवाराचा घात केला आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे एक मोठा परिवार असल्याने आणि मला नेहमी गितेशबरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच तक्रार केली नव्हती. आज ना उद्या सगळं बदलेल या आशेवरती आम्ही आनंदाने राहू असं वाटत होतं, पण असं काही घडलं नाही. त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं घर, फ्लॅट, पैसे वगैरे, जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे. त्याने जी माझी छळवणूक केली, प्रत्येक गोष्टीत त्यांनी केलेली शाब्दिक सुनावणी आणि मारहाण त्यांनी माझ्याबरोबर केली, ते आता लपवण्यासाठी ते खोटं स्टेटमेंट देत आहेत.”
गिरीजा राऊत यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील काही घटनांचाही उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “२०१८ मध्ये म्हणजेच डिसेंबर २०१७ ला लग्न झाल्यापासून सप्टेंबर २०१८ पर्यंत आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते. त्यासाठी आमच्या फॅमिलीने बसून बोलणी केली आणि असं ठरलं होतं की, गणपतीवरून आल्यानंतर या गोष्टीवर काम करायला सुरुवात करू. पण गणपतीवरून आल्यानंतरच थोडक्यात अशी एक घाबरण्याची घटना झाली, ज्याला त्यांनी अघोरी इलाजांचं स्वरूप दिलं. हे कृत्य त्यांनी अक्षरशः सप्टेंबर २०१८ पासून २०२२ सालापर्यंत सुरू ठेवलं.”
त्यांनी पुढे आरोप केला, “या अघोरी कृत्यादरम्यान त्यांनी माझी मेडिकल ट्रीटमेंट केली. मला हायपोथायरॉईड असूनही त्यांनी मला जे अँटी-डिप्रेसेंट वगैरे दिले, त्याच्यामुळे मला सर्वोपरि त्यांनी प्रचंड त्रास दिलेला आहे. अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे. मग ते बाबा त्यांच्या त्यांच्या परीने इलाज करत होते; कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होतं, कोणी कणकेच्या बाहुल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे आणि डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होतं. कच्चे गोमूत्र किंवा हळद खायला देणे, किंवा देवीसमोरील अगरबत्तीची उदी तीर्थ म्हणून पेला-पेला भरून प्यायला देणे असे सगळे विचित्र प्रकार केले. ते फक्त त्यांचा मुलगा शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग करून माझं आयुष्य बरबाद केलं आहे.”
मानसिक छळाबाबत बोलताना त्यांनी सांगितले, “राजकीय दबाव जास्ती असण्यापेक्षा जो एक मेंटल ट्रॉमा मला दिला जात होता, घरच्यांकडून जे प्रेशराईज केलं जात होतं, जसं की नवरा मला मारहाण करून बोललेला आहे की, ‘माझ्या वडिलांनी दोन कोटी रुपये इलेक्शनसाठी लावलेले आहेत. तुझ्यामुळे त्यांच्या इमेजला जर धक्का गेला, तर तू बघ तुझं मी काय करीन’, असं सगळं म्हणजे इतकी विकृत वागणूक त्यांनी मला दिली. त्यांनी मला एका ट्रॅप मोडमध्ये ठेवलेलं होतं, ज्यामुळे नॉर्मल लाईफ हे माझ्यासाठी कधी नव्हतंच. त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की काय ट्रॉमा त्यांनी मला या सात वर्षांत दिलेला आहे.”
विनायक राऊत यांच्या भूमिकेबाबत बोलताना गिरीजा राऊत म्हणाल्या, “विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीबरोबर आणि मुलीबरोबर दुसऱ्या घरात राहतात. आम्ही या घरी राहतो, जे झोपडपट्टीत आहे. आम्हाला लग्नाच्या बोलणींपासून कधीही सांगण्यात आलं नव्हतं की दुसरं घर हे झोपडपट्टीत आहे. विनायक राऊत हे नवरात्रीच्या दिवशी घट बसतात त्या दिवशी आणि घट उठतात म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी, फक्त त्याच दोन दिवशी आमच्या घरी यायचे. इतर वेळी ते कधीही आमच्या घरी आले नाहीत. ते फोनवरून मला सांगायचे की, ‘तू अमुक गोष्ट कर, तू ही जबाबदारी घ्यायला पाहिजे, तू ती जबाबदारी घ्यायला पाहिजे’, पण त्यांनी त्यांच्या मुलाला किंवा त्यांच्या बायकोला कुठलीही गोष्ट समजावून सांगितली नाही. ते कधीही फोरफ्रंटवर आले नाहीत, ज्याच्यामुळे या दोघांचा अजून राग आणि फ्रस्ट्रेशन त्यांनी माझ्यावरच व्यक्त केलं. एक कुटुंबप्रमुख म्हणून जसं माझ्या सासऱ्यांनी हे सगळं त्या दोघांना सांगायला पाहिजे होतं, ते त्यांनी कधीही केलेलं नाही.”
त्या पुढे म्हणाल्या, “विनायक राऊत एका ठिकाणी होते, पण हे अघोरी उपचारांसाठी आम्ही जिथे जिथे गेलेलो आहोत, ते सगळे कोकण पट्ट्यातले आहेत आणि मूळतः ते सिंधुदुर्ग पट्ट्यातले आहेत. त्यांनी जिथे जिथे सांगितलेलं आहे, तिथे तिथे आम्ही सगळीकडे हे इलाज केलेले आहेत.”
आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत त्यांनी सांगितले, “मला असं वाटतं की, त्यांनी आणि ज्यांनी मला जवळून पाहिलेलं आहे त्या सगळ्यांनी हा विचार करावा की, मी सात वर्ष तिथे होते. माझ्याकडे बऱ्याच संधी होत्या, जिथे मी त्यांच्याकडून पैसे उकळू शकत होते किंवा त्यांच्या काही गोष्टींवर माझा हक्क दाखवू शकत होते, पण मी त्यात कधीही नव्हते. माझ्या सिम्पल अपेक्षा होत्या—माझ्या नवऱ्याबरोबर माझा सुखी संसार आणि माझ्या घरच्यांबरोबर आनंदाने नांदणं. ते त्यांनी न देता इतर गोष्टींमध्ये मला भरीस पाडून वेगवेगळ्या तऱ्हेने छळलं आणि माझं आयुष्य अपमानित व घाणेरडं केलं.”
दरम्यान, या सर्व आरोपांचे माजी खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट शब्दांत खंडन केले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “मी आणि माझ्या कुटुंबीयांवर लावलेले आरोप खोटे आहेत. गेल्या तीन वर्षांपासून गितेश आणि गिरीजा एकत्र राहत नाहीत. २०१८ मध्ये घटना घडली असे सांगते आणि २०२६ मध्ये त्याची तक्रार करत आहेत. यातंच काही काळं आहे. प्रत्येक वेळी तिचे आई-वडील तिच्यासोबत होते. सध्या त्यांची घटस्फोट केस सुरू आहे.”
ते पुढे म्हणाले, “या नोटिशीमध्ये दर महिन्याला खर्चासाठी पाच लाख रुपये द्यावे, अशी मागणीही गिरीजा राऊत यांनी केली होती. याशिवाय दहा कोटींची अधिक रक्कम द्यावी. मानसिक नुकसानभरपाई दोन कोटी रुपये द्यावी, अशी मागणी गिरीजा राऊत यांनी केली आहे. पाच रूमचं घर आणि ऑटोमॅटिक गाडी मागितली आहे. या मागण्या पूर्ण होत नाहीत, म्हटल्यावर तिने तक्रार केली.”
अघोरी उपचारांच्या आरोपांबाबत प्रतिक्रिया देताना विनायक राऊत म्हणाले, “आम्ही अघोरी उपचारांच्या आरोपांचे पूर्ण खंडन करतो. आम्ही त्या पंथातले नाही. आई-वडील समोर असताना तेव्हा तक्रार केली नाही. या संदर्भात आम्ही न्यायालयात गेलो आहोत.”
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, तक्रारीतील आरोपांची पडताळणी, संबंधित व्यक्तींचे जबाब, उपलब्ध पुरावे आणि इतर कायदेशीर बाबींची छाननी केली जात आहे. या प्रकरणातील आरोप आणि प्रत्यारोपांची सत्यता न्यायालयीन व पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार असून, सध्या दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका सार्वजनिकपणे मांडली आहे.
