Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मंत्री म्हणून नको असलेले शिवसेनेचे काही खासदार भाजपने पाडले : राज ठाकरे

लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मंत्री म्हणून नको असलेले शिवसेनेचे काही खासदार भाजपने पाडले : राज ठाकरे


मुंबई: २०१४ च्या विधानसभा निवडणुका, २०१७ च्या महापालिका निवडणुकांत आपल्या पक्षाचा जो निकाल समोर आला तो मला मान्यच नाही, कारण ईव्हीएमच्या जोरावर ह्यांनी मतदान फिरवलं. असा थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात करून खळबळ उडवून दिली. आजच्या आपल्या वादळी भाषणात ईव्हिएम मशिन वर शंका घेताना ते म्हणाले, “जर समजा एखाद्या मतदारसंघात १ लाख मतदान झालं असेल तर तिथे १ लाख २० हजार मतदान मोजणीच्या वेळेस समोर येऊच कसं शकतं, बरं निवडणूक आयोगात जाऊन देखील न्याय मिळत नाही, ना न्यायालयांमध्ये. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या वेळेस शिवसेनेचे काही खासदार त्यांनी मंत्री म्हणून नको होते नेमके तेच लोकं पाडले गेले, अमरावतीमध्ये आनंदराव अडसुळ पडले, आढळराव पाटील, अनंत गीते पडले… आणि काँग्रेसचा एक खासदार जो शिवसेनेत होता आणि काँग्रेसमध्ये गेला नेमका तोच खासदार निवडून आला.”

पुढे ते म्हणाले २३ मेला लोकसभा निवडणुकीत २८ पैकी २५ जागांवर भाजपचे खासदार निवडून आले, तर पुढे चारच दिवसात त्याच राज्यात कर्नाटकातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस मोठ्या प्रमाणावर निवडून आली. कशी? तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या मतपत्रिकांवर घेतल्या गेल्या. हे लोकं राम मंदिराबद्दल बोलत आहेत. जेंव्हा सीतामाई लंकेवरून परत आल्या तेंव्हा एका धोब्याने त्यांच्यावर शंका घेतली, तेंव्हा श्रीरामचंद्रानी सीतामाईंना अग्निपरीक्षा द्यायला लावली. मग जर तुम्ही रामभक्त आहात आणि जर जनतेला ईव्हीएमवर शंका आहेत तर मग तुम्ही जनतेचा मताचा आदर करत निवडणुका मतपत्रिकेवर घ्या.”

मनसेने आपल्या निवडणुकांसंदर्भातल्या मागणीसाठी एक अर्ज बनवला आहे, या पुढील सर्व निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात ह्या मागणीसाठीचा हा अर्ज आहे. राज ठाकरेंनी मनसैनिकांना आवाहन आहे की तुम्ही लोकांच्या घरी जा, त्यांना मुद्दा समजावून सांगा आणि अर्ज भरून घ्या. आपण हे सगळे अर्ज निवडणूक आयोगाला देणार आहोत.”

मनसेचा मोर्चा २१ तारखेला होणार होता पण महाराष्ट्रातल्या पुरपरिस्थितीमुळे तो पुढे ढकलला आहे. त्याची नवीन तारीख मनसेतर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे सविस्तरपणे

# आज पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे परिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री फक्त हवाई पाहणी करत आहेत. गिरीश महाजन तर सेल्फी घेत होते. आणि हे असं सगळं करू शकतात कारण त्यांना माहिती आहे की कितीही कुणीही संताप व्यक्त करू दे, टीका करु दे, ते निवडून येणारच आहेत. हा सत्तेचा माज आहे.

# महाराष्ट्र भाजप मधील एक वरिष्ठ नेत्याने बाळा नांदगावकरांना सांगितलं की भाजप सोडून महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्ष एकत्र जरी आले तरी आम्हीच जिंकणार कारण ईव्हीएम मशीन आमच्या ताब्यत आहेत.

# मी मध्यंतरी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर सोनिया गांधींची भेट घेतली, ममता बॅनर्जींची भेट घेतली, त्यात ईव्हीएम भाजप कशा पद्धतीने वापरत आहे हे ह्या दोन्ही नेत्यांना सांगितलं. त्यांनी देखील हा धोका मान्य केला. त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या मुद्द्यावर तुमच्या सोबत आहोत.

# राजकीय पक्ष प्रचार करणार, सभा घेणार, पैसे खर्च करणार आणि तरीही जर भाजप ईव्हीएमच्या जोरावर मतदान हवं तसं फिरवणार असेल तर राजकीय पक्ष तुल्यबळाने कशा निवडणूक लढवणार?

# ३७० कलम हटवलं म्हणून पेढे वाटले जात आहेत पण ३७१ मतदारसंघांमध्ये भाजपने ईव्हीएमच्या जोरावर फेरफार करून जनमताशी प्रतारणा केली पण ह्यावर कोणी बोलायला तयार नाही.

# वर्तमानपत्रात बातम्या आल्या की मला ईडीची नोटीस आली, मला अशी कोणतीही नोटीस आली नाही. मी पत्रकारांना म्हणलं की अशाच धमक्या तुमच्या मालकांना दिल्या जात आहेत, आणि म्हणून तुमची कितीही इच्छा असली तरी तुम्ही सत्य मांडू शकत नाही आहात.

# एक दोन अपवादात्मक माध्यमं सोडली तर कोणीच सत्य मांडू शकत नाही आणि ह्या माध्यमांवर पण वरून दडपण आणलं जात आहे. आणि हे सगळं बहुमताच्या जोरावर

# माहिती आयुक्तांचा कार्यकाळ, त्यांचा पगार सरकारने ठरवायचा असा कायदा पारित करून घेतला माहिती आयुक्तांची स्वायत्तता संपुष्टात आणली गेली. हे का? तर मोदींचं नक्की किती शिक्षण झालं आहे? ह्याची माहिती; माहिती अधिकाराखाली मागवली गेली तेंव्हापासून ह्या कायद्यावर अंकुश आणायचा निर्णय घेतला गेला. हे सगळं बहुमताच्या जोरावर.

# दहशतवाद कायदा: सध्याचा कायदा जो पारित करून घेतला आहे त्यानुसार एका व्यक्तीला दहशतवादी ठरवायचा अधिकार सरकारला म्हणजेच अमित शाह ह्यांना मिळाला. त्यामुळे कोणी एखादं राजकीय किंवा सामाजिक आंदोलन केलं, तर त्याला दहशतवादी ठरवून त्याला अटक करायचे अधिकार ह्या कायद्याने अमित शहांना आले. हे सगळं बहुमताच्या जोरावर.

# काश्मीरमध्ये ३७० कलम हटवायचं म्हणून इंटरनेट बंद केलं गेलं, टीव्ही बंद केले गेले, कर्फ्यू लावला गेला. उद्या असंच महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ ह्यांच्याबाबतीत घडू शकतं, आणि हे का घडतंय तर बहुमताच्या जोरावर.

# जेट एअरवेज बंद, एअर इंडिया तोट्यात, बीएसएनएल ५४ हजार बेरोजगार, हिंदुस्थान एरोनॉटिक्स कामगारांचा पगार द्यायला पैसे नाहीत, देशाचं वाहन क्षेत्रं प्रचंड अडचणीत त्यामुळे किमान १० लाख लोकं बेरोजगार होणार म्हणजे लाखो कुटुंबं अडचणीत येणार. ओनजीसी तोट्यात,स्टेट बँक तोट्यात संपूर्ण देशाची अर्थव्यवस्थाच धोक्यात आहे.

# गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, जवळपास ६ लाख मध्यम उद्योग बंद पडलेत.आणि हे सगळं झालं एका माणसाला आलेल्या नोटबंदीच्या झटक्यामुळे, जीएसटी आणला पण केंद्राकडे पुरेसा निधी नाही, त्यामुळे महापालिकांना पैसा नाही, मग शहरं चालणार कशी ?

# काल नरेंद्र मोदी म्हणाले की ३७० कलम काढल्यावर काश्मीरमध्ये रोजगार निर्माण करू, पण अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे, जिथे ३७० कलम नाही मग तिथे गेल्या ५ वर्षात रोजगार का निर्माण करू नाही शकलात? अहवालानुसार, आता तर गेल्या ४५ वर्षातही नव्हती इतकी बेरोजगारी आहे.

# देश आर्थिक गर्तेत चालला आहे पण मोदी भक्तांचं लक्ष नाही, ते सध्या आनंदात आहे, त्यांच्यावर जेंव्हा ह्या आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळेल तेंव्हा कळेल. ह्या आर्थिक अडचणींकडे लक्ष जाऊ नये म्हणून समान नागरिक कायदा, राम मंदिर मुद्दे पुढे आणून तुमचं लक्ष विचलित करायचे प्रयत्न सुरु आहेत.

# आपण रेल्वे भरतीसाठी २००८-०९ ला आंदोलन केलं तेंव्हा आपल्यावर केसेस टाकल्या गेल्या, पण असंच आंदोलन गुजरात मध्ये झालं तेंव्हा गुजरातमधून हाकलून दिलेले उत्तरप्रदेश-बिहारची लोकं महाराष्ट्रात आली आणि हे आंदोलन करणारा अल्पेश ठाकोर भाजपमध्ये प्रवेश करतो आणि आपल्यावर महाराष्ट्रात केसेस टाकल्या जातात.

# लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ३५० जागा येतील अशा घोषणा भाजपचे नेते करत होते, तसंच झालं. आता पण विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर २२०, २३० असे आकडे घोषित करत आहेत आणि हा आकडा खरा वाटावा म्हणून भावनिक विषय पुढे करायचे आणि मग ईव्हीएमच्या जोरावर निवडणुका जिंकायच्या.

# भारतीय जनता पक्षाचे फेसबुक, ट्विटर व्हाट्सऍपवरचे जे समर्थक आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की जेंव्हा आपल्या महाराष्ट्रावर वरवंटा फिरेल तेंव्हा तुमची जात, तुमचा धर्म ह्या कशाचाही विचार होणार नाही, तुम्ही मराठी आहात म्हणून सगळ्यांवर फिरणार, मग तुम्ही कितीही त्यांचे समर्थक असलात तरी.

 

# ह्या देशातील लोकशाही जिवंत करायची असेल तर पुन्हा मतदान मतपत्रिकेवर व्हायला हव्यात. निवडणुका पारदर्शी व्हायला हव्यात.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *