छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी
मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिभुवन कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची अधिकृत घोषणा केली.
यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात सुमारे २ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. तरीही विद्यार्थ्यांनी समाधानकारक कामगिरी केल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेल्या या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच आघाडी कायम राखली आहे.
दहावीच्या परीक्षेत मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.९६ इतकी नोंदवली गेली असून मुलांची उत्तीर्णता ९०.५६ टक्के राहिली आहे. त्यामुळे मुली मुलांच्या तुलनेत लक्षणीय आघाडीवर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रगती आणि अभ्यासातील नियमितता यामुळे मुलींची कामगिरी अधिक उजवी ठरत असल्याचे निरीक्षण शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
विभागनिहाय निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल ९७.६२ टक्के लागला असून हा राज्यातील सर्वोच्च निकाल ठरला आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८८.४१ टक्के नोंदवला गेला आहे.
राज्यातील विभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे :
पुणे विभाग – ९४.२४ टक्के
नागपूर विभाग – ८९.०७ टक्के
छत्रपती संभाजीनगर विभाग – ८८.४१ टक्के
मुंबई विभाग – ९४.९७ टक्के
कोल्हापूर विभाग – ९५.४७ टक्के
अमरावती विभाग – ९०.५० टक्के
नाशिक विभाग – ९०.५३ टक्के
लातूर विभाग – ८८.४२ टक्के
कोकण विभाग – ९७.६२ टक्के
निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळांवरून विषयनिहाय गुण पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डिजीलॉकर सुविधेमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल गुणपत्रिका डाउनलोड करून सुरक्षित ठेवण्याचीही सोय उपलब्ध झाली आहे.
निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती तसेच पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. संबंधित अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून स्वतः किंवा शाळांमार्फत सादर करता येणार आहेत.
दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आनंद साजरा केला. पुढील अकरावी प्रवेश प्रक्रिया, विविध व्यावसायिक अभ्यासक्रम आणि करिअर निवडीच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.
