शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणाची गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाईचा शिक्षणमंत्र्यांचा इशारा
मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भिवंडी येथे प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची शासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली असून, दोषींविरुद्ध कठोर आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी मांडली आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, दि. २७ जून २०२६ रोजी पहाटे भिवंडी परिसरात काही व्यक्तींकडे टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची माहिती असल्याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी तातडीने कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडील कागदपत्रे व साहित्य जप्त केले.
त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून जप्त करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न हे दि. २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब अत्यंत गंभीर मानत भिवंडी पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास वेगाने सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर परीक्षेची विश्वासार्हता, पारदर्शकता आणि लाखो उमेदवारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत परीक्षा घेणे योग्य ठरणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, “टीईटी पेपरफुटी प्रकरणाची राज्य शासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. परीक्षेच्या पवित्रतेशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पारदर्शक आणि निष्पक्ष परीक्षा घेणे ही शासनाची भूमिका आहे.”
मंत्री भुसे यांनी पुढे सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शालेय शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून पोलीस प्रशासनाला सर्व बाजूंनी सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका गळतीमागील संपूर्ण साखळी उघड करून संबंधित सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे उमेदवारांनी कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. टीईटी २०२६ परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार असून, उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची किंवा पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी केलेली नोंदणी आणि प्रवेशपत्र पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेकडून नव्या परीक्षेच्या तारखेसह इतर सर्व अद्ययावत माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, उमेदवारांनी केवळ अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा आणि अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी राज्य शासन, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वयाने पुढील तपास सुरू असून, दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
