१५ मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. ९ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी बिहारमधील बोधगया येथे विशेष तीर्थदर्शन यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. या यात्रेसाठी पात्र आणि इच्छुक ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले असून दि. १५ मे २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त रविकिरण पाटील यांनी केले आहे.
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांचे दर्शन सुलभ व्हावे तसेच त्यांना सामाजिक आणि मानसिक आधार मिळावा या उद्देशाने राज्य शासनाने “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरू केली आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना शासनामार्फत मोफत प्रवास, निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
योजनेच्या अटींनुसार अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदाराचे वय किमान ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये २ लाख ५० हजारांपेक्षा कमी असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शासन निर्णयातील इतर सर्व अटी आणि नियमही लागू राहणार आहेत.
या यात्रेत सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच यात्रेत सहभागी होता येणार असून अपूर्ण, चुकीची किंवा अपात्र अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जामध्ये खोटी माहिती आढळल्यास संबंधित अर्ज तत्काळ रद्द करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विशेष बाब म्हणून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एका व्यक्तीस सोबत नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे वृद्ध आणि अशक्त ज्येष्ठ नागरिकांनाही यात्रेचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र ज्येष्ठ नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित मुदतीत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनेक ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार असून ज्येष्ठ नागरिकांमध्ये या योजनेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
