वनमंत्री गणेश नाईक यांचे विधानपरिषदेत प्रतिपादन
मुंबई, दि. ३०: राज्यातील वाढत्या वणव्यांच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, ऑस्ट्रेलियामध्ये राबविण्यात येणाऱ्या वनवा प्रतिबंधक उपाययोजना, आधुनिक यंत्रसामग्री आणि अग्निशमन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
यासंदर्भात सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता, तर सदस्य संजय खोडके यांनी उपप्रश्न विचारला. वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, “जगातील वनवे नियंत्रणाच्या प्रभावी पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलियात पाठविले जाईल. तेथील प्रतिबंधात्मक उपाययोजना, आधुनिक यंत्रसामग्री आणि अग्निशमन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.”
राज्यात वणवे रोखण्यासाठी सध्या उपग्रह प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून सातत्याने देखरेख ठेवली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. आग लागल्याची माहिती तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असल्यामुळे त्वरित प्रतिसाद देणे शक्य होत असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरील नुकसान टाळण्यास मदत होत आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले की, “वन संरक्षण ही केवळ वन विभागाची जबाबदारी नसून ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस यंत्रणा, लोकप्रतिनिधी तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही त्यात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे.”
कोकणातील वणव्यात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक असून, या प्रकरणात स्वतः लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, कोकण विभागातील बहुतांश वणवे खासगी जमिनीवरील झाडे, पालापाचोळा किंवा गवताला लागतात. अशा घटना वन विभागाच्या मालकीच्या क्षेत्राबाहेर घडल्यास विद्यमान नियमांनुसार वन विभागाकडून नुकसानभरपाई देता येत नाही. मात्र, संबंधित महिलेच्या वारसांना इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
विदर्भातील काही भागांमध्ये मोहाची फुले गोळा करण्यासाठी आग लावण्याची प्रथा अद्याप अस्तित्वात असल्याकडे लक्ष वेधत मंत्री नाईक म्हणाले, “अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वन विभागाकडून मोहाची फुले आणि सुरुंगीची फळे गोळा करण्यासाठी विशेष जाळ्या उपलब्ध करून देण्यात येतील. त्यामुळे आग लावण्याची गरज भासणार नाही आणि वनउत्पादनांची गुणवत्ताही सुधारेल.”
वन विभागाच्या मते, हवामान बदल, वाढते तापमान आणि मानवी निष्काळजीपणामुळे उन्हाळ्यात वणव्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, तात्काळ सूचना प्रणाली, स्थानिक प्रशासनाचा समन्वय आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यांच्या माध्यमातून राज्यातील वनसंपदेचे संरक्षण अधिक सक्षम करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
वनव्यांमुळे जैवविविधता, वन्यजीव, नैसर्गिक अधिवास तसेच पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देत राज्य शासन वनसंवर्धनासाठी दीर्घकालीन आणि प्रभावी धोरण राबविण्याच्या दिशेने कार्यरत असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेत सांगितले.
* संग्रहित छायाचित्र
