पावसाळ्यापूर्वी तातडीच्या उपाययोजनांचे नमुंमपा आयुक्तांचे निर्देश
नवी मुंबई, दि. ८ : आशियातील सर्वात मोठ्या कृषि उत्पन्न बाजारपेठांपैकी एक असलेल्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट परिसरातील स्वच्छता आणि पावसाळी तयारीचा नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने गंभीरपणे आढावा घेतला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी एपीएमसी अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी करून अंतर्गत स्वच्छता अधिक काटेकोरपणे करण्याचे निर्देश दिले.
मुंबई महानगर क्षेत्रासह विविध शहरांना भाजीपाला, फळे आणि अन्नधान्याचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करणाऱ्या या बाजारपेठेत दररोज मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असते. त्यामुळे निर्माण होणारा कचरा, सांडपाणी आणि वाहतुकीमुळे स्वच्छतेच्या कामात अडथळे निर्माण होत असल्याची बाब पाहणीत निदर्शनास आली.
या पाहणीवेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, परिमंडळ-१ चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, उद्यान विभागाच्या उपआयुक्त स्मिता काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे तसेच एपीएमसीचे सहसचिव मंदार साळवी, स्वच्छता विभागाचे उपसचिव दिपक आवटे, फळ मार्केटचे उपसचिव राजेंद्र कोंडे, कार्यकारी अभियंता मेहबूब व्यापारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले की, भाजी व फळ मार्केटमध्ये येणाऱ्या जड वाहनांच्या वेळापत्रकाचे योग्य नियोजन नसल्यामुळे नियमित स्वच्छतेत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे एपीएमसी प्रशासनाने पुढील आठवडाभर वाहतुकीच्या वेळांचा सखोल अभ्यास करून वाहनांसाठी स्वतंत्र वेळापत्रक निश्चित करावे. त्यानुसार कचरा संकलन आणि स्वच्छता मोहिमा अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.
मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर कुजलेली फळे, खराब झालेला भाजीपाला आणि पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे तुस व इतर सेंद्रिय पदार्थ टाकून दिले जात असल्याने दुर्गंधी निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. विशेषतः ओल्या कचऱ्याचे त्वरित आणि वारंवार संकलन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आयुक्तांनी मार्केट परिसरातील अंतर्गत नाल्यांचीही पाहणी केली. नालेसफाई अधिक वेगाने आणि नियमितपणे करण्यासोबतच नाले पाण्याने धुवून स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी महानगरपालिकेच्या सक्शन पंप यंत्रणेचा वापर करण्याबाबतही सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली.
फळ मार्केटच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळ पावसाळ्यात पाणी साचत असल्याच्या तक्रारी आणि प्रसारित होणाऱ्या छायाचित्रांची विशेष दखल घेत आयुक्तांनी त्या भागाची पाहणी केली. मार्केटच्या आतील भागाच्या तुलनेत बाहेरील रस्त्याची पातळी उंच असल्याने पाणी साचत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. त्यावर उपाय म्हणून नाल्यांमध्ये तांत्रिक सुधारणा करणे, बंद गटारे पूर्णपणे स्वच्छ ठेवणे आणि फळांचा तसेच पॅकेजिंग साहित्याचा कचरा गटारांमध्ये अडकणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
पावसाळ्यात अतिरिक्त पाणी उपसा पंप तैनात ठेवण्याची खबरदारी घेण्यासोबतच कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी एपीएमसी सचिवांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
भाजीपाला आणि फळे या थेट नागरिकांच्या आहाराशी संबंधित बाबी असल्याने बाजारपेठेतील स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करत डॉ. कैलास शिंदे यांनी एपीएमसी प्रशासनाला नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण आणि दीर्घकालीन स्वच्छता उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले.
