Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कालच्या भिवंडी व कल्याण येथील सभेचे ठळक मुद्दे जसेच्या तसे

वाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कालच्या भिवंडी व कल्याण येथील सभेचे ठळक मुद्दे जसेच्या तसे

कल्याण/भिवंडी: काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कल्याण व भिवंडी येथे सभा निवडणूक प्रचार झाली. यावेळी त्यांनी भाजप व आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली. या भाषणातील राज ठाकरे यांचे ठळक मुद्दे जसे च्या तसे :

१) १९८२ ला भिवंडीत मी पहिल्यांदा सन्मानीय बाळासाहेबांबरोबर आलो होतो आणि पुढे अनेकवेळा आलो. पण आज येताना खड्डे बघून प्रश्न पडला की तुम्हाला राग कसा येत नाही, मला असल्या हतबल लोकांचं नेतृत्व करायला आवडत नाही.

२) गेल्या ५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण त्याचा आम्हाला राग येत नाही, निवडणुका म्हणजे फक्त धमाल अशी परिस्थिती आहे.

३) भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय बंद पडतोय, देशात पण अनेक उद्योगधंदे पडत आहेत आणि आपण काहीच वाटून घेत नाही आहोत.

४) आज पीएमसी आणि सिटी कोऑपरेटिव्ह बँकेचे खातेदार आले होते, त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीयेत, आज बँका बुडत आहेत, उद्योग बुडत आहेत, तरीही आपल्याला राग येत नाही, व्यवस्थेला जबाबदार धरावेसे वाटत नाही.

५) शिवसेनेचे खासदार सिटी कॉऑपरेटिव्ह बँक चालवत आहेत, आणि बँक बुडल्यावर खातेदार भगिनी त्या शिवसेनेच्या खासदारांना भेटायला गेले तर म्हणाले मी काही करू शकत नाही, मरायचं तर मरा.

६) भिवंडी मधील विजेचा प्रश्न, टोरेंट नावाची कंपनी गुजरात मधून आली, आणि तिने लुटायला सुरुवात केली आहे. भिवंडीकरांनी भाषणांना टाळ्या द्यायच्या ऐवजी ती एक टाळी टोरेंटच्या अधिकाऱ्याच्या गालावर मारली तर परिस्थिती सुधारेल.

७) आज महाराष्ट्रात नाशिक वगळता सर्वत्र खड्डे आहेत. नाशिकमध्ये आपल्या सत्तेच्या काळात आम्ही टक्केवारी बंद केली आणि त्यामुळे रस्त्यांवर खड्डे नाही पडले. तेच कंत्राटदार होते जे आधीपण होते. पण कंत्राटदारांनी नाशिक मध्ये आमच्या काळात रस्ते चांगले बांधले कारण आम्ही टक्केवारी बंद केली.

८) जर तीच तीच माणसं सत्तेत निवडून आली तर त्यांना भीती कधी वाटणार की आपण काम नाही केलं तर लोकं आपल्याला निवडून नाही देणार. जे आधी विरोधी पक्षात होते तेच आता सत्ताधारी गोटात जाऊन बसले आहेत, जो पर्यंत हे दलबदलू हरणार नाहीत तो पर्यंत परिस्थिती सुधारणार नाही.

९) चांगले रस्ते, चांगलं शिक्षण, चांगल्या पायभूत सुविधा, अशा अनेक गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर ही संधी आहे तुम्हाला ह्या सगळयांना घरी बसवा.

१०) आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात, गावात लोकांच्या मनात राग आहे पण हा राग कुठे व्यक्त करायचा, आम्ही लोकांना आवाहन करतोय की आम्हाला सक्षम विरोधी पक्ष म्हणून निवडून येण्यासाठी मतदान करा. रस्त्यावरचा विरोधी पक्ष म्हणून आम्ही होतोच आज विधानसभेतील विरोधी पक्ष म्हणून काम करायचं आहे.

११) माझे उमेदवार जेंव्हा निवडून येतील तेंव्हा त्यांच्यावर माझा अंकुश असेल आणि माझे विधानसभेतील आमदार सरकारवर अंकुश ठेवतील. माझा महाराष्ट्राकडे बघायचा दृष्टिकोन आहे; जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे.

१२) ३०% सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करणार असं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. एकीकडे उद्योगधंदे बंद होत असल्याने खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्या जात आहेत आणि आता सरकारी पण.

भाजपची घोषणा होती २०१४ ला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, आज आम्ही विचारतोय कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र?

१३) मुख्यमंत्र्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेला सांगितलं होतं ६५०० कोटी रु. पॅकेज देईन, अजून काहीच नाही पण विधानसभेत कुणी जाब विचारायला नाही.

१४) शिवछत्रपतींच्या समुद्रातील पुतळ्याबद्दल फक्त शिवस्मारक म्हणून निवडणुकांचा प्रचार सुरु आहे पण अजून काही घडलं? नाही.
माझं आजही ठाम मत आहे शिवरायांचा पुतळ्यापेक्षा त्यांचा जिवंत इतिहास असलेले गडकिल्ले सुधारा, ती खरी महाराजांची स्मारकं.

१५) शिवसेना-भाजप ह्या राजकीय पक्षांना शहरांमध्ये २५-२५ वर्ष सत्ता देऊनही शहरात जो विकास घडवता आलं नाही त्याही पेक्षा उत्तम विकासकामं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फक्त ५ वर्षात करून दाखवली होती.

१६) गुजरातमध्ये जेव्हा परप्रांतीयांना हुसकावण्याची आंदोलनं झाली आणि नंतर ते आंदोलन करणारा नेता भाजपमध्ये जातो तेव्हा कुठल्याही राष्ट्रीय माध्यमांना त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. पण आम्ही स्थनिकांसाठी आंदोलनं केली तर आमच्यावर खटले भरले जातात.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *