
अरविंद केजरीवाल हे तपास कामात सहकार्य करत नसल्याचे ईडीने न्यायालयाच्या निदर्शनास दिले आणून
नवी दिल्ली, दि. ०१: दिल्ली कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या ताब्यात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज मोठा झटका बसला आहे. दिल्लीतील राउज अव्हेन्यू कोर्टाने ईडी च्या मागणीवर केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ‘ईडी’तर्फे कोर्टात हजर झालेल्या एएसजी एसव्ही राजू यांनी अरविंद केजरीवाल हे तपास कामात सहकार्य करत नसल्याचे कोर्टाला सांगितले. ते आमची दिशाभूल करत असून ते म्हणत आहेत कि मला काहीच ठावूक नाही.
ईडीच्या वतीने एएसजी राजू यांनी न्यायालयात सांगितले की, विजय नायर हे केजरीवाल यांचे निकटवर्तीय आहेत. चौकशीदरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले की, नायर हे मला थेट रिपोर्ट करत नव्हते. ते दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना रिपोर्ट करायचे. वेळी सौरभ भारद्वाज कोर्ट रूममध्ये उपस्थित होते. आपले नाव ऐकून सौरभला धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्याने अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्याकडे पाहिले. या संपूर्ण प्रकरणात आतिशी आणि सौरभ यांची नावे प्रथमच न्यायालयात घेण्यात आली आहेत.
खरे तर या खटल्यातील अरविंद केजरीवाल यांचा ईडी कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. सक्तवसुली संचालनालयाने आम आदमी पक्षाचे(AAP) चे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्चच्या रात्री उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ मार्चला कोर्टाने केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले. त्यानंतर २८ मार्च रोजी त्यांची १ एप्रिलपर्यंत ईडी कोठडीत रवानगी करण्यात आली.