Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कांतीलाल कडू होतील का पनवेलचे सुभेदार, वाचा विस्तृत विश्लेषण

कांतीलाल कडू होतील का पनवेलचे सुभेदार, वाचा विस्तृत विश्लेषण


पनवेल विधानसभा क्षेत्र – १८८
उमेदवार – कांतीलाल कडू (अपक्ष)
निशाणी – शिट्टी

पनवेल (प्रतिनिधी) :यंदाच्या विधानसभा निवडणुकांत महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात युतीतील शिवसेना व भाजप या पक्षांमध्ये बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले. पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील यांनी आधी विद्यमान आमदार भाजपचे प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात थेट पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म भरला व नंतर तो मागे घेतला होता. यावेळी थोडक्यात युतीतील बंड शमल्याचं दिसलं. यामुळे प्रशांत ठाकूर यांची लढत थेट शेकापचे हरेश केणी यांच्याशी होईल असं चित्र होतं. पण याच वेळी या अपक्ष उमेदवार पत्रकार कांतीलाल कडू यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.

कांतीलाल कडू हे पनवेल तालुक्यात पत्रकार म्हणून परिचित असलेलं नाव. गेली १२ वर्ष “निर्भीड लेख” नावाचे दैनिक ते चालवतात. यामार्फत गेली अनेक वर्षे त्यांनी पवेलकरांच्या निरनिराळ्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या. यामुळे पनवेलच्या शहरी भागात त्यांचा मोठा जनसंपर्क तयार झालाचे पाहायला मिळते. पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी त्यांचे वेळोवेळी खटके उडत असतात. सध्याही प्रचारादरम्यान ते प्रशांत ठाकुरांवर निरनिराळे आरोप करताना दिसत आहेत. त्यात प्रामुख्याने खराब रस्ते व पाणी प्रश्न अग्र क्रमावर आहेत. या निवडणुकीत पनवेल मधील शहरी भागातील मतदारांवर त्यांची मोठी मदार आहे. रिक्षा युनियन चे अध्यक्ष असल्यामुळे रिक्षा मालक-चालक आपले हक्काचे मतदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी कांतीलाल कडू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली होती. या एका भेटीमुळे भाजपवर नाराज असलेल्या शिवसैनिकांच्या मनात हळवा कोपरा मिळवण्यात त्यांना काही प्रमाणात यश आल्याचे दिसते. अनेक शिवसैनिक खासगीत कांतीलाल कडू यांना पाठिंबा देत आहेत.

अजून एक मुद्दा तो म्हणजे पनवेल, कामोठे, खारघर व कळंबोली परिसरातील खराब रस्ते आणि अपुऱ्या पाणी समस्येमुळे त्रस्त असलेल्या मतदात्यांकडून त्यांना जास्त मतं मिळण्याची अपेक्षा आहे.

या झाल्या कांतीलाल कडू यांच्या जमेच्या बाजू पण आता जाणून घेऊयात त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. कांतीलाल कडू यांचा शहरी मतदारांशी थेट संपर्क असला तरी ग्रामीण मतं मिळवताना त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतील. मुळात कांतीलाल कडू यांनी आपली उमेदवारी थोडी उशिरानेच जाहीर केली. त्यामुळे संघटनात्मक कार्यकर्त्यांचं जाळं विणण्यास त्यांना जास्त वेळ मिळाला नाही. मतदाना दिवशी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ते कसे आणतात यावर त्यांच्या विजयाची गणितं अवलंबून आहेत.

सध्या कांतीलाल कडू खेळत असलेल्या डावाकडे पाहून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे या निवडणुकीत ते आपले उपद्रवमूल्य दाखवतीलच पण याच सोबत नंतरच्या अडीच वर्षांनी येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत ते प्रशांत ठाकूर आणि त्यायोगे सत्ताधारी भाजपसमोर मोठे आव्हान उभे करू शकतात. त्यांची शिवसेनेसोबत वाढत चाललेली जवळीक ही भविष्यातील नवीन समीकरणांची नांदी ठरू शकते. सध्यातरी पनवेल तालुक्यात शिवसेना कार्यकारणी फक्त नावालाच आहे. त्यामुळे विधानसभे नंतर येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपशी युती करून एखाद-दोन जागी विजय मिळवण्यापेक्षा कडू यांनाच शिवसेनेत पाचारण करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून चक्र फिरल्यास नवल वाटू नये.

तूर्तास कांतीलाल कडू यांच्यासाठी विजय मिळवण्याची वाट काहीशी अवघड दिसतेय. पण कोणत्याही युद्धामध्ये हरल्यानंतरही जो जास्त फायदा पदरात पाडून घेतो तो तार्किक दृष्ट्या जेता ठरतो तशाच प्रकारे कांतीलाल कडू यांचं या निवडणुकीनंतर नशिब पालटू शकतं. सध्यातरी पनवेलचा सुभेदार कोण होणार हे जाणून घेण्यासाठी २४ ऑक्टोबर ची वाट पाहणे इष्ट.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *