Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“मोठं आश्चर्य वाटतं….!” वाचा समुपदेशक अपूर्व विकास यांची परखड कविता

“मोठं आश्चर्य वाटतं….!” वाचा समुपदेशक अपूर्व विकास यांची परखड कविता

(Social Psychology चा हौशी विद्यार्थी म्हणून प्रवास करताना जाणवलेलं काही...)

मोठं आश्चर्य वाटतं त्या मोठ्या माणसांच्या बालिशपणाचं,
जे “गाय-छाप” आणायला पाठवून दरडावतात लहानांना “आमचा आदर ठेवा” म्हणून…
आणि तरतूद करून ठेवतात पाठ फिरल्यानंतरच्या अनादराची !!

मोठं आश्चर्य वाटतं त्या सूज्ञांच्या मूर्खपणाचं,
जे सांगतात सुव्यवस्थेला “शांतता ठेवण्यासाठी गुंडांना मत दिलंय” म्हणून…
आणि तरतूद करून ठेवतात कायद्याच्या खुनानंतरच्या स्मशानशांततेची !!

मोठं आश्चर्य वाटतं त्या समाजधुरिणांच्या अकलेचं,
जे बजावतात समाजपुरुषाला “जाती बनवून ठेवल्यात” म्हणून…
आणि तरतूद करून ठेवतात शतकांनंतरच्या समाजघाताची !!

मोठं आश्चर्य वाटतं त्या धर्मवाद्यांच्या विज्ञानद्वेषाचं,
जे गरजतात ज्ञानावर “शास्रांत सगळं सांगून झालंय” म्हणून…
आणि तरतूद करून ठेवतात धर्मशास्रांत निरुत्तर झालेल्या तर्कप्रश्नांना अधर्मात उत्तरं सापडण्याची !!

मोठं आश्चर्य वाटतं त्या संस्कृतीरक्षकांच्या भक्षणवृत्तीचं,
जे किंचाळतात आधुनिकतावाद्यांवर “प्रेम प्रदर्शित करायला परवानगी नाही” म्हणून…
आणि तरतूद करून ठेवतात बंदिस्त संस्कृतीविरोधात उघडा निसर्ग पेटून उठण्याची !!

मोठं आश्चर्य वाटतं त्या समाजवाद्यांच्या व्यक्तीद्वेषाचं,
जे खेकसतात व्यक्तीवर “समाज तुझ्यापेक्षा मोठाय” म्हणून..।
आणि तरतूद करून ठेवतात महत्वाकांक्षी व्यक्ती लगदा झालेल्या समाजापासून दूर पळण्याची !!

मोठं आश्चर्य वाटतं त्या शिक्षकांच्या छडीप्रेमाचं,
जे मारमार मारतात पोरांना “१४७०मध्ये काय झालं होतं ते येत नै” म्हणून…
आणि तरतूद करून ठेवतात अनास्थेत द्वेष मिसळल्याने इतिहासासकट भविष्यही पांगळं होण्याची !!

मोठं आश्चर्य वाटतं जगभरच्या त्या बुद्धिजीव्यांच्या निर्बुद्धीचं,
जे पाच हजार वर्षांच्या अनुभवानंतरही ग्वाही देतात “त्या राजकारण्यात नायक सापडलाय” म्हणून…
आणि तरतूद करून ठेवतात आदर्शांची लोकशाही वेठीस धरल्यानंतरच्या नागड्या सत्याच्या असहाय्यतेची !!

मोठं आश्चर्य वाटतं त्या कोवळ्या तरुणांच्या वयोवृद्ध नादानतेचं,
जे विश्वास ठेवतात “ग्रेटर गुड आणि बिग पिक्चरसाठी झिजलो तरी चालेल” म्हणून…
आणि तरतूद करून ठेवतात गंडवणाऱ्या तत्वज्ञानामागच्या कुणा चतुराच्या स्वार्थतृप्तीची !!

मोठं आश्चर्य वाटतं त्या पुरुषी वर्चस्ववाद्यांच्या शोषणवृत्तीचं,
जे ठरवतात, “स्त्रीचं आयुष्य पुरुषाकडून मापून घेण्यासाठीच असतं” म्हणून…
आणि तरतूद करून ठेवतात तिच्या सात्विक क्रोधाने सरसकट सर्वच पुरूष नालायक ठरवले जाऊन सुक्याबरोबर ओलंही जळण्याची !

मोठं आश्चर्य वाटतं त्या स्रीवाद्यांच्या पुरुषद्वेषाचं,
जे बरळतात “सगळे पुरूष वासनांधच असतात” म्हणून…
आणि तरतूद करून ठेवतात स्त्री-पुरूष समानतेच्या पुरस्कर्त्यांनी कष्टाने उभी केलेली न्याय्य चळवळ तोंडघशी पडण्याची !!

मोठं आश्चर्य वाटतं त्या माणसांच्या अकलेच्या उपयोगशून्यतेचं,
जे विचार करतात “अज्ञांना ज्ञान दिलं तर सत्ता त्यांची का ?” म्हणून…
आणि तरतूद करून ठेवतात मानवी अस्तित्वाला सत्तेची कौतुकं बाजूला सारून, कधीच विशाल व्हायला न मिळण्याची !!

© अपूर्व विकास
समुपदेशक आणि मानसशास्त्र तज्ज्ञ
8928183848
7774917184 (WhatsApp)

 

(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *