मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मदतकार्याला गती; जखमींना सर्वोत्तम उपचार आणि शेजारील इमारतीतील नागरिकांच्या स्थलांतराचे निर्देश
मुंबई, दि. ३१ : भिवंडीतील इमारत दुर्घटनेनंतर राज्य शासनाने मदत आणि बचावकार्याला वेग देत आपत्तीग्रस्तांना तातडीने दिलासा देण्यावर भर दिला आहे. जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. यावेळी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून सुरू असलेल्या बचाव व मदतकार्याची सविस्तर माहिती घेतली. बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासोबतच प्रभावित नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मदत तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा; मदतकार्याला प्राधान्य
या दुर्घटनेची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदतकार्य करण्याचे निर्देश दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी मंत्री महाजन यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली. तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात येतील आणि आपत्तीग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेजारील इमारतीतील नागरिकांचे स्थलांतर
दुर्घटनाग्रस्त इमारतीलगतच्या इमारतीतील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांचे स्थलांतर करण्यात आले असून, त्यांच्या निवास व इतर आवश्यक सुविधांची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देशही मंत्री महाजन यांनी प्रशासनाला दिले.
आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासन, बचाव पथके आणि स्थानिक यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय ठेवून नागरिकांपर्यंत तातडीने मदत पोहोचविण्यावर विशेष भर द्यावा, असे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.
विविध मान्यवरांची उपस्थिती
या पाहणी दौऱ्यावेळी खासदार सुरेश म्हात्रे, माजी मंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौगुले, महापौर नारायण चौधरी, जिल्हाधिकारी श्रीकांत पांचाळ यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन विभाग, महापालिका प्रशासन आणि विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात शासन सहभागी असल्याची भावना मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. बचावकार्य पूर्ण होईपर्यंत प्रशासनाने सतर्क राहून प्रभावित नागरिकांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

